मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत एकनाथांचीं भजनें|
हरिपाठ

हरिपाठ

प्राकृतात ग्रंथरचना करण्याची ज्ञानेश्वरापासून चालत आलेली परंपरा नाथांनीही पुढे चालविली.


हरीचिया दासा हरि दाही दिशा । भावें जैसा तैसा हरि एक ॥१॥ हरि मुखीं गातां हरपली चिंता । त्या नाहीं मागुता जन्म घेणें ॥२॥ जन्म घेणें लगे वासनेच्या संगे । तेचि झाली अंगे हरिरूप ॥३॥ हरिरूप झाले जाणणें हरपलें । नेणणे तें गेलें हरीचे ठायीं ॥४॥ हरिरूप ध्यानीं हरिरूप मनीं । एका जनार्दनीं हरी बोला ॥५॥
भावार्थ
हरीदासांना सारे विश्व हरीरूपाने ओतप्रोत व्यापले आहे असा अनुभव येतो. मुखानें हरीगुण गांत असताना मनाच्या सर्व चिंता हरपून जातात. जन्म-मरणाची येरझार चुकते. विषय वासनेमुळे परत परत जन्म घ्यावा लागतो. या वासनाच हरिरूप होतात. जाणणे, नेणणे यावृत्ती हरिरूपांत विलीन होतात. ध्यानी मनीं केवळ हरीरूप दिसते. असे एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात. 

हरि बोला हरि बोला नाहीं तरी अबोला । व्यर्थ गलबला करूं नका ॥१॥ नको नको मान नको अभिमान । सोडी मीतूंपण तोचि सुखी ॥२॥ सुखी जेणें व्हावें जग निववावें । अज्ञानी लावावें सन्मार्गासी ॥३॥ मार्ग जया कळे भाव भक्तिबळें । जगाचिये मळें न दिसती ॥४॥ दिसती जनीं वनीं प्रत्यक्ष लोचनीं । एका जनार्दनीं ओळखिलें ॥५॥
भावार्थ
मुखाने हरीचे नाम घ्यावे किंवा मौन धारण करावे. मान आणि अभिमान यांचा विचार न करतां मीतूंपणाचा त्याग करणारा सुखी होतो. अजाण लोकांना सन्मार्गाला लावून जगांत शांतता निर्माण करावी. भावभक्तीने योग्य मार्ग सापडला आहे असे अनेक संत प्रत्यक्ष डोळ्यांना दिसतात. असे एका जनार्दनीं म्हणतात. 

जें जें दृष्टी दिसे तें तें हरिरूप । पूजा ध्यान जप त्यासी नाहीं ॥१॥ वैकुंठ कैलासीं तीर्थक्षेत्रीं देव । तयाविण ठाव रिता कोठें ॥२॥ वैष्णवांचे गुह्य मोक्षाचा एकांत । अनंताचा अंत पाहतां नाहीं ॥३॥ आदि मध्य अंतीं अवघा हरि एक । एकचि अनेक एक हरी ॥४॥ एकाग्र जीव तेचि दोन्ही । एका जनार्दनीं ऐसें केलें ॥५॥
भावार्थ
जे जे नजरेस पडते ते ते हरिचेच रूप आहे असा आस्तिक्य भाव ज्याच्या मनांत निर्माण झाला आहे त्याला ध्यान धारणा, जप, पूजाअर्चा या बाह्य उपचारांची गरज नाही. केवळ वैकुंठ, कैलास किंवा तीर्थक्षेत्रीच काय पण सर्व विश्वांत देव अंतर्बाह्य व्यापून राहिला आहे. वैष्णवांच्या हभक्तीचे रहस्य, मुक्तीची शांती आणि अनंत परमात्म्याचा अंत पाहतां येत नाही. विश्व रचनेच्या आदि मध्य व अंती केवळ एकच परमात्म तत्व अस्तित्वात होते. तोच परमात्मा अनंत नामरूपाने विश्वांत भरून राहिला आहे. सद्गुरू कृपेने या हरिरुपाशी एकाग्रचित्त होता आले असे एका जनार्दनीं म्हणतात. 

नामाविण मुख सर्पाचें तें बीळ । जिव्हा नव्हे काळसर्प आहे ॥१॥ वाचा नव्हे लांव जळो त्यांचें जिणें । यातना भोगणें यमपुरी ॥२॥ हरीविण कोणी नाही सोडविता । पुत्र बंधु कांता संपत्तीचे ॥३॥ अंतकाळी कोणी नाहीं बा सांगाती । साधूचे संगती हरि जोडे ॥४॥ कोटिकुळें तारी हरि अक्षरें दोनी । एका जनार्दनीं पाठ केलीं ॥५॥
भावार्थ
हरिनाम ज्याच्या मुखाने गाईले जात नाही ते मुख नसून सापाचे बीळ आहे असे समजावे. या मुखाची वाचा नसून चेटकीण होय. अशा माणसाला यमपुरीच्या यातना भोगाव्या लागतात. पत्नी, पुत्र, भाऊ हे सारे सुखाचे सोबती असून अंतकाळी हरीशिवाय कोणी त्राता नाही. संतसंगतीने हरिभक्तीचे मर्म कळून येते. हरि या दोन अक्षरीं नामानें कोटी कुळांचा उध्दार होतो. या दोन अक्षरी नामाचे सतत स्मरण करावे असे एका जनार्दनीं सुचवतात. 

धन्य माय व्याली सुकृताचें फळ । फळ तें निर्फळ हरिविण ॥१॥ वेदांचेहि बीज हरि हरि अक्षरे । पवित्र सोपारें हेचि एक ॥२॥ योगयाग व्रत नेम धर्म दान ।न लगें साधन जपतां हरि ॥३॥ साधनाचें सार नाम मुखीं गातां । हरि हरि म्हणतां कार्यसिध्दि ॥४॥ नित्य मुक्त तोचि एक ब्रह्मज्ञानी । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
भावार्थ
अनेक चांगल्या कामाचे फळ म्हणून पुत्रलाभ होतो परंतू हरिनाम स्मरणाविना हे पुण्यफल व्यर्थ होय. हरि ही दोन अक्षरे अत्यंत पवित्र आणि वाचेसी सहजसुलभ असून वेदांचे बीज आहेत. हरिनामाचा जप केल्यास योगयाग, व्रत, नेमधर्म किंवा दान यांपैकीं कोणतेही साधन करावे लागत नाही. हरिनाम हे सर्व साधनांचे सार असून सर्व कार्य सिध्दीस जातात. साधक नित्यमुक्त होतो. त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होते असे एका जनार्दनीं म्हणतात. 

बहुतां सुकृतीं नरदेह लाधला । भक्तीविण गेला अधोगती ॥१॥ बाप भाग्य कैसें न सरेचि कर्म । न कळेचि वर्म अरे मूढा ॥२॥ अनेका जन्मांचें सुकृत पदरीं । त्याचे मुखा हरि पैठा होय ॥३॥ राव रंक हो कां उंच नीच याती । भक्तीविण माती मुखीं त्याच्या ॥४॥ एका जनार्दनीं हरि हरि म्हणतां । मुक्ति सायुज्यता पाठी लागे ॥५॥
भावार्थ
अनेक जन्मींच्या पुण्यफलाने मानवीदेह मिळतो परंतू काहींवेळा भक्तिविणा तो अधोगतीला जातो. पूर्वजांच्या पुण्याईने नरदेह मिळत नसून ते कर्मफळ आहे हे मूर्खांना कळत नाही. अनेक जन्म हरिभक्ती केल्याने हरिकृपा होते. धनवान किंवा निर्धन, उच्च अथवा नीच हरिभक्ती विणा जन्म निरर्थक आहे. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, हरिनाम जपाने साधक सायुज्यता मुक्तिचा अधिकारी होऊन नित्य हरीच्या सहवासांत वैकुंठनगरीं वास करतो. 

हरिनामामृत सेवी सावकाश । मोक्ष त्याचे भूस दृष्टीपुढें ॥१॥ नित्य नामघोष जयाचे मंदिरीं । तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र ॥२॥ वाराणशी तीर्थ क्षेत्रा नाश आहे ।अविनाशासी पाहे नाश कैंचा ॥३॥ एका तासामाजी कोटि वेळां सृष्टी । होती जाती दृष्टी पाहे तोची ॥४॥ एका जनार्दनीं ऐसे किती झाले । हरिनाम सेविलें तोचि एक ॥५॥
भावार्थ
ज्या साधकाच्या गृहमंदिरांत नामाचा गजर नित्य सुरू असतो ते च तीर्थक्षेत्र काशी असे मानावे. वाराणसी हे तीर्थक्षेत्र असूनही ते अविनाशी नाही. दृष्टीला दिसणार्या या विनाशी सृष्टींत एका तासांत कोटी वेळा घडामोड होत असते. सृष्टीचे हे विनाशी चक्र स्पष्ट करून एका जनार्दनीं म्हणतात, हरिनाम हे अमृत असून त्याचे सावकाश सेवन करावे. या हरिनाम अमृतामुळे मिळणारा मोक्ष केवळ भुसा आहे. असे अनेक साधक जन्माला आले आणि गेले पण ज्यांनी हरिनामाचे अमृत सेवन केले ते चिरंजीव झाले. 

सत्पद तें ब्रह्म चित्पद तें माया । आनंदपदीं जया म्हणती हरि ॥१॥ सत्पद निर्गुण चित्पद सगुण । सगुण निर्गुण हरिपायीं ॥२॥ तत्सदिती ऐसे पैल वस्तुवरी । गीतेमाजी हरि बोललेले ॥३॥ हरिपदप्राप्ती भोळ्या भाविकांसी । अभिमानियांसी गर्भवास ॥४॥ अस्ति भाति प्रिय ऐशीं पदें तिनी । एका जनार्दनीं तेंचि झालें ॥५॥
भावार्थ
परमेश्वर सत्चिदानंद आहे. त्यातील ब्रह्म हे सत्पद, चित्पद ही माया आणि हरि हा आनंदपदी आहे. ब्रह्म हे निर्गुण माया ही सगुण आणि हरी हा सगुण निर्गुण आहे. तत्सदिती हे परब्रह्म आहे असे भगवंताने गीतेत सांगितले आहे. एका जनार्दनीं म्हणतात, भोळ्या भाविकांना हरिपदाची प्राप्ती होते तर ज्ञानाचा गर्व असणार्या अहंकारी जनांना परत परत जन्म मृत्युचे दु:ख भोगावे लागते. हीच तीन पदे अस्ति, भाति, प्रिय या नावाने ओळखले जातात. 

ओळखिला हरि सांठविला पोटीं । होतां त्याची भेटीं दु:ख कैचें ॥१॥ नर अथवा नारी हो कां दुराचारी । मुखीं गातां हरि पवित्र तो ॥२॥ पवित्र तें कुळ धन्य त्याची माय । हरि मुखें गाय नित्य नेमें ॥३॥ काम क्रोध लाभ जयाचे अंतरीं । नाहीं अधिकारी ऐसा येथें ॥४॥ वैष्णवांचें गुह्य काढिलें निवडुनी । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
भावार्थ
हरिचे सच्चिदानंद स्वरूप ओळखून त्याला आपलासा केला. हरिची भेट होतांच सर्व दु:खांचा निरास झाला. दुर्वतन करणारे स्त्री-पुरूष जर हरिनामाचा जप करतील तर ते पवित्र होतील. नित्यनेमाने हरिभजन करणार्या साधकाचे पवित्र कुळ व जन्मदात्री धन्य होय. ज्याचे अंत:करण वासना, क्रोध, मोह यांनी भरले आहे ते हरिकृपेचे अधिकारी होऊ शकत नाहीत. हरिनाम संकीर्तन हे वैष्णवांच्या हरिभक्तीचे रहस्य असून अखंड हरिनामाचा जप करावा असे एका जनार्दनीं सुचवतात. 
१०
कल्पनेपासुनी कल्पिला जो ठेवा । तेणें पडे गोंवा नेणे हरी ॥१॥ दिधल्यावांचूनि फळप्राप्ती कैची । इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा ॥२॥ इच्छावें तें जवळी हरिचे चरण । सर्व नारायण देतो तुज ॥३॥ न सुटे कल्पना अभिमानाची गांठी । घेतीं जन्म कोटी हरि कैंचा ॥४॥ एका जनार्दनीं सांपडली खूण । कल्पना अभिमान हरि झाला ॥५॥
भावार्थ
आपण मुळातले आत्मतत्व नसून नश्वर देहतत्व आहोत. या विपरित कल्पनेने सारा घोटाळा झाला, त्यामुळे हरिचे सत्य स्वरूप समजले नाही. बीज पेरल्यावाचुन फळाची अपेक्षा ही व्यर्थ कल्पनेची बाधा आहे. हरिचरणांचे सान्निध्य ही एकच इच्छा धरल्यास नारायण सर्व काही देतो. अहंकाराच्या गाठी सुटत नाही तो पर्यंत हरिप्राप्ती न होता कोटी जन्म घ्यावे लागणार. अंतरीच्या सार्‍या कल्पना, अभिमान या हरिस्वरूपी लीन करणे, संपूर्ण शरणागती पत्करणे हीच हरिकृपेची खूण आहे असे एका जनार्दनीं सांगतात. 
११
काय नपूंसका पद्मिणीचे सोहळे । वांझेसी डोहाळे कैचे होती ॥१॥ अंधापुढे दीप खरासी चंदन । सरकार दूधपान करूं नये ॥२॥ क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैंचा । व्यर्थ आपुली वाचा शिणवूं नये ॥३॥ खळाची संगती उपयोगासी नये । आपणा अपाय त्याचे संगें ॥४॥ वैष्णवीं कुपथ्य टाकिलें वाळुनी । एका जनार्दनीं तोचि भले ॥५॥
भावार्थ
नपूंसक व्यक्तीला बत्तीस लक्षणी सुंदर स्त्रीचा शृंगार ज्ञानी ज्ञनिरपयोगी ठरतो. वांझोटीचे डोहाळे ही केवळ कवीकल्पना असते. अंधाला दिवा दाखवणे, गाढवाला चंदन फासणे, सापाला दूध पाजणे या गोष्टी निरर्थक आहेत. ज्याचा आपल्या शब्दावर विश्वास नाही किंवा जो क्रोधाच्या आहारी गेला आहे त्याला हितोपदेश करून आपली वाणी शिणवूं नये. दुष्टांची संगत अपायकारी असल्याने तिचा त्याग करावा. विष्णुभक्त ही सर्व कुपथ्ये आहेत हे जाणून त्यांचा त्याग करतो तो च भला होय असे एका जनार्दनीं या अभंगात स्पष्ट करतात. /, br>
१२
न जायेचि ताठा नित्य खटाटोप । मंडुकी वटवट तैसें ते गा ॥१॥ प्रेमाविण भजन नाकाविण मोती । अर्थाविण पोथी वाचुनी काय ॥२॥ कुंकुंवा नाहीं ठाव म्हणे मी आहेव । भावाविण देव कैसा पावे ॥३॥ अनुतापाविण भाव कैसा सहे । अनुभवें पाहे शोधुनियां ॥४॥ पाहतां पाहणें गेलें तें शोधुनी । एका जनार्दनीं अनुभविलें ॥५॥
भावार्थ
ज्ञानी भक्तांचा अहंकार नित्य खटाटोप करूनही जात नाही, डबक्यातील बेडकाची डराव डराव जशी थांबत नाही. भक्तीभावा शिवाय केलेले भजन, अर्थ न समजता केलेले पोथीवाचन व्यर्थ जाते. नकट्या नाकांत घातलेली नथ शोभा देत नाही. कपाळीं सौभाग्य तिलक नसतांना सौभाग्यवती म्हणवून घेणे हे भक्तीभावा शिवाय देव प्रसन्न व्हावा अशी अपेक्षा करण्यासारखे आहे. संसारिक दु:खाचे चटके सोसल्या शिवाय अनुताप निर्माण होत नाही आणि अनुतापा शिवाय भक्तीभावाची ज्योत पेटणार नाही. या प्रत्यक्ष अनुभवाच्या गोष्टी आहेत असे एका जनार्दनीं स्वानुभवातून स्पष्ट करतात. 
१३
करा रे बापांनो साधन हरींचे । झणीं करणीचें करूं नका ॥१॥ जेणें नये जन्म यमाची यातना । ऐसिया साधना करा काही ॥२॥ साधनांचे सार मंत्रबीज हरी । आत्मतत्व धरी तोचि एक ॥३॥ कोटि कोटि यज्ञ नित्य ज्याचा नेम । एक हरिनाम जपतां घडे ॥४॥ एका जनार्दनीं न घ्यावा संशय । निश्चयेंसी होय हरिरूप ॥५॥
भावार्थ
जे साधन केल्याने जन्म आणि यम यातनांपासून सुटका होईल अशा हरिनाम जपाची साधना करावी. हरि हे परमात्म तत्व असून हरिनामाचा जप हे सर्व साधनांचे सार आहे व सर्व मंत्रांचा बीजमंत्र आहे. कोटी यज्ञाचे फळ केवळ हरिनामाचा जप केल्याने मिळते. या सत्य वचनाचा संशय घेऊ नये. हरिनाम घेऊन हरिरूप व्हावे असे एका जनार्दनीं ग्वाही देतात. 
१४
पिंडीं देहस्थिति ब्रह्मांडीं पसारा । हरिविण सारा व्यर्थ भ्रम ॥१॥ शुक याज्ञवलक्या दत्त कपिल मुनी । हरीसी जाणोनी हरिच झाले ॥२॥ या रे या धरूं हरिनाम तारूं । भवाचा सागरू भय नाहीं ॥३॥ साधुसंत गेले आनंदी राहिले । हरिनामें झाले कृतकृत्य ॥४॥ एका जनार्दनीं दुकान । देतो मोलविण सर्व वस्तु ॥५॥
भावार्थ
मी देह आहे ह्या देहबुध्दीने आत्मतत्वाचा विसर पडतो, हरिविण सारे व्यर्थ जाते. व्यासपुत्र शुकमुनी, याज्ञवल्क , दत्तात्रय, कपिलमुनी यांनी हरिस्वरूप जाणले आणि ते हरीशी एकरूप झाले. भव सागराचे भय संपवण्यासाठीं हरिनामाच्या तारूचा आश्रय घ्यायला हवा. साधुसंतानी हरिनामाचा आनंदाने वसा घेतला आणि ते कृतकृत्य झाले. एका जनार्दनीं म्हणतात, हरिभक्तीच्या पेठेंत कोणतेही मोल न देतां सत्य वस्तू अनुभवास येते. 

N/A

References : N/A
Last Updated : August 31, 2025

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP