मराठी मुख्य सूची|विधी|संस्कार|सोळा संस्कार|सार्थ षोडशसंस्काररत्नमाला|
विनायकशांति करण्याचा विधि

विनायकशांति करण्याचा विधि

‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.


आपल्या राशीस अनुकूल अशा शुभ नक्षत्रादि यथोक्त सुमुहूर्ताच्या पुण्य दिवशी दिवसां, कर्त्यानें पवित्रकें धारण करून, प्राणायाम करून, देशकालाचा उच्चार करावा. माझ्या अमुक कर्मांत निर्विघ्नफ़ल प्राप्त होण्याकरितां ( अथवा अमुक कामना सिद्ध होण्याकरितां ) विनायकशांति करीन असा संकल्प करावा.
नंतर पृष्ठ ४ ते पृष्ठ २२ ओळं ७ पर्यंत - गणपतिपूजन, पुण्याहवाचन मातृकापूजन, नांदीश्राद्ध हे विधि करून आणि पृष्ठ ५७ ओळ ८ पासून ते पृष्ठ ६२ ओळ ११ पर्यंत आचार्यवरण, पंचगव्यविधि, भूमिप्रोक्षण अग्न्युत्तारण, प्राणप्रतिष्ठा ( विनायक व अंबिका या दोन प्रतिमांची ) करावी.
मध्यभागी शुद्ध मृत्तिकेनें ओटा करून तो गोमयानें सारवून त्या ओट्यावर कुंकुमादिकानें स्वस्तिक करून, त्या स्वस्तिकावर उत्तरेस दशा करून तांबडी बनात ( सकलाद ) आंथरावी. नंतर त्या तांबड्या बनातीवर तिच्या मध्यभागीं, शिवणीच्या लांकडाचा पाट रंधून पाय व तांब्याच्या फ़ुल्या व तांब्याचे खिळे बसवून चांगला सुरेख केलेला असा स्थापन करावा. तो एकच वेळ धुतलेल्या नव्या शुभ्रवस्त्रानें आच्छादित करावा. याला भद्रासन म्हणतात. नंतर त्याच्या सभोवती पूर्वादि चार दिशांस गोमयानें सारविलेल्या शुद्ध जाग्यावर रांगोळी वगैरे घालून पूर्वादिक्रमानें चार स्वस्तिकें काढून त्यावर पुढें सांगितलेल्या क्रमानें पदार्थ ठेवावेत.
प्रथम पूर्वेच्या स्वस्तिक काढलेल्या भूमीस “ महीद्यौ० ” या मंत्रानें स्पर्श करावा, त्यावर “ ओषधय० ” या मंत्रानें सप्तधान्यांचा ढीग करावा. “ आकलशेषु० या मंत्रानें डाग न पडलेला असा स्वच्छ तांब्याचा कलश ठेवावा. “ इमंमेगंगे० ” या मंत्रानें तो कलश तळ्यांतील पाण्यानें किंवा नदी संगमाच्या पाण्यानें भरावा. “ उद्धृतासि० ” या मंत्रानें  ( घोड्याच्या पागेंतील १, हतीखान्यांतील २, वारुळाची ३, नदी संगमांतील ४ आणि स्वच्छ पाणी असलेल्या तळ्यांतील ५ ) अशा पांच प्रकारच्या मृत्तिका टाकाव्या. “ गंधद्वारा० ” या मंत्रानें चंदन, अगुरू, केशर, कस्तुरी कापूर,गोरोंचन इत्यादि सुगंधि द्रव्यें टाकावी. मंत्र न म्हणतां गुग्गुल टाकावा. “ याओषधी:० ” या मंत्रानें सर्वौषधि. “ ओषधय० ” या मंत्रानें यव. “ कांडात्कांडा० ” यानें ओल्या दूर्वा घालाव्या. “ अश्वत्थेव० ” यानें कलशाच्या मुखावर आंबा, उंबर, पिंपळ,वड, जांभूळ या पांच वृक्षांचें पंचपल्लव ( कोमल डाहांळे ) घालावे, “या:फ़लिनी० ” यानें फ़ळ ( सुपारी ). “सहिरत्नानि० ” यानें सोनें, रुपें, माणिक, मोती, पोवळें हीं पंच रत्नें घालावी. “ हिरण्यरूप० ” यानें हिरण्य ( द्रव्य ) टाकावें. “ युवासुवासा:० ”
यानें कलशास सभोंवतीं गंध लेपन करून, सुवासिक पुष्पांची माळा गळ्यास वेष्टन करून, तसेच नवें वस्त्र त्याचे गल्यास वेष्टन करावें “ पूर्णादर्वि० ” यानें तंदुलयुक्त पूर्णपात्र त्यावर ठेवावें. नंतर “ कलशस्य० ” “ देवदानव० ” या मंत्रानीं कलशाची प्रार्थना करावी. याप्रमाणेंच दक्षिणेकडच्या, पश्चिमेकडच्या व उत्तरेकडच्या कलशास करावें.
नंतर चार ऋत्विजांनीं हातांत पवित्र धारण करून, आचमन करून, पूर्वेस मुख करून, चार कलशांवर “ तत्वायामि० ” या मंत्रानें वरुणाचे आवाहन करून, षोडशोपचार पूजा करावी. आचार्यानें भद्रासनाचे पूर्वेंस होमाकरितां स्थंडिल करावें. त्याच्या ईशान्येस वेदिकेवर अथवा पीठावर वस्त्र घालून त्यावर दोन सुवर्ण प्रतिमांचें ठायी विनायकाचें “ तत्पुरुषाय० ” या मंत्रानें व अंबिकेची ‘‘ सुभगायै० ” या मंत्रानें आवाहनादि गंध पुष्प नैवेद्यादि षोडशोपचार पूजा करावी. अपरार्क व हेमाद्रि ग्रंथांच्या मतें त्या दोन प्रतिमांच्या सभोंवतीं प्रतिमांवर अथवा तांदुळांच्या ढीगांवर व्योमकेशादि १५ देवतांची त्या त्या नाममंत्रांनींच आवाहनादि षोडशोपचार पूजा करावी. नंतर होमाकरितां केलेल्या स्थंडिलावर यजमानानें स्थालीपाक पृष्ठ ३३ पासून पृष्ठ ३७ प्यारा ६ “ आज्येन ” येथपर्यंत म्हणून सांगितल्याप्रमाणें अग्नीची स्थापना करावी. नंतर “ अत्रप्रधानं० ” येथून “ एकैकयाचर्वाहुत्या ” येथपर्यंत म्हणून स्थालीपाक पृष्ठ ३७ प्यारा ७ “ शेषेणास्विष्ट० ” येथून पृष्ठ ४४ प्यारा १९ “ अग्नावनुप्रहरेत् ” येथपर्यंत करावा.
नंतर यजमानानें पांढर्‍या मोहर्‍याचें पीठ पाण्यांत कालवून त्यांत गाईचें तूप मिसळून, तें तूप मिसळलेले पांढर्‍या मोहर्‍याचें पिठाचे उटणें सर्वांगास लावावें. नंतर नागकेशरादि सर्वौषधि पाण्यांत वांटून तो सर्वौषधीचा कल्क आणि चंदन, आगरु, कस्तूरी, इत्यादी सर्व गंधांचा कल्क पाण्यांत कालवलेला मस्तकास लेपन करावा. नंतर मंगलकारक ब्राह्मणांचा वेदघोष चालला असतां, पूर्वी सांगितलेल्या वस्त्राच्छादित पीठावर ( भद्रासनावर ) यजमानास आचार्यानें पूर्वेस मुख करून बसण्यास सांगावें. त्याप्रमाणें यजमान भद्रासनावर बसल्यावर चार ब्राह्मणांनी “ स्वस्तिंभवंतोब्रुवंतु ” इत्यादि वचनांनीं स्वगृह्योक्त विधीने पुण्याहवाचन करावें. त्यावेळीं सुशील वस्त्रालंकारांनीं सभ्य असून जिचा पुत्र आणि पति जिवंत आहे, अशा चार सुवासिनी स्त्रियांकडून यजमानास नीराजित करावे, म्हणजे दोन दोन वाती घातलेलीं दोन नीरांजनें तबकांत किंवा ताटांत ठेवून आपणास ओवाळून घ्यावें. त्या स्त्रियांना शिष्टाचाराप्रमाणें कंचुकी वगैरे वस्त्रें द्यावीत.
नंतर उपाध्यायानें उत्तरदिशेस मुख करून, पूर्व दिशेस स्थापन केलेला कलश घेऊन त्यांतील उदकानें यजमानास “ सहस्त्राक्षं० ” हा मंत्र म्हणून अभिषेक करावा. याप्रमाणें दक्षिणेस स्थापन केलेल्या कलशांतील उदकानें “ भगंतेवरुणो ” हा मंत्र म्हणून अभिषेक करावा. आणि पश्चिमेस स्थापन केलेल्या कलशांतील उदकानें “ यत्तीकेशेषु० ” हा मंत्र म्हणून अभिषेक करावा. नंतर उत्तर दिशेस स्थापन केलेल्या चवथ्या कलशांतील उदकानें पूर्वीचे तीन मंत्र म्हणून अभिषेक करावा, अथवा चारी कलशांतील उदकानीं “ एतद्वैपावनं० ” येथून “ सर्वदा ” येथपर्यंत बृहत्पाराशरोक्त मंत्र म्हणून अभिषेक करावा.
नंतर यजमान भद्रासनावर बसलेला असतांच आचार्यानें पूर्वेस मुख करून, यजमानाचे पाठीमागें उभें राहून, डाव्या हातानें मूठभर दर्भ घेऊन, त्या यजमानाचे मस्तकावर आंथरावे. त्या दर्भांनीं आच्छादित केलेल्या मस्तकावर मोहर्‍यांचें तेल उंबराच्या लांकडाच्या स्रुवानें  ( दहा मासे वजन तेल मावेल अशा पळीनें ) घेऊन “ मिताय० ” इत्यादि सहा मंत्रांनीं सहा आहुति द्याव्या. त्याग त्या त्या मंत्रांनींच करावा. अपरार्क ग्रंथाच्या मतानेम शालंकटादि चार आहुति द्याव्यात.
नंतर स्थालीपाक पृष्ठ ४५ प्यारा २० “ तत:श्रृतं० ” येथून पृष्ठ ४७ प्यारा २५ “ ज्वालाग्नौ ” येथपर्यंत करून, पूर्वोक्त “ मिताय० ” इत्यादि सहा मंत्रांनीं सहा चरूच्या आहुति अग्नींत द्याव्यात. त्याप्रमाणें व्योमकेशादि १५ देवतास “ व्योमकेशायस्वाहा ” इत्यादि त्या त्या देवतेचें नाम घेऊन चरूच्या १५ आहुतींनीं अग्नींमध्यें होम करावा. नंतर स्थालीपाक पृष्ठ ४९ प्यारा २८ “ यदस्येति० ” येथून पृष्ठ ५० ओळ १३ “ त्यजेत् ” येथपर्यंत करावा. नंतर अभिषेकशालेमध्यें होम करून, शेष उरलेल्या चरूचा अष्टदिक्पालांस बली ( त्या भाताचे मुटके करून ) अष्ट दिशेस “ इंद्रायनम: अग्नये० यमाय० निरृतये० वरुणाय० वायवे० सोमाय० ईशानायनम: ” ह्या आठ मंत्रांनीं आठ चरूचे बली द्यावेत. आणि ईशान व पूर्व यांच्या मध्यभागी “ ब्रह्मणेनम: अनंतायनम: ”  हे म्हणून दोन चरूचे बली द्यावेत. याप्रमाणें बली द्यावेत.
यजमानानें स्नान करून शुभ्रवस्त्र पुष्प गंध धारण करून, आचार्यास बरोबर घेऊन विनायक अंबिका मूर्तीजवळ यावें. सुपांत पूर्वाग्र दर्भ आंथरून त्या सुपांतील दर्भावर पुढें सांगितलेली उपहार सामग्री ठेऊन “ तत्पुरुषाय० ” व “ सुभागायै० ” हे पूर्वोक्त मंत्र म्हणून विनायकास आणि अंबिकेस ती उपहार सामग्री समर्पण करावी. ( उपहार सामग्री काय काय असावी तें सांगतो - एक वेळ सडलेले तांदूळ, तिळांचें पीठ मिसळलेला भात, वाफ़ दिलेले उडीदाच्या पिठाचे वडे, तांबडे पिंवळे वगैरे अनेक रंगी: पुष्पे, चंदनादि सुगंधि पदार्थ, मीठ मिसळलेलें दूध, सैंधव मिसळलेली दुधाची खीर, दुधाची खीर, मुळे ( शाक विशेष ), पुरणाची पोळी, अनारसे, घीवर, घारगेवडे किंवा पुरी शेवया किंवा वळवट, दहीभात, गुळपापडी, साळीच्या लाह्याचें पीठ, लाडू आणि मोदक याप्रमाणें उपहारसामग्री संपादन करावी. ) नंतर आचमन, फ़ल, तांबूल, दक्षिणा, नीरांजन, पुष्पांजलीनीं पूजा करून पूजामंत्रांनीं मस्तक भूमीस टेकून साष्टांग नमस्कार करावा. नंतर विनायकास आणि अंबिकेस सुगंधि पुष्पयुक्त उदकानें अर्ध्य देऊन दूर्वा आणि शिरसाच्या झाडाची फ़ुलें अंजुळीभर घेऊन ती अंजुळी विनायकास आणि अंबिकेस वाहून “ रूपंदेहि० सौभाग्यमं० गणेशमातरं० ” या मंत्रांनीं उपस्थान ( स्तुति ) करावे.
नंतर शेष उरलेली उपहार सामग्री सुपांत दर्भ आंथरून त्या दर्भ आंथरलेल्या सुपांत ठेऊन तें सूप चव्हाट्यावर ( जेथून चहूंकडे चार वाटा फ़ुटतात अशा जागेवर ) उदक प्रोक्षण करून “ *बलिंगृण्हंत्विमे० ” इत्यादि मंत्र म्हणून तो बली ठेवावा.
नंतर यजमानानें हातपाय धुवून घरांत येऊन आचमन करावें. पूर्णाहुति द्यावी. आचार्यादि ब्राह्मणांची पूजा करून धोतरजोडा दक्षिणा द्यावी. यथाशक्ति सुवर्ण दक्षिणाही द्यावी. स्थापित देवतांचे उत्तरपूजा करून विसर्जन करून आचार्यास भूयसी दक्षिणा द्यावी. नंतर स्थालीपाक पृष्ठ ५० प्यारा ३० “ ततस्तंडुल० ” येथून पृष्ठ ५३ पर्यंत सर्व संपवावा. सांगतासिद्ध्यर्थ भोजन, दक्षिणेसहित ब्राह्मण भोजन घालावें. अशा रीतीनें विनायकशांति प्रयोग संपला.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP