स्कंध ४ था - अध्याय ११ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


९०
करुनियां आचमन । नारायणास्त्रसंधान - ॥१॥
करितांचि, ज्ञानें क्लेश - । निवारण जैं क्षणांत ॥२॥
तैसी नष्ट झाली माया । नवल होई तया ठाया ॥३॥
शिरती वनांत मयूर । शब्द उच्चारीत घोर ॥४॥
अस्त्रसंयुक्त ते बाण । घेती गुह्यकांचे प्राण ॥५॥
उभारुनि फणी सर्प । जेंवी दापिती गरुडास ॥६॥
तेंवी यक्ष ध्रुवावरी । जातां अवस्था जाहली ॥७॥
वासुदेव म्हणे रणीं । चमत्कार तया क्षणीं ॥८॥

९१
यक्ष गुह्यकांची पाहूनी ते स्थिति । स्वायंभुवाप्रति खेद वाटे ॥१॥
मुनींसवें पितामह तो ध्रुवाचा । प्रगटला साचा तयास्थानीं ॥२॥
म्हणे बाळा, आतां आंवरीं हा क्रोध । घोर पापरुप नरक थोर ॥३॥
क्रोधावेशें बहु फंसती पुण्यजन । ऐसें निंद्यकर्म तुज न शोभे ॥४॥
एकास्तव ऐसा वध अनेकांचा । न्याय्य नसे साचा ध्यानीं घेईं ॥५॥
देहात्मभाव हा शोभे न तुजसी । कैसी आत्मबुद्धि त्यजिसी अद्य ॥६॥
वासुदेव म्हणे पितामह बोध । ऐकावा पौत्रास करी काय ॥७॥

९२
बाळा, बाळपणीं ईश्वराधन । करुनि तें स्थान संपादिलें ॥१॥
कलहनिवृत्त करावें तूं जनां । काय ऐशा कर्मा प्रवर्तसी ॥२॥
दया, क्षमा, शांति तेंवी समदृष्टी । केंवी विसरसी समूळ ते ॥३॥
तयाचि सद्‍गुणें ईश्वरानुग्रह । माया न अपाय करी जेणें ॥४॥
शाश्वत तो आत्मा देह हा मायक । चलन तयास आत्मयोगें ॥५॥
चुंबकसान्निध्यें लोहासी चलन । तैसेंचि हे जाण विश्व सारें ॥६॥
ईशेच्छा, तैं गुणक्षोभक हा काल । क्रमानें सकल घडवी कार्ये ॥७॥
कोणाही कार्या वा व्यक्तीसी कारण । मानीं तें अज्ञान जगामाजी ॥८॥
वासुदेव म्हणे पौत्राप्रति बोधी । भेदभाव त्यागीं स्वायंभुव ॥९॥

९३
पिता जन्म देई, लुबाडी तस्कर । घात करी क्रूर म्हणती जनीं ॥१॥
परी ईश्वराचे खेळ ते जाणावे । तत्त्व ध्यानीं घ्यावें सद्विचारें ॥२॥
हालवूनि सूत्रें बाहुल्या नाचवी । तैसी हे जाणावी सकल क्रिया ॥३॥
बद्धचि बाहुली भासे करी साच । तैसा काळपाश उपजतांचि ॥४॥
जन्मतांचि मृत्यु, चिंतितां कळेल । बाहुलीचे खेळ जाणी न ती ॥५॥
कर्त करविता काल भगवान । स्वभाव तैं कर्मसंज्ञा तया ॥६॥
कोणी दैव कोणी मानिती त्या काम । पूर्व कर्मासम खेळवी तो ॥७॥
यास्तव यक्षानें बंधु न वधिला । कारण सकलां काल असे ॥८॥
वासुदेव म्हणे मृत्यु अभक्तांसी । मोक्षश्री भक्तांसी अर्पी प्रभु ॥९॥

९४
मर्मभेदक ज्या वचनें तूं बाळा । भजूनि गोपाळा हर्षलासी ॥१॥
समभाव जेथें, ईश्वर त्या ठायीं । चिंतितां हें जाई भेदभाव ॥२॥
शास्त्रवचणें हा नष्ट करीं क्रोध । भयकारी रोग जाणें यासी ॥३॥
अविचार आजि कैलासी हा थोर । कोपतां कुबेर यक्षराज ॥४॥
घोर विघ्न येई यास्तव तयासी । शरण जा आधीं क्षमा मागें ॥५॥
सद्विचारी ध्रुव ऐकूनि तो बोध । वंदी तातपाद अत्यादरें ॥६॥
वासुदेव म्हणे गेला स्वस्थानासी । बोध स्वपौत्रासी करुनि मनु ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP