श्रीहरिनाममहिमा
प्राकृतात ग्रंथरचना करण्याची ज्ञानेश्वरापासून चालत आलेली परंपरा नाथांनीही पुढे चालविली.
१
कलियुगामाजीं एक हरिनाम साचें । मुखें उच्चारितां पर्वत छेदी पापांचे ॥१॥ सर्वभावें भजा एक हरिचें नाम । मंगला मंगल करील निर्गुण निष्काम ॥२॥ दोषी अजामेळ तोहि नामें तरला । हरिनामें गणिकेचा उध्दार जाहला ॥३॥ एका जनार्दनीं नाम सारांचे सार । स्त्रियादी अंत्यजा एकदांचि उध्दार ॥४॥
भावार्थ
कलियुगांत हरिनामच केवळ सत्य असून अनंत पापांचे पर्वत छेदून टाकण्याचे सामर्थ्य हरिनामांत आहे. हरिनाम साधकाला निर्गुण, निष्काम करते. पातकी अजामेळ हरिनामाने तरला, गणिकेचा उध्दार झाला. स्त्रिया, अंत्यज यांचा उध्दार करणारे हरिनाम सर्व साधनांचे सार आहे असे एका जनार्दनीं म्हणतात.
२
जगीं तो व्यापक भरूनी उरला । शरण तूं तयाला जाय वेगीं ॥१॥ उघडा मंत्र जाण वदे नारायण । नोहे तुज विघ्न यमदूत ॥२॥ अखंड वाचेसी उच्चार नामाचा ।तेणें कळिकाळाचा धाक नाहीं ॥३॥ एका जनार्दनीं संतसेवेविण । आणिक साधन नाहीं दुजें ॥४॥
भावार्थ
सर्व जगाला पूर्णत:जो व्यापून उरला आहे त्या नारायणाला सर्वभावे शरणागत होऊन नारायण नामाचा अखंड जप केल्याने कळिकाळाचे भय संपून यमदूताचे विघ्न टळेल. नारायण नामाचा महिमा संतसेवे शिवाय कळणार नाही. असे एका जनार्दनीं सुचवतात.
३
नाम ही नौका तारक भवडोहीं । म्हणोनि लवलाही वेग करा ॥१॥ बुडतां सागरीं तारूं श्रीहरी । म्हणोनि झडकरी लाहो करा ॥२॥ काळाचा तो फांसा पडला नाहीं देहीं । म्हणोनि लवलाही लाहो करा ॥३॥ एका जनार्दनीं लाहो करा बळें । सर्वदा सर्वकाळें लाहो करा ॥४॥
भावार्थ
संसार सागर तारून नेणारी नौका म्हणजे श्रीहरिचे नाम! या साठी त्वरा करून नामसाधनेला प्रारंभ करावा. काळाचा फांस देहाला पडण्यापूर्वी सदासर्वदा हरिनाम नौकेचा आसरा घ्यावा असे आवाहन एका जनार्दनीं या अभंगात करतात.
४
सर्वांवरी वरिष्ठ सत्ता । वाचे गातां हरिनाम ॥१॥ साधन सोपें पाहतां जगीं । साडांवी उगी तळमळ ॥२॥ रामनामें करा ध्यास । व्हा रे उदास प्रपंचीं ॥३॥ एका जनार्दनीं मन । करा वज्राहुनी कठीण ॥४॥
भावार्थ
हरिनामजप ही सर्वांत सोपी साधना असून नामजपाने सर्वांवर सत्तासामर्थ्य प्राप्त होते. प्रपंचांत उदासिन वृत्ती धारण करून , मनाची तळमळ शांत करून रामनामाचा ध्यास घ्यावा. मन वज्रासारखे कठीण करून साधनेंत निमग्न व्हावे असे एका जनार्दनीं सांगतात.
५
नामें पाषाण तरले । महापापी उध्दरिले । राक्षसादी आसुर तरले । एका नामे हरिच्या ॥१॥ घेईं नाम सदा । तेणें तुटेल आपदा । निवारेल बाधा । पंचभूतांची निश्चयें ॥२॥ हो कां पंडित ब्रह्मज्ञानी । तरती तारिती मेदिनी । शरण एका जनार्दनीं । नाम उच्चारणीं आनंद ॥३॥
भावार्थ
हरिनामाने महान पापी लोकांचा उद्धार झाला. राक्षसगण, आसूर तरले. हरिनामाने कष्ट, यातना दूर होतात. सर्व संकटे टळतात. पंचभूतांच्या बाधेपासून निवारण होते. महापंडित आणि ब्रह्मज्ञानी स्वता:उध्दरून जातात आणि पृथ्वीवरील अनेकांचा उद्धार करतात. जनार्दन स्वामींना शरणागत असलेले एका जनार्दनीं नामसाधनेंत आनंदाने रममाण होतात.
६
जों विनटला श्रीहरिचरणीं । त्यासी भवबंधनीं श्रम नाहीं ॥१॥ देव उभा मागें पुढें । वारी सांकडें भवाचें ॥२॥ नामस्मरणीं रत सदा । तो गोविंद आवडे ॥३॥ त्याचे तुळणें दुजा नाहीं । एका पाही जनार्दनीं ॥४॥
भावार्थ
जो साधक हरिचरणांना कायमचा जोडला गेला तो भवबंधनात असूनही विश्रांती पावला. देव अशा भक्ताच्या मागे पुढे उभा राहून त्या भक्ताची संकटे दूर करतो. नामस्मरणांत रंगून गेलेला भक्त गोविंदाला आवडतो. तो भक्त अतुलनीय असतो असे एका जनार्दनीं म्हणतात.
७
हरिनामें तरले । पशुपक्षी उध्दरले ॥१॥ ऐशी व्याख्या वेदशास्त्रीं ।पुराणें सांगताती वक्त्रीं ॥२॥ नामें प्रल्हाद तरला । उपमन्यु अढळपदीं बैसला ॥३॥ नामें तरली ती शिळा । तारियेला वानरमेळा ॥४॥ हनुमंत ज्ञानी नामें । गणिका निजधामीं नामें ॥५॥ नामें पावन वाल्मिकी ।नामें अजामेळ शुध्द देख ॥६॥ नामें चोखामेळा केला पावन । नामे कमाल कबीर तरले जाण ॥७॥ नामें उंच नीच तारिलें । एका जनार्दनीं नाम बोले ॥८॥
भावार्थ
हरिनामाने प्रल्हाद सारखा निष्ठावंत भक्त हिरण्यकश्यपू सारख्या महापापी असुराने निर्माण केलेल्या जीवघेण्या संकटातून सुखरूप बाहेर पडून उध्दरून गेला. उपमन्युला अढळपद प्राप्त झाले. पोपटाला रामनाम शिकवतांना घडलेल्या पुण्याईने गणिका निजधामी पोचली. रामनामाच्या अखंड उपासनेनें भक्त हनुमान बुद्धिवंत आणि शक्तिमान हे बनून श्रीराम कार्यांत अग्रणी ठरला. वानरसेनेसह अमर झाला. उफराट्या नामाच्या जपाने वाल्याकोळी वाल्मिकी नामे ऋषीपदाला पोचला. तर अजामेळ शुध्द झाला. चोखामेळा, कमाल कबीर यांसारखे अनेक उंचनीच नामसाधनेने तरले. नामभक्तीने केवळ मानवच नव्हे तर पशुपक्षी आणि जड पाषाण सुध्दां तरले असा नाममहिमा पुराणांत वर्णिला आहे असे एका जनार्दनीं या अभंगात सांगतात.
८
जेथें हरिनामाचा गजर । कर्म पळतसे दूर ॥१॥ नाम निर्दाळी पापातें । वदती शास्त्र ऐशी मतें ॥२॥ पापाचे पर्वत । नाम निर्दाळी सत्य ॥३॥ नामजप जनार्दन । एका जनार्दनीं पावन ॥४॥
भावार्थ
हरिनामाचा गजराने कर्माची बरीवाईट फळे दूर पळतात. पापांचे निर्दालन होते. पांपाचे पर्वत कोसळून पडतात. असे मत साही शास्त्रे मांडतात. हे सत्यवचन असून गुरुमुखातून प्रगट झाले आहे असे सांगून नामजपाने आपण पावन झालो असे एका जनार्दनीं म्हणतात.
N/A
References : N/A
Last Updated : August 31, 2025

TOP