७३
उदार धीर-निधि । श्रीविठ्ठल-नाम आधी । पतित-पावन सिध्दि । श्रीविठ्ठल-नाम आधी । सुख-सागर-निधि । श्रीविठ्ठल-नाम आधी । एका जनार्दनी बुध्दि । श्रीविठ्ठल-नाम आधी ।
भावार्थ:
जो औदार्य व धैर्य यांचा ठेवा आहे, अशा विठ्ठलाचे नामस्मरण आधी करावे. ज्याच्याकडे पतितांना पावन करणारी सिध्दि आहे, अशा विठ्ठलाला आधी स्मरावे. जो सुख देणारा सागरनिधी आहे, अशा विठ्ठलाचे नाम आधी जपावे. एका जनार्दनी म्हणतात, विठ्ठलनामस्मरण करण्याची बुद्धी सद्गुरूंकडे मागावी.
७४
आंबे केळी द्राक्ष-घडु । नामापुढे अवघे कडु । नाम गोड नाम गोड । हरि म्हणता पुरे कोड । गुळ साखर कायसी निकी । अमृताची चवी झाली फिकी । एका जनार्दनी पडली मिठी । चवी घेतली ती कधीच नुठी ।
भावार्थ:
विठ्ठलाच्या नामाची गोडी एकदा चाखली की त्यापुढे आंबे, केळी, द्राक्षे यांची गोडी अगदीच फिकी वाटते. नाम इतके गोड आहे की हरिउच्चारण करताच सर्व इच्छा पूर्ण होतात. गुळसाखरच काय, पण अमृताची चवसुध्दा हरिनामाच्या तुलनेत फिकी वाटते. एका जनार्दनी म्हणतात, हरिनामाच्या गाडीने जिभेला अशी मिठी पडते की एकदा चव घेता ती कधीच विसरत नाही.
७५
लौकिकापुरता नव्हे हा विभाग । साधले अव्यंग सुख-सार । अवीट विटेना बैसले वदनी । नाम संजीवनी ध्यानी-मनी । एका जनार्दनी भाग्य ते चांगले । म्हणोनि मुखा आले राम-नाम ।
भावार्थ:'
एका जनार्दनी म्हणतात, ज्याचे भाग्य चांगले असेल त्यालाच रामनामाचा छंद लागून मुखात सतत रामनामाचा जप असेल. रामनामाची अवीट गोडी निर्माण होईल. ध्यानी-मनी-स्वप्नी ही नामसंजीवनी वदनी वसेल. साधकाला निरंतर सुखाची प्राप्ती होईल, तो केवळ लौकिक व्यवहार उरणार नाही.
७६
गुंतला भ्रमर कमळिणी-कोशी । आदरे आमोदासी सेवितसे । तैसे राम-नामी लागता ध्यान । मन उन्मन होय जाण । एका जनार्दनी राम परिपूर्ण । प्रपंच परमार्थ रामचि जाण ।
भावार्थ:
मध सेवन करण्यासाठी गेलेला भ्रमर कमळफुलात गुंतून पडतो आणि अत्यंत आनंदाने आदरपूर्वक मधाचा आस्वाद घेतो. तसेच साधकाचे रामनामी ध्यान लागून मन उच्च पातळीवर स्थिर होते. मन रामनामात एकाग्र होऊन मनाची चंचलता नाहिसी होऊन त्याचे उन्मन होते. एका जनार्दनी म्हणतात, राम परिपूर्ण असून तोच प्रपंच व परमार्थ साधण्याचे साधन आहे.
७७
भुक्ती-मुक्तीचे कारण । नाही नाही आम्हा जाण । एक गाऊ तुमचे नाम । तेणे होय सर्व काम । धरिलिया मूळ । सहज हाती लागे फळ । बीजाची आवडी । एका जनार्दनी गोडी ।
भावार्थ:
रामनामात रंगलेला साधक नामसाधनेने भुक्ती, मुक्ती मिळेल किंवा नाही हे जाणत नाही. कारण साध्यापेक्षा त्याचे साधनेत मन गुंतलेले आहे. रामाचे नामस्मरण आणि किर्तन या साधनेतच त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. राममंत्र हे बीज असून त्याने मूळ धरले की फळ मिळणारच. एका जनार्दनी म्हणतात, फळापेक्षा बीजमंत्राची गोडी अवीट आहे. नाम-सोलभ्य
७८
सेवेचे कारण मुख्य तो सद्भाव । इतर ते वाव इंद्रिय-बाधा । साधन हेचि साधी तोडी तू उपाधी । नको ऋध्दि-सिध्दि आणिक काही । नामाचा उच्चार मुख्य हेंचि भक्ति । एका जनार्दनी विरक्ती तेणे जोडे ।
भावार्थ:
मनातला भक्तिभाव हेच ईश्वरसेवेचे प्रमुख कारण आहे, बाकी सर्व केवळ उपाधी असून इंद्रियांना शीण देणार्या आहेत. नामस्मरण हेच ईश्वरभक्तीचे खरे साधन असून ऋध्दि-सिध्दि यांपासून अलिप्त होऊन नामजपांत तल्लीन झाल्यानेच विरक्ती येईल असे एका जनार्दनी सांगतात.
७९
राम कृष्ण हरि । नित्य वदे जी वैखरी । तयापाशी नुरे पाप । नासे त्रिविध हा ताप । नाम तेचि पर-ब्रह्म । जप-यज्ञ तो परम । एका जनार्दन जपा । राम-कृष्ण मंत्र सोपा ।
भावार्थ:
राम कृष्ण हरि या नामाचा जो नित्य जप करतो तो खरा पुण्यवान समजावा, त्यांच्या मनात पापाचा लवलेशही राहात नाही. या साधकाचे आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक असे तिनही ताप नाहिसे होतात. असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, नामजप श्रेष्ठ यज्ञ असून नाम हेच परब्रह्म आहे. राम-कृष्ण हा सोपा (सहज करण्यासारखा) मंत्र असून त्याचा नित्य जप करावा.
८०
कृतांताचे माथा देऊनिया पाय । वाचे नाम गाय अहर्निशी । उघडा रे मंत्र उघडा रे मंत्र । शिव जपे स्तोत्र राम-नाम । एका जनार्दनी न करी आळस । चौर्यांशीचा लेश नको भोगू ।
भावार्थ:
राम-नाम जप हा अतिशय सहज-सुलभ मंत्र आहे. समजण्यास सोपा व उच्चारण करण्यास सुलभ असून राम-नामाचा जपाचे स्तोत्र शिवशंकर सदैव गातात असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, रामनामाचा जप करण्यात साधकांनी आळस करु नये, कारण चौर्यांशी लक्ष जन्म-मरणाचे फेरे चुकवणारा हा अगाध मंत्र आहे. रात्रंदिवस वाचेने रामजप करणारा भक्त कळीकाळाला जिंकू शकतो.
८१
देवासी तो प्रिय एक नाम आहे । म्हणोनि तू गाये सदोदित । कळा हे कौशल्य अवघे विकळ । मंगळ मंगळ रामनाम । एका जनार्दनी नाम मुखीं गाता । मुक्ति सायुज्यता पाठी लागे ।
भावार्थ:
साधकाने देवाच्या नामाचा अखंड जप करावा. कारण देवाला एकच गोष्ट अत्यंत प्रिय आहे, ती म्हणजे त्याचे नाम. कोणतीही कला किंवा कौशल्य हे अपूर्ण आहे, रामनाममात्र मंगलदायी, पवित्र आहे. एका जनार्दनी म्हणतात, सायुज्य मुक्ती ही सर्वश्रष्ठ मुक्ती असून मुखाने नाम गाणार्या साधकाला सायुज्यता प्राप्त होते.
८२
अबध्द पढता वेद बाधी निषिध्द । अबध्द नाम रडता प्राणी होती शुध्द । अबध्द मंत्र जपता जापक चळे । अबध्द नाम जपता जड मूढ उध्दरले । स्वधर्म कर्म करिता पडे व्यंग । विष्णु-स्मरणे ते समूळ होय सांग । एका जनार्दनी नाम निकटी । ब्रह्मानंदे भरली सृष्टी ।
भावार्थ:
न समजता अशुध्द उच्चारपध्दतीने वेदांचे वाचन निषिध्द, बाधक मानतात. परंतु नामजपाला शुध्दाशुध्देचे कोणतेही बंधन नाही, नामाने प्राणी शुध्द होतो. चुकीच्या पध्दतीने मंत्राचे पठण केले तर साधक बुध्दीभ्रष्ट होतो तर अजाणता नामजप केला तरी मूर्खच नव्हे तर जड (अचेतन) सुध्दा उध्दरुन जातात. स्वधर्माचे आचरण करतांना काही उणिवा राहून जातात, परंतु विष्णुस्मरणाने सर्व मुळापासून पवित्र होते असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, नामाच्या सान्निध्यात सर्व सृष्टी ब्रह्मानंदाने भरून जाते.