स्कंध ४ था - अध्याय २५ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१८२
प्रचेते त्यापरी आचरिती तप । इकडे बर्हिषद कर्मासक्त ॥१॥
दयाळु नारद पाहूनि तयासी । सिद्धान्त निवेदी वेदान्ताचा ॥२॥
देवर्षि तयासी पुशिती कर्माचा । हेतु संसाराचा लाभचि कीं ॥३॥
सामान्यासम ही अपेक्षा तुजसी । शोभे न हें चित्तीं चिंतीं नृपा ॥४॥
राव म्हणे नित्यकर्मे कर्ममग्न । जाहलों मी ज्ञान कथा मज ॥५॥
मुने, पुत्र वित्त मानूनि पुरुषार्थ । तयांतचि चित्त रमुनी जाई ॥६॥
तदा दिव्यदृष्टि देऊनि नृपासी । नारद दाविती मृत पशु ॥७॥
म्हणती हे सर्व तव मरणाची । वाटचि पाहती सूडभावें ॥८॥
वासुदेव म्हणे पुरंजनवृत्त । कथिती नारद नृपाळासी ॥९॥

१८३
पुरंजन नामें सुविख्यात राजा । अविज्ञात त्याचा मित्र एक ॥१॥
अविज्ञात त्याचीं सकलही कृत्यें । शोधी सुस्थळातें पुरंजन ॥२॥
सकलही भूमि शोधिली तयानें । पुढती महायत्नें गवसे स्थळ ॥३॥
हिमगिरीच्या तें दक्षिणप्रदेशीं । होतें भरतखंडीं नगर रम्य ॥४॥
पुरासी त्या होतीं भव्य नवद्वारें । तटही शोभले सभोंवती ॥५॥
रम्य उद्यानें तैं गोपुरें विशाल । खंदक गभीर भोंवतालीं ॥६॥
गवाक्षें कमानी अपूर्वचि होत्या । कथी वृत्त ऐका वासुदेव ॥७॥

१८४
प्रासाद ते रमणीय । कळस त्यांचे धातुमय ॥१॥
भूमि रत्नमय तेथें । नवरत्नांनीं विराजे ॥२॥
शोभा भोगावतीसम । नगररचना मनोरम ॥३॥
अंतर्बाह्य विषयांचा । लाभ सहज घडे साचा ॥४॥
जागजागीं रम्य पीठें । मार्गी चौक मोठमोठे ॥५॥
सन्निधचि क्रीडास्थानें । तेंवी बहु पुण्यस्थानें ॥६॥
बहु विलासमंदिरें । तैसीं विश्रांतीचीं स्थळें ॥७॥
ध्वजा पताका तोरणें । काय वर्णावीं उपवनें ॥८॥
वासुदेव म्हणे भृंग । मकरंदपानीं गुंग ॥९॥

१८५
निर्झरावरुनि वाहे वसंतींचा वारा ॥ सिंचूनि सर्वांगीं सौख्यें देतसे तुषारां ॥१॥
वृक्षलता मृणालिनी डोलती आनंदें ॥ कळप मृगांचे बहु बागडती मोदें ॥२॥
मंजुळ पिकांचा शब्द वाटे पाचारण ॥ ऐकूनि पांथस्थ येती पहाया उद्यान ॥३॥
वासुदेव म्हणे राजा ऐशा उपवनीं ॥ पाही रुपवती एक कोमल तरुणी ॥४॥

१८६
सेवेसी तियेच्या एकादश दूत । जयां उपदूत बहुत होते ॥१॥
संरक्षण तिचें करी एक फणी । फणा उभारुनि भव्य पांच ॥२॥
पतिसंशोधनीं दंग ते भासली । तारुण्याची कळी उमलूं लागे ॥३॥
अहो, लावण्य तें मज न वर्णवें । सर्वांगी शोभले अलंकार ॥४॥
आंवरीत चाले पदर आपुला । तोरडयांचा आला मंजु नाद ॥५॥
पाहून नृपासी होऊनि मोहित । फेंडिले कटाक्ष मंद हास्यें ॥६॥
लज्जायुक्त हावभाव ते पाहून । विव्हल मोहूण पुरंदर ॥७॥
वासुदेव म्हणे प्रमदाकटाक्ष । बाधती न ज्यास तोचि धन्य ॥८॥

१८७
पुरंजन तिजसी म्हणे । कोण कोणाची तूं धन्ये ॥१॥
सांग आलीस कोठूनि । काय हेतु धरुनी मनीं ॥२॥
परिवार हा कोणाचा । परिचय कथीं त्यांचा ॥३॥
मूर्तिमंत दिससी लज्जा । मार्ग शोधिसी कोणाचा ॥४॥
प्रत्यक्षचि तूं पार्वती । अथवा लक्ष्मी सरस्वती ॥५॥
परी कल्पना या व्यर्थ । कासया त्या येती एथ ॥६॥
लाजूं नको पाहीं वरी । मज आनंदानें बरीं ॥७॥
कामपीडित मी झालों । हास्यें मोहूनियां गेलों ॥८॥
वासुदेव म्हणे राव । बोले व्याकुळ हृदय ॥९॥

१८८
काकुळतीची ते ऐकूनि विनंती । आनंदें युवती हंसली गालीं ॥१॥
स्वयेंचि ते लुब्ध होती नृपावरी । अनुमती करी व्यक्त हर्षे ॥२॥
म्हणे आमुचा न पिता मज ठावा । जाणतें या ठाया वास अद्य ॥३॥
मित्र मैत्रिणी हे रक्षी मज सर्प । होतांचि निद्रिस्थ सर्वकाल ॥४॥
भाग्येंचि नृपाळा, भेटलासी मज । सपरिवारें तुज सेवीन मी ॥५॥
विषयेच्छा तव पुरेल यथेच्छ । शत वर्षे एथ वास करीं ॥६॥
अन्य सर्व लोक पशु मी मानितें । कल्पना न त्यांते परलोकाची ॥७॥
वासुदेव म्हणे यापरी युवती । बोले नृपाळासी मनोभावें ॥८॥

१८९
धर्म, अर्थ, काम, मोक्ष । नृपा, साधिसील एथ ॥१॥
वंशवृद्धीही होईल । कीर्ति सर्वत्र पसरेल ॥२॥
केवळ अद्वैतनिमग्ना । सुखाची न या कल्पना ॥३॥
सर्वश्रेष्ठ हें गार्हस्थ । कथिती वेदवेत्ते नित्य ॥४॥
उदार तूं रसिक, भोक्ता । अबलादु:खनिवारिता ॥५॥
साक्षात्‍ भाससी मदन । तुज अव्हेरील कोण ॥६॥
बोलूनियां ऐशापरी । गेलीं उभयतां नगरीं ॥७॥
वासुदेव म्हणे ऐसा । झाला संकल्प तयांचा ॥८॥

१९०
शत वर्षे हर्षे राहिलीं त्या स्थानीं । निवारी र्‍हदिनी ताप त्यांचा ॥१॥
अधोभागीं दोन ऊर्ध्वभागीं सप्त । द्वारें त्या पुरास ऐसीं नऊ ॥२॥
पूर्वाभिमुख त्या हातांमाजी पांच । दक्षिणोत्तरेस अन्य दोन ॥३॥
आविर्मुखी तेंवी खद्योता पूर्वेसी । द्वारें एकत्र तीं जोडूनियां ॥४॥
‘द्युमान्‍’ मित्रेंसे विभ्राजित देशीं । जाई त्या द्वारेंचि पुरंजन ॥५॥
तैशाचि एकत्र ‘नलिनी’ ‘नालिनी’ । अवधूता घेऊनि नृपश्रेष्ठ ॥६॥
सौरभप्रदेशीं गमन तो करी । वृत्त हें उद्धरी वासुदेवा ॥७॥

१९१
‘मुख्या’ नामें वेस एकचि ते जरी । मार्ग तेथ परी होते दोन ॥१॥
‘बहूदन’ तेंवी ‘आपण’ प्रदेशीं । रसज्ञ ‘विपणा’ सी मित्रां नेई ॥२॥
पितृहू देवहू दक्षिणोत्तर त्या । वेशीही नृपाच्या आवडत्या ॥३॥
दक्षिण उत्तरपंचाल प्रदेशीं । जाई श्रुतधरेंसी पुरंजन ॥४॥
पश्चिमवेशी त्या निवेदितों आतां । ग्रामक प्रदेशा ‘आसुरी’ ते ॥५॥
‘दुर्मद’ नामक मित्र तेथें नेई । ‘वैशसा’ सी नेई ‘लुब्धक’ ते ॥६॥
अंत्यवेशीसी त्या निऋति हें नांव । वृत्त वासुदेव पुढती कथी ॥७॥

१९२
‘पेशस्कृत’ तेंवी ‘निर्वाक’ नामक । पुरींत त्या अंध होते दोन ॥१॥
निर्वाकाच्या पृष्ठीं बैसे पुरंजन । पेशस्कृत काम करी त्याचें ॥२॥
अंत:पुरीं नेई मंत्री विषूचीन । हर्षे रतिकर्म आचराया ॥३॥
पुरंजन ऐसा रंगला संसारीं । हर्ष शोक करी पुत्रांस्तव ॥४॥
विषयलंपट होऊनियां अंतीं । देवचि कांतेसी मानी जणु ॥५॥
वासुदेव म्हणे आसक्त जो नर । खर तो साचार विषयांचा ॥६॥

१९३
पुरंजन ऐसा कांतापराधीन । कथील तें कर्म करुं लागे ॥१॥
आसन, भोजन तेंवी मद्यपान । गायन वादन नृत्यादिक ॥२॥
करील ती तेंचि आनंदें करावें । रडतां रडावें हंसतां हास्य ॥३॥
पाही तें पहावें धांवतां धांवावें । थांबतां थांबावें तत्काळचि ॥४॥
बैसावें ऐकावें शयन करावें । शोकाकुल व्हावें करितां शोक ॥५॥
प्रसन्न ती होतां आनंदें नाचावें । प्रलाप करावे प्रलापतां ॥६॥
ऐसा पराधीन विवेकहीन । होई पुरंजन मोहवश ॥७॥
वासुदेव म्हणे वंचना यापरी । जाहलीसे पुरी नृपाळाची ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP