मराठी मुख्य सूची|विधी|संस्कार|सोळा संस्कार|सार्थ षोडशसंस्काररत्नमाला|
उपनयनसंस्काराचा निर्णय. उपनयनाचा काल

उपनयनसंस्काराचा निर्णय. उपनयनाचा काल

‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.


उपनयनसंस्काराविषयीं गृहसूत्र - जन्मापासून अथवा गर्भापासून आठवे वर्षी ब्राह्मणाचें उपनयन ( मौंजीबंधन ) करावें. मनुस्मृतींत असें आहे कीं, गर्भापासून आठवे वर्षीं ब्राह्मणाचें, अकरावे वर्षी क्षत्रियाचे आणि बारावे वर्षीं वैश्याचें उपनयन करावें. अशा यथोक्त कालीं बालकाची शरीरप्रकृति चांगली नसली किंवा अन्य कांहीं कारणाने अडचण प्राप्त झाली असली तर, सूत्रकारांनीं ब्राह्मण कुलांतील मुलाला १६ वर्षांचा, क्षत्रियास २२ वर्षांचा व वैश्यास २४ वर्षांचा असा उपनयन करण्याचा अवधि दिला आहे. हा अवधि गेल्यानंतर मात्र पुरुष वेदाध्ययनास अनदिकारी व अयोग्य जाणावा. व अशा अयोग्य पुरुषाशीं कोणता व्यवहार व संबंध ठेऊं नये. आपल्यास ब्रह्मतेज प्राप्त व्हावें अशी इच्छा करणार्‍या ब्राह्मणाचें पांचवे वर्षीं, धनाची इच्छा करणार्‍याचें सहावे वर्षीं, विद्येची इच्छा करणार्‍याचें सातवे वर्षीं, सर्वांची इच्छा करणाराचे आठवे वर्षीं, कांतीची इच्छा करणार्‍याचें नववे वर्षीं मौंजीबंधन करावें ब्राह्मणाचे मौंजीबंधन वसंतऋतूंत करावें. माघापासून ज्येष्ठापर्यंत पांच महिने साधारणपणानें सर्व द्विजाला उक्त होत, असें गर्गऋषीचें वचन आहे. याकरितां वसंत न मिळेल तर शिशिरऋतु व ग्रीष्मऋतू हेही ग्रहण करावेत.
उपनयन करण्याचे अधिकारी -- मुख्य पिता होय; तो नसल्यास आजा, चुलता, भाऊ, सपिंडांतील, तोही नसल्यास गोत्रांतील, तोही नसल्यास आपल्यापेक्षां वयानें वडील असा ब्राह्मण होय. उपनयन करण्यास अधिकारी सांगितले आहेत ते - बटूपेक्षां वयानें अधिक असावेत. कारण वयोज्येष्ठाचें धाकट्यानें उपनयन करण्यास निषेध सांगितला आहे.
उपनयनाचे वेळी मुलाला बृहस्पतीचें बळ इष्ट आहे - गुरु दुसरा, पांचवा, सातवा, नववा, अकरावा या स्थानीं असेल तर मुलाच्या उपनयनाला तसेंच कन्येच्या विवाहास शुभदायक होतो. प्रथम, तृतीय, षष्ठ, दशम, या स्थानीं असतां पूजनानें शुभप्रद होतो. चतुर्थ, अष्टम आणि द्वादश या स्थानीं अशुभदायक होय. मुलाला गर्भापासून अथवा जन्मापासून आठवें वर्ष लागले असतां उपनयन करण्यास मुख्य काल सांगितला आहे; त्यावेळीं गुरुबळ नसतांही शांति करून उपनयन करावें. याप्रमाणेंच चैत्रमासीं मीनस्थ रवि असतां व गुरुबल नसताहीं शांति करून उपनयन करावें. दहा वर्षांपुढें गुरुबलाचा विचार करण्याची जरुर नाहीं. संभवत असतां मुलाच्या बापासही गुरुबल व चंद्रबल हीं पहावींत. जन्मेकरून ब्राह्मण जाणावा; ज्या ब्राह्मणाचे संस्कार झाले तो द्विज होय; जन्माने ब्राह्मन असून संस्कार झालेला व वेदाध्ययन केलेला असा तो श्रोत्रिय होय. उपनयन करणारानें तीन *कच्छ्र प्रायश्चित करावें. कुमारानें तीन कृच्छ्र प्रायश्चित करावें. उपनयनकर्त्यानें उपनयन करण्याचा अधिकार प्राप्त होण्याकरितां गायत्रीमंत्राचा १०१२ जप करावा. कित्येक १२००० जप करितात.
उपनयनाविषयीं वेदीची विचार - उपनयन, विवाह आणि यज्ञ यांच्यासाठीं वेदी करावी. वेदीवांचून होम केला असतां तो कर्मभ्रष्ट होतो, म्हणून उपनयनाचे साठीं वेदी ( बहुलें ) करावी. आचार्याच्या पायानें सहा पावलें लांबी व सहा पावलें रुंदी, चौकोनी, पायर्‍यांनीं युक्त अशी असावी, किंवा बटूच्या हातानें चार हात लांबी व रुंदी असावी आणि हातभर उंच व घराचे डावे बाजूस अशी वेदिका करावी. ज्योतिषरत्नांत सांगितलें आहे कीं, पूर्व, पश्चिम सहा पावलें लांबी आणि दक्षिणोत्तर पांच पावलें रुंदी अशी वेदिका केली असतां बटु शतवर्षायुषी आणि सुखी होतो.
आवळेजावळे यांचा विचार - आवळेजावळे असतील तर एके दिवशी एका मंडपांत एकावारी देखील मंगलकार्य करण्यास हरकत नाहीं.
स्त्रियांचे उपनयन - पूर्वीच्या काळीं स्त्रियांना उपनयन, वेदाध्यायन व गायत्र्युपदेश होत असे. तो पुढे कवि बाणभट्टकृत कादंबरीच्या कालावरून इ. स. ७ व्या शकापर्यंत चालूं असावा असें दिसतें. सारांश जो पर्यंत प्रौढविवाह चालूं होता तो पर्यंत स्त्रियांचा उपनयन संस्कार चालू होता. पुढें बालविवाह सुरूं झाला तेव्हां उपनयनाच्या ठिकाणीं विवाह मानण्यांत येऊं लागला. आता प्रौढविवाह सुरूं झालेले आहेत. म्हणून पुरुषाप्रमाने स्त्रियांचाही हा संस्कार कर्णे अवश्य आहे. त्या योगे सज्ञान स्त्रियांना धार्मिक जबाबदारीची जाणीव होईल.
अनंवश्यकरूढी - उपनयन संस्कारानें ब्रह्मचर्य आश्रम स्वीकारून विद्येस आरंभ करावा लागतो. म्हणून या संस्काराला व्रतबंध असेहि म्हणतात ( व्रत - नियमांचे बंधन ) अशा नियमप्रधान संस्कारांत - अक्षत, भिक्षावळ, वहि, घाणा, इत्यादि गौण गोष्टीला ( दिखाऊ भागाला ) महत्त्व दिल्यामुळें बटूंच्या मनावर आपण भलताच परिणाम घडवितो. बटूने सर्व उत्तेजक गोष्टीपासून अलिप्त राहून योग्य नियमानें वागून शिक्षण घेतले तरच त्याचे भावी आयुष्य यशस्वी होईल. या करितां उपनयनांत अनवश्यकरूढी न करण्याची दक्षता घ्यावी.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP