मराठी मुख्य सूची|विधी|संस्कार|सोळा संस्कार|सार्थ षोडशसंस्काररत्नमाला|
वाग्दान ( वाङनिश्चय ) प्रयोग

वाग्दान ( वाङनिश्चय ) प्रयोग

‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.


आठप्रकारच्या विवाहामध्यें ब्राह्मविवाह हा मुख्य आहे. त्याच्या अंगभूत वाग्दान विधि सांगतो ( वाक् वाणी तिने जे दान = देणे “ कन्या आणि वर यांच्या पालकांनीं बोलून केलेला ठराव ” हा विधी आश्चलायनगृह्यसूत्र व गृह्यपरिशिष्ट यांत सांगितलेला असून सर्व शिष्टलोकांनी करण्याचा आचार आहे. त्याचा प्रकार - ज्योतिष्यानें मुहूर्तग्रंथाच्या आधारे सांगितलेल्या विवाहनक्षत्रादिकांनीं युक्त अशा शुभमुहूर्तावर वरनें अथवा वराच्या बापानें पाठविलेल्या चार अथवा आठ पुरुषांनीं उत्तम पोषाख धारण करून, सुवासिनी, स्त्रियांसह मंगलवाद्यांचा गजर करीत शुभशकुन पाहून कन्येच्या घरीं यावें. आलेल्या सर्वांस स्वागतपूर्वक उत्तम आसनावर बसवावें. सर्वांमध्यें चांगल्या आसनावर ( पाटावर वस्त्र घालून त्यावर ) अलंकार घातलेल्या उत्तम पोषाख केलेल्या अशा कन्येस पूर्वेस तोंड करून बसवावें. तिच्या हातांत नारळ व विडा द्यावा. कन्यापक्षीय मंडळीच्या समक्ष वरपक्षीयांनीं पूर्वेस अथवा पश्चिमेस तोंड करून गणपति अभीष्टदेवता व कुलस्वामी यांचें स्मरण करून, अमुक प्रवरयुक्त अमुक गोत्रांमध्यें उत्पन्न झालेल्या, अमुकाच्या पणतूला, अमुकाच्या नातूला, अमुकाच्या पुत्राला, अमुक नांवांच्या वराकरितां, अमुक प्रवर असलेली, अमुक गोत्रांत उत्पन्न झालेली, अमुकाची पणती, अमुकाची नात, अमुकाची कन्या, अमुक नांवाच्या कन्येला भार्या होण्याकरितां मागीत आहो असें बोलावें.
नंतर कन्यादान करणारानें आपली भार्या, बंधु ह्यांची सम्मति घेऊन माझ्या कन्येला, तुमच्या मुलाकरितां घ्या असें बोलावें. अशीच पुन: दोन वेळां वरपक्षीयांनीं मागणी करावी. कन्यापित्याने देतो, देतो, देतो असें ३ वेळ मोठ्यानें बोलावें. नंतर वराचा पिता इत्यादिकांनीं गंधाक्षता, हळदकुंकू, दोन वस्त्रें, ( साडीचोळी ) अलंकार, तांबूल, पुष्प, शर्करादि भक्ष्य इत्यादिकांनीं कन्येची पूजा करावी. पूजा करितांना नेहेमीच्या संप्रदायाप्रमाणें “ गंधद्वारा० ” “ युवंवस्त्राणि० ” “ हिरण्यरूप:० ” “ या:फ़लिनीर्या ” हे मंत्र म्हणावे.
नंतर कन्यादात्यानें पूर्वेस तोंड करून, कन्येला डावें बाजूस बसवून आचमन करून देश व काल ह्यांचे स्मरण करून, पुढें करावयाच्या विवाहाचें अंगभूत असें वाग्दान मी करीन असा संकल्प करून, त्यांचें अंगभूत गणपति पूजन आणि वरुणपूजन करीन असा संकल्प करून, “ गणानांत्वा- ” ह्या मंत्रानें गणपतीचें पूजन करून, वहिवाट असेल तर “ महीद्यौ:० ” इत्यादि मंत्रानें कलशपूजन इत्यादि करावे, नंतर आपल्या जागेवर कन्यापूजन करणारास ( वरपक्षीय मुख्यास ) बसवून, स्वत: आपण त्याचेपुढें पश्चिमेस तोंड करून बसावें आणि त्यांची गंध, फ़ुलें, विडा इत्यादिकांनीं पूजा करावी व वरपक्षीय मुख्यानेही त्याप्रमाणेंच दात्याची पूजा करावी. नंतर दात्यानें शिष्टाचारानुसार पांच हळकुंडे, पांच सुपार्‍या गंध अक्षतांनीं अलंकृत केलेल्या घेऊन अमुक प्रवर असलेल्या, अमुक गोत्रांत उत्पन्न झालेल्या, अमुकाच्या पणतूला, अमुकाच्या नातूला, अमुकाच्या पुत्राला, अमुक नांवाच्या वराला, अमुक प्रवर असलेली, अमुक गोत्रांत उत्पन्न झालेली, अमुकाची पणती, अमुकाची नात, अमुकाची माझी अमुक नांवाची ही कन्या ज्योतिष्यानें सांगितलेल्या सुमुहूर्तावर देईन असें, वाचेनें मी दिली. असें बोलून दहा प्रकारच्या * दोषांनीं रहित असलेल्या अशा ह्या वराला ही कन्या मी देव, अग्नि व द्विज ह्यांच्या समक्ष देईन असें बोलून, वरपक्षीय मुख्याच्या वस्त्राच्या पदरांत ती सुपारी हळकुंडे इत्यादि घालावींत. “ तदस्तु० ” ह्या मंत्रानें त्या सुपार्‍या बांधून त्याच्या त्यां गांठीवर गंधाक्षत वाहावें. असा आचार चालू आहे.
नंतर त्याप्रमाणेंच हळकुंडे सुपार्‍या ही वरपक्षीय मुख्यानें घेऊन अमुक गोत्राच्या, अमुक वराविषयीं तुम्ही निश्चिंत असा, असें बोलून कन्यापित्याच्या वस्त्राच्या पदरांत घालून त्याची गांठ बांधून त्यावर गंधाक्षत वाहावे.
नंतर दात्यानें ही कन्या वाचेने मी दिली, तुम्ही हिचा पुत्राकरितां स्वीकार केला आहे, म्हणून आतां कन्या पाहण्याच्या कामी तुम्ही निश्चिंत रहा आणि सुखी व्हा असें नवर्‍याचें बापास सांगावें. आणि त्यानें असें म्हणावें कीं, तुम्हीं वाचेनें मला कन्या दिली आहे आणि ती कन्या माझ्या पुत्राकरितां मी घेतली आहे, म्हणून नवरा पाहण्याच्या कामीं तुम्हीं निश्चिंत रहा आणि सुखी व्हा. असें कन्या देणारास सांगावें. भाऊ इत्यादि कन्या स्वीकार करणारे असतील तर तेथें भावाकरितां मित्राकरितां असा शब्दप्रयोग करावा.
नंतर ब्राह्मणांनी “ शिवा:आप:संतु ” इ. बोलून त्यांनीं हें तुमचें बोलणे सर्व सत्य असो, असें बोलून “ समानीव० ” हे दोन मंत्र बोलावेंत.
नंतर दात्यानें पात्रांत असलेल्या धुतलेल्या तांदुळांच्या ढीगावर शची देवतेचें आवाहन करून तिची षोडशोपचारांनीं पूजा करावी. आणि त्या शचीपुढें कन्येनें “ देवेंद्राणि० ” या मंत्रानें प्रार्थना करावी.
नंतर पतिव्रता सुवासिनीकडून नीराजन इत्यादि मंगलकारक कुरवंडी करवावी आणि ब्राह्मणांची गंध, तांबूल इत्यादिकांनी पूजा करावी. नंतर त्या ब्राह्मणांनीं “ हिंकृण्वती० ” इत्यादि आशीर्वादाचे मंत्र पठण करून कन्येच्या मस्तकावर अक्षता टाकावी.
आशीर्वाद मंत्राचें पठण झाल्यावर सर्व कर्म समाप्त करून शिष्टाचाराप्रमाणें दोघां व्याह्यांनीं एकमेकांस भेटून घरीं जावें.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP