स्कंध ४ था - अध्याय १९ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१३०
पुढती पृथूनें ब्रह्मावर्त क्षेत्रीं । पुर्ववाहिनी ती सरिता जेथ ॥१॥
तयास्थानीं केले बहुतचि यज्ञ । देवेंद्र त्या विघ्न करी अंतीं ॥२॥
साक्षात्‍ ब्रह्मा, विष्णु, प्रगटती तेथें । नित्य गंधर्वाचें गान चाले ॥३॥
कपिल, नारद, सनकादि योगी । अनुगामी होती नृपाळाचे ॥४॥
कामधेनूसम पृथ्वी करी साह्य । नद्या रस सर्व अर्पिताती ॥५॥
पुष्पें, फळें, मधु अर्पिताती वृक्ष । रत्नराशी थोर सिंधु देई ॥६॥
चतुर्विध अन्न गिरिराज देती । न्यून पुरविती सकळ जन ॥७॥
वासुदेव म्हणे अपूर्व तो थाट । पाहूनियां द्वेष करी इंद्र ॥८॥

१३१
भस्मधारी जटाधर । पुरुषवेषें आला इंद्र ॥१॥
करी यज्ञाश्वहरण । अत्रि करिती अवलोकन ॥२॥
पृथुपुत्रासी तें वृत्त । कथितां धांवे तो नभांत ॥३॥
पाहूनियां जटाधारी । बाण आपुलां आंवरी ॥४॥
ओरडूनि तदा अत्रि । म्हणे महेंद्रा निवारीं ॥५॥
ऐकूनि तें पृथुपुत्र । धांव घेई अंगावर ॥६॥
दशकंठावरी जेंवी । जटायु तो धांव घेई ॥७॥
पाहूनियां होई गुप्त । इंद्र सोडूनियां अश्व ॥८॥
‘जिताश्च’ हें नाम तदा । प्राप्त होई पृथुपुत्रा ॥९॥
वासुदेव म्हणे इंद्र । नेई पुनरपि अश्व ॥१०॥

१३२
कपाल खट्वांग धारण करुनि । होऊनियां मुनि इंद्र येई ॥१॥
जिताश्व त्यावरी धांवूनियां जातां । भ्रम त्याच्या चित्ता साधुवेषें ॥२॥
अत्रि तयाप्रति करिती सावध । बहुवार इंद्र ऐसें करी ॥३॥
पाखंडी पाखंड रुपें तीं धरती । प्रसार करितीं पाखंडाचा ॥४॥
वक्तृत्वकुशल जन हे पाखंडी । मोहिती जनांसी अल्प काळ ॥५॥
स्वयेंचि नृपाळ अंतीं घेई चाप । तयासी ऋत्विज निवारिती ॥६॥
मंत्रबळें आम्ही पाचारुं तयासी । हवन म्हणती करुं त्याचें ॥७॥
वासुदेव म्हणे सिद्ध होतां मुनि । निवारी येऊनि ब्रह्मा तयां ॥८॥

१३३
ब्रह्मा म्हणे इंद्र सर्व देवरुप । निर्मिलें पाखंड कैसें पहा ॥१॥
शतमख जरी पृथु न जाहला । इंद्राहूनि झाला कीर्तिवंत ॥२॥
स्वीकारीं तूं नृपा, आतां मोक्षमार्ग । इंद्रावरी क्रोध न करीं ऐसा ॥३॥
ईश्वरांश तुम्हीं दोघेही नृपाळा । ओळखीं आपुला जन्महेतु ॥४॥
निवारील दैव आपुले जे यत्न । आग्रहें ते पूर्ण न होतीचि ॥५॥
वासुदेव म्हणे रायासी प्रत्यक्ष । ब्रह्माचि निवृत्त करीतसे ॥६॥

१३४
ब्रह्मा म्हणे वेनकृत तो अधर्म । निवारुनि धर्म वाढवावा ॥१॥
अवतारहेतु जाणूनि हा नृपा । न करीं इंद्राचा द्वेष ऐसा ॥२॥
पाखंडमताचा प्रचार तो करी । विघ्न धर्मावरी जाण - तेंचि ॥३॥
इंद्रद्वेषें ऐसी अधर्माची वृद्धि । कारण तयासी तूंचि होसी ॥४॥
यास्तव इंद्रासी जोडूनियां सख्य । पाखंडाचा नाश करीं वेगें ॥५॥
ऐकूनि तें राव जोडी इंद्रसख्य । स्नान अवभृथ करी हर्षे ॥६॥
ऋत्विजांसी प्रेमें अर्पूनि दक्षिणा । आशीर्वाद नाना ग्रहण करी ॥७॥
वासुदेव म्हणे श्रेष्ठ ईश्वरेच्छा । व्यर्थ मानवाचा पराक्रम ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP