स्कंध ४ था - अध्याय २ रा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१२
महासमारंभ्ह एकदां दक्षानें । आरंभिला यत्नें सुमंडपी ॥१॥
सर्व देव ऋषि पातले त्या ठाईं । दक्ष स्वयें येई मंडपांत ॥२॥
उत्थापन तया देती सकळीक । विरंची त्र्यंबक उठले नाहीं ॥३॥
जामात आपुला असूनि शंकर । अवमान थोर करी माझा ॥४॥
मानूनियां ऐसें दक्ष होई क्रुद्ध । बोलला सभेंत विदुरा, ऐकें ॥५॥
वासुदेव म्हणे पांघरुनि तत्व । अहंभाव नृत्य जगतीं करी ॥६॥

१३
सभ्यहो, न माझा माना अविचार । अथवा मत्सर वदतों तेणें ॥१॥
थोरांचें वर्तन कथितों तुम्हांसी । लोकपालकीर्ति नष्ट अद्य ॥२॥
सभ्याचारासी हा कलंक शंकर । निर्लज्ज सगर्व उठला नाहीं ॥३॥
अयोग्य न कीं हा ऐसा अवमान । सावित्रीसमान कन्या सती ॥४॥
देव-ब्राह्मणांच्या समक्ष तियेसी । वरिलें तदाचि शिष्य माझा ॥५॥
तदा प्रभृति हा उत्थापना योग्य । वर्तन अयोग्य परी याचें ॥६॥
वासुदेव म्हणे विकारांसी धर्म । होई पांघरुण कदा ऐसें ॥७॥

१४
क्रोधाकुल तदा दक्ष । निंदी शिवासी सभेंत ॥१॥
म्हणे याची नीच कृति । मजलागीं ज्ञात होती ॥२॥
कन्या अर्पूं नये ऐसा । यास्तवचि हेतु होता ॥३॥
स्वप्नींही न या शुचित्व । हिंडे स्मशानीं विवस्त्र ॥४॥
भूतप्रेतांची या प्रीति । सर्वांगातें राख फांशी ॥५॥
सदा पिंजारले केश । माळा हाडांच्या गळ्यांत ॥६॥
भृंगापानें सदा धुंद । रुचे उन्मत्तांचा संग ॥७॥
नाम मात्र शिव ऐसें । परी अशिव मूर्ति साजे ॥८॥
तमोगुणी प्रमथनाथ । यासी मर्कटाचे नेत्र ॥९॥
सुकुमार ते हरिणाक्षी । ब्रह्मवचें कन्या यासी - ॥१०॥
दिधली, परी पश्चात्ताप । होई कथितों हे स्पष्ट ॥११॥
वासुदेव म्हणे ऐसें । क्रूर वचन दक्षाचें ॥१२॥

१५
विदुरा, यापरी अवमान होतां । अवाक्षर तदा न वदे शिव ॥१॥
शांतपणे स्वस्थ बैसले शंकर । तेणें अनावर क्रुद्ध दक्ष ॥२॥
शंकरासी शाप द्यावया सज्जला । निवारितां झाला नाहीं शांत ॥३॥
सोडूनि उदक म्हणे या अधमा । हविर्भाग यज्ञामाजी नसो ॥४॥
बोलूनियां ऐसें दक्ष सोडी स्थान । क्रोधें तैं वचन वदला नंदी ॥५॥
निर्वैर शिवासी शापिलें जयानें । व्याप्त तो अज्ञानें होवो सदा ॥६॥
परोक्षवचन मानितो हा सत्य । सर्वदा लंपट विषयीं होवो ॥७॥
उन्मत्त हा वर्ते मत्त अजासम । तेणें तें वदन त्वरित पावो ॥८॥
वासुदेव म्हणे नंदी क्रोधावेशें । बोलला विप्रातें शापवाणी ॥९॥

१६
मुग्ध राहूनियां अप्रत्यक्ष निंदा । अनुमोदिती त्यांचा न टळो जन्म ॥१॥
भक्ष्याभक्ष्याचा त्या न राहो विवेक । उदरभरणार्थ विद्या यांची ॥२॥
देहात्मवादें हे भ्रमतील मही । सुखार्थचि पाहीं यत्न यांचे ॥३॥
ऐकूनियां भृगु प्रतिशाप देती । होवोत पाखंडी शिवभक्त ॥४॥
सुरा, आसवादि प्रिय या मार्गांत । अपवित्र लोक रमती एथें ॥५॥
वेद-ब्राह्मणांची घडली हे निंदा । तेणें पाखंडांचा मार्ग रुचो ॥६॥
ऐकूनि हा शाप किंचित्‍ दु:ख शिवा । होऊनि तो गेला त्यजूनि स्थान ॥७॥
गंगायमुनांच्या संगमीं तें सत्र । जाहलें समाप्त पुढती सौख्यें ॥८॥
वासुदेव म्हणे कलह थोरांचे । खेळ ईशेच्छेचे सहेतुक ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP