स्कंध ४ था - अध्याय ३१ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


अध्याय ३१ वा
२३०
मैत्रेय बोलती प्रचेत्यांसी अंतीं । ईशवचनाची स्मृति होतां ॥१॥
कांतेसी स्वाधीन करुनि पुत्रांच्या । गेले जाजलीच्या आश्रमांत ॥२॥
पश्चिमसागरतीरीं ब्रह्मसत्र । आरंभूनि चित्त करिती स्थिर ॥३॥
पुढती नारद पातले त्या ठाईं । प्रचेते त्या पाईं नम्र होती ॥४॥
शिवविष्णूंनीं जें बोधिलें म्हणती । प्रंपंचें विस्मृति झाली त्याची ॥५॥
यास्तव नारदा, होईं कृपायुक्त । करीं आत्मबोध आम्हांप्रति ॥६॥
वासुदेव म्हणे संक्षेपे नारद - वचन समस्त कथितों ऐका ॥७॥

२३१
प्रचेतेहो, सर्वकर्मसमर्पण । करी तोचि धन्य जगीं एक ॥१॥
विप्रकुळीं जन्म गायत्रीउपदेश । तयाहूनि व्यर्थ यज्ञादीही ॥२॥
युक्ति-बुद्धि वेदाध्ययनादि तेंही । सांख्य योगादीही सकळ व्यर्थ ॥३॥
अच्युतपूजनें सकल पूजन । सर्वही त्याविण व्यर्थ यत्न ॥४॥
मूळसिंचनें ते पुष्टि जैं वृक्षासी । ईशपूजा तैसी सकळां मूळ ॥५॥
उत्पत्तिसमयीं पृथक्‍ भास जरी । तद्रूपचि परी सकळ विधि ॥६॥
अभ्रें, अंधकार, प्रकाश, नभांत । त्रिगुण तैसेच परब्रह्मीं ॥७॥
निमित्त तो काळ उपादान माया । कर्ता विश्वासी या पुरुषरुपें ॥८॥
वासुदेव म्हणे एकचि बहुधा । होऊनि विश्वाचा करी खेळ ॥९॥

२३२
अंतर्यामी तो व्यापक । आठवावा अहोरात्र ॥१॥
दयाभाव अभेदानें । तोष यदृच्छालाभानें ॥२॥
शांत राखावीं इंद्रियें । ऐसा सर्वदा जो राहे ॥३॥
तया ईश्वर प्रसन्न । होऊनियां पुरवी काम ॥४॥
भक्तीनेंचि चित्तशुद्धि । वासनादि मलनिवृत्ति ॥५॥
निदिध्यासें प्रगटे हरी । नित्य वसे तो अंतरीं ॥६॥
थोर योग्यता तयांची । ईश्वरासी चिंता त्यांची ॥७॥
करी दुष्टांसी शासन । भक्तांस्तव नारायण ॥८॥
भक्तांहूनि प्रिय कांही । नसे जगीं तया कांहीं ॥९॥

२३३
मैत्रेय बोलती विदुरा, यापरी । नारद बहुपरी करुनि बोध ॥१॥
जातां ब्रह्मलोकीं ईश्वराचें ध्यान । प्रचेते करुन मुक्त झाले ॥२॥
शुक महामुनि म्हणती परीक्षिता । उत्तानपादाचा कथिला वंश ॥३॥
प्रियव्रत तोही नारदोक्त बोध । ऐकूनियां राज्य करुनी मुक्त ॥४॥
परीक्षिता, ऐसें गुणगानयुक्त । मैत्रेय क्षत्त्यास कथिती वृत्त ॥५॥
ऐकूनि तें क्षत्ता सद्गदित होई । अश्रुपूर येई नयनीं त्याच्या ॥६॥
मैत्रेयचरणीं ठेवूनि मस्तक । घेऊनि निरोप सदनीं गेला ॥७॥
राया, हे चरित्र श्रवण पठण - । करील तो धन्य पूर्णकाम ॥८॥
वासुदेव म्हणे चतुर्थ हा स्कंध । समाप्त, मुकुंदचरणीं अर्पूं ॥९॥

इतिश्रीवासुदेवकृत अभंग-भागवताचा स्कंद ४७ वा समाप्त.
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥

N/A

References : N/A
Last Updated : November 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP