स्कंध ४ था - अध्याय २६ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१९४
प्राचीनबर्हीसी कथिती नारद । एकदां तो नृप धर्नुर्धारी ॥१॥
‘पंचप्रस्थ’ वनीं मृगयेसी गेला । रथांत बैसला आनंदानें ॥२॥
पंच अश्व महावेग त्या रथासी । चक्रें दोन होतीं आंस एक ॥३॥
ध्वज तीन पंच रज्जूंनीं निबद्ध । लगाम करांत सारथ्याच्या ॥४॥
वीरांचें तें स्थान अश्वांचींही स्थानें । तैसींच शस्त्रास्त्रें बहुत होतीं ॥५॥
भिन्न भिन्न पंचागती त्या अश्वांसी । नृपाळाच्या अंगीं कनकवर्म ॥६॥
अक्षय्य तूणीर पृष्ठभागीं त्याच्या । एकाकी तो ऐसा सिद्ध होई ॥७॥
वासुदेव म्हणे होऊनि कठोर । मृगया तो वीर करी बहु ॥८॥

१९५
अमर्याद ऐसी मृगया ते निंद्य । व्हावी समर्याद श्राद्धादिकीं ॥१॥
मर्यादापालनें हिंसादोष नसे । दोष अविवेकें होती बहु ॥२॥
अमर्याद ऐसी मृगया नृपाची । दु:ख सज्जनांसी देई मनीं ॥३॥
अंतीं श्रांत होतां पातला गृहासी । स्नान भोजनादि करितां स्वस्थ ॥४॥
पुढती अत्तरें, अर्गजा, चंदन । करुनि धारण पुष्पमाला ॥५॥
समागम इच्छी हर्षे सुंदरीचा । अनावर त्याचा काम होई ॥६॥
वासुदेव म्हणे न दिसे सुंदरी । यास्तव विचारी दासींप्रति ॥७॥

१९६
दासींप्रति म्हणे निवेदावें क्षेम । सांगा अप्रसन्न वदन कां हें ॥१॥
सदनीं ज्या माता अथवा पतिव्रता । नसे तेथ ज्ञाता न रमे कदा ॥२॥
संकटांत बोध करी जी सर्वदा । प्रिया मम सांगा कोठें गेली ॥३॥
स्त्रिया तैं रायातें म्हणती न आम्हीं । जाणितों न राणी चिंती काय ॥४॥
केवळ ते भूमीवरी पहुडली । दाविली सुंदरी नृपालागीं ॥५॥
वासुदेव म्हणे पाहूनि प्रियेसी । अंतरांत दु:खी राव बहु ॥६॥

११७
अस्ताव्यस्त तिज भूमीवरी पाही । पुशितां न देई उत्तरातें ॥१॥
परी कामवीर होता तो चतुर । होई पदीं नम्र अत्यादरें ॥२॥
घेऊनियां अंकीं प्रेमें कुरवाळी । चुकतां करावी म्हणे शिक्षा ॥३॥
शिक्षा न लाभे ते दुर्दैवी सेवक । दंड अपराध्यास अनुग्रह ॥४॥
मूढ सेवकासी हिताचेंही कृत्य । न कळूनि क्रोध येई बहु ॥५॥
यास्तव हे प्रिये, अपराध जरी । जाहलासे तरी क्षमावा तो ॥६॥
वासुदेव म्हणे नृपाळ यापरी । विनवण्या करी सुंदरीच्या ॥७॥

१९८
नीलकेशिनी तो भ्रमरावलीयुक्त । दाखवीं सुहास्य मुखचंद्र ॥१॥
सलज्ज सप्रेम पाहीं मजकडे । शब्द प्रेमवेडे, ऐकवीं ते ॥२॥
विप्र-विष्णुदासांविण ऐसा कोण । अपराध दारुण करुनि वांचे ॥३॥
कुंकुमरहित ऐसें म्लान मुख । शोकाश्रूंनीं आर्द्र वक्षस्थल ॥४॥
आजवरी प्रिये, नव्हतें पाहिलें । सांग काय केलें कोणी तुज ॥५॥
कुंकुमकर्दमासम ते आरक्त । अधरोष्ठ अद्य पांडुवर्ण ॥६॥
तुजवीण प्रिये, गेलों मृगयेसी । न धरावा चित्तीं तेणें क्रोध ॥७॥
मदनव्यथा हे असह्य मजसी । कामना हे माझी पुरवीं कांते ॥८॥
वासुदेव म्हणे विषयांध नर । यापरी लाचार सर्वकाळ ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP