मराठी मुख्य सूची|विधी|संस्कार|सोळा संस्कार|सार्थ षोडशसंस्काररत्नमाला|
दत्तपुत्रविधान

दत्तपुत्रविधान

‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.


शौनकानें सांगितलेला ऋग्वेदीयांनीं पुत्रप्रतिग्रह करण्याचा प्रयोग असा कीं, पहिल्या दिवशीं उपवास करावा. वस्त्रे, कुंडले, छत्र, पागोटें, आंगठी, धर्मिष्ठ, वेदजाणणारा वैष्णव असा आचार्य, दर्भाची बर्हि, पळसाच्या समिधा. इतके पदार्थ आणून संग्रह करावा. आपल्या बंधूंना आणि ज्ञातींना यत्नानें बोलावून आणावें. हातांत पवित्र घालून आचमन प्राणायाम करावा. देशकालाचा उच्चार करावा, मला पुत्र नसल्यामुळें पितरांचें ऋण दूर करणें आणि पुंनामक नरकापासून रक्षण करणें या दोन द्वारंनी श्रीपरमेश्वराच्या प्रीतिकरितां शौनकानें सांगितलेल्या विधीनें पुत्र घेण्याचा प्रकार करीन. त्याचे अंगभूत पुण्याहवाचन, आचार्यवरण, आचार्याची मधुपर्कानें पूजा करणें, विष्णूचें भजन, ब्राह्मणांना आणि बंधुवर्गांना भोजन देणें करीन. तेथें अगोदर निर्विघ्नपणानें कार्यसिद्धि व्हावी म्हणून गणपतिपूजन करीन असा संकल्प करून त्याप्रमाणें करावें. आचार्यवरण करून मधुपर्कानें पूजा केल्यानंतर विष्णूची पूजा करावी. पितरांच्या, कुलदेवतांच्या आणि गुरूंच्या प्रीतिकरितां ब्राह्मणांना आणि बंधूंना भोजन द्यावें, अथवा तसा संकल्प करावा. नंतर आचार्यानें देशकालाचा उच्चार करून यजमानाच्या अनुज्ञेनें पुत्र घेण्याच्या विधीच्या अंगभूत होम करीन असा संकल्प करावा. अग्निप्रतिष्ठापर्यंत सर्व कर्म करून अन्वाधान करावें, म्हणजे पृष्ठ ३३ प्यारा १ पासून पृष्ठ ३७ प्यारा ६ “ चक्षुषीआज्येन ” येथपर्यंत स्थालीपाक केल्यावर प्रधान देवतेचा ( अग्नीला सहा वेळां, सूर्यासावित्रीला चरूनें एकवार अग्नि, वायु, सूर्य, प्रजापति ह्यांना तुपानें ) याप्रमाणें उच्चार केल्यावर पृष्ठ ३७ प्यारा ७ “ शेषेणस्विष्ठ० ” येथून पृष्ठ ४३ प्यारा १७ पर्यंत स्थालीपाक करावा त्यांत विशेष अठ्ठावीस मुठी तांदुळाचा मंत्रविरहित निर्वाप करून मंत्रविरहित प्रोक्षण करावें. नंतर ब्राह्मणांसह दात्याजवळ स्वत: समक्ष जाऊन त्याच्या जवळ ब्राह्मणद्वारा ह्याला तूं आपला पुत्र दे अशी याचना करावी. नंतर दात्यानें आचमन प्राणायाम करून देशकालाचा उच्चार करून श्रीपरमेश्वर प्रीतिकरितां पुत्रदान करीन असा संकल्प करावा. गणपतीची पूजा करून यथाशक्ति पुत्र देणाराची चंदनादिकानें पूजा करून “ येयज्ञेन० ” ह्या पांच ऋचा म्हटल्यावर पितरांच्या ऋणांतून दूर करण्याकरितां आणि पुंनामक नरकांतून रक्षण करण्याकरितां व मी आपल्याला श्रीपरमेश्वराची प्रीति व्हावी ह्याकरितां तुम्हांला हा पुत्र मी देतो, हा पुत्र तुमचा आहे माझा नाही आपण हा पुत्र घ्यावा. असें बोलून घेणाराच्या हातावर अक्षतासह उदक घालावें. नंतर प्रतिग्रहीता यानेम म्हणजे घेणाराने “ देवस्यत्वा० ” हा मंत्र म्हणून पुत्राचे दोन हात धरून त्याला आपल्या मांडीवर बसवून “ अंगादंगा० ” या मंत्रेकरून टाळू हुंगावी. नंतर “ युवंवस्त्राणि० ” ह्या मंत्रानें त्या पुत्राला वस्त्र द्यावें, मंत्रविरहित मस्तकाअर पागोटें घालावें, कुंकुमादिकांनी तिलक करावा, “ हिरण्यरूप० ” ह्या मंत्रानें कुंडले घालावीत, छत्रीनें छाया धरलेला असा पुत्र नृत्य, गायन व वाद्य इत्यादिक समारंभानें “ स्वस्तिनोमि० ” हे मंत्र म्हणून आपल्या घरीं आणावा. पुत्र घेणारानें हातपाय धुवून आचमन करावें. अग्नीचे पश्चिमेस मातेच्या मांडीवर आपल्या उजवीकडे पुत्राला बसवून आपण स्वत: आचार्याचें दक्षिणेस बसावें. नंतर आचार्यानेम बर्हिरास्तरणापासून आज्यभागापर्यंत कर्म करून अवदानविधीनें घ्यावा. स्थालीपाक करून नंतर होमाकरितां चरु घ्यावा. नंतर “*यज्त्वाहृदा० स्वस्तिस्वाहा० ” ह्या दोन ऋचा म्हणून शेवटी स्वाहा असें म्हणून अग्नींत एकच आहुति द्याई. यजमानानें हें हवि अग्नीचें आहे माझें नाही असा त्याग करावा. पुन: “ तुभ्यमग्र० ” मंत्र म्हणून स्वाहा असें म्हटल्यावर अग्नींत आहुति द्यावी. यजमानानें हें हवि सूर्यासावित्रीचें आहे माझे नाही असें म्हणावें. पुन: चरु घेऊन “ इसोमोददत्० ” ह्या पांच मंत्रांनी प्रत्येक मंत्रास स्वाहा म्हणून होम करावा. प्रत्येकास सूर्यासावित्रीचें हें हवि आहे असें म्हणावें. नंतर तूप घेऊन “ ॐ भू:स्वा० ॐ भूव:स्वा ॐ स्व:स्वा० ॐ भूर्भुव:स्व:स्वाहा ” यांनी आहुति द्याव्या, स्विष्टकृत् “ निवेद्य ” येथपर्यंत स्थालीपाकाचें कर्म करून होम समाप्त करून आचार्याला धेनु दान करावी, दहा अथवा तीन ब्राह्मणास भोजन घालावे, कर्माची सांगता होवो असें ब्राह्मणांकडून बोलवून ब्राह्मणांचे आशीर्वाद घेऊन केलेलें कर्म ईश्वरास अर्पण करावें. अशा रीतीनें पुत्रप्रतिग्रहप्रयोग संपला.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP