स्कंध ४ था - अध्याय १२ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


९५
पितामहबोधें ध्रुव झाला शांत । आंवरुनि युद्ध स्थिर राहे ॥१॥
कुबेरासी वृत्त कळतां समस्त । सपरिवार तेथ प्राप्त झाला ॥२॥
पाहूनि तयासी वंदिलें ध्रुवानें । कुबेर प्रेमानें वदला तया ॥३॥
पितामहबोधें त्यागिलेंसी वैर । प्रसन्न अंतरे तेणें माझें ॥४॥
झालें गेलें सर्व सोडीं कालकृत । जाणें तोचि एक सकलां मूळ ॥५॥
रुचेल तो मागें वर भाग्यवंता । थोरचि श्रेष्ठता असे तुझी ॥६॥
ध्रुव कुबेरासी म्हणे सर्वकाळ । आठवो गोपाळ मजलागीं ॥७॥
वासुदेव म्हणे तथास्तु म्हणूनि । कुबेर स्वस्थानीं निघूनि जाई ॥८॥

९६
ध्रुवही पुढती पातला सदनीं । यज्ञादिक कर्मी रमला बहु ॥१॥
प्रजेसी संतोष देई बहुपरी । स्वधर्म आचरी सर्वकाळ ॥२॥
छत्तीस सहस्त्र वर्षे करी राज्य । कालाधीन जग मानूनियां ॥३॥
सर्वदा संयमी तेंवी दयावंत । ऐसें त्याचें व्रत अखंडित ॥४॥
तेणें अनुरक्त प्रजा तयावरी । विचार अंतरीं पुढती त्याच्या ॥५॥
पुत्रकलत्रादि सर्व कालाधीन । गांठी बदरीवन चिंतूनि हें ॥६॥
प्राणायामादिक अचारी तो तेथ । ध्रुव मी हा भेद तोही नुरे ॥७॥
वासुदेव म्हणे मैत्रेय क्षत्त्यासी । वृत्त निवेदिती पुढती ऐका ॥८॥

९७
तेजस्वी विमान येई एकदां त्या स्थानीं ॥ दोन चतुर्भुज वीर पाही ध्रुव कोणी ॥१॥
जाणूनि तयासी देव वंदी ध्रुव भावें ॥ नकळे तयास्सी तयां केंवी सन्मानावें ॥२॥
नंद सुनंद ते दोन होते विष्णुदूत ॥ बोलले न्यावया आलों अढळपदास ॥३॥
प्रदक्षिणा चंद्र-सूर्य करिती ज्या स्थाना ॥ आजवरी प्राप्त न जें ध्रुवा अन्य कोणा ॥४॥
बाळपणीं तपश्चर्या करुनियां घोर ॥ संपादिलेंसी तूं ध्रुवा स्थान तें अपूर्व ॥५॥
वासुदेव म्हणे ऐशा स्थानीं न्यावयासी ॥ पातलों आनंदें दूत बोलले ध्रुवासी ॥६॥

९८
सुधामधुर ते वाणी । विष्णुदूतांची ऐकूनि ॥१॥
ध्रुव जाहला सुस्नात । नित्य कर्मे करी सर्व ॥२॥
करी वंदन मुनींसी । आशीर्वाद मागे त्यांसी ॥३॥
विमानासी प्रदक्षिणा । करी, वंदी त्या दूतांना ॥४॥
तोंचि मृत्यूसी अवलोकी । चरण ठेवी तन्मस्तकीं ॥५॥
तेज:पुंज ध्रुवभक्त । चढला हर्षे विमानांत ॥६॥
वाद्यनाद तैं गगनीं । पुष्पें वर्षिली देवांनीं ॥७॥
वासुदेव म्हणे चित्ती । स्मरण मातेचें ध्रुवासी ॥८॥

९९
जाणूनियां भाव ध्रुवाचा ते दूत । दाविती तयास मातेप्रती ॥१॥
अग्रभागीं एका विमानीं ते होती । पाहूनि ध्रुवासी मोद झाला ॥२॥
लंघूनियां चंद्रसूर्यादि मंडळें । विमान तें गेलें पुढती वेगें ॥३॥
लंघूनि त्रैलोक्य पुढती तो गेला । विष्णुपदीं आला श्रेष्ठ स्थानीं ॥४॥
स्वयंप्रकाश तें स्थान तत्प्रकाशें । त्रैलोक्य प्रकाशे सर्वकाल ॥५॥
श्रेष्ठ भक्तांप्रति लाभे ऐसें स्थान । राहिला जाऊन ध्रुव तेथें ॥६॥
वासुदेव म्हणे अढळपदप्राप्ति । लाधली ध्रुवासी परमपुण्यें ॥७॥

१००
पुढती प्रचेते आरंभिती सत्र । पतिव्रतापुत्र वृत्त तेथें ॥१॥
नारद मुनींनीं कथिलें समस्त । समय यज्ञांत प्राप्त होतां ॥२॥
पंचवर्षात्मक बालकें अपमान । असह्य होऊन केलें तप ॥३॥
जाऊनियां वनीं आराधिलें ईशा । अलौकिक पदा संपादिलें ॥४॥
इच्छाही त्यापरी होई जयाप्रति । ऐसा या जगतीं क्षत्रिय न ॥५॥
वासुदेव म्हणे नारद यापरी । ध्रुवकथा सत्रीं कथन करी ॥६॥

१०१
मुनि मैत्रेय क्षत्त्यासी । ख्याति कथिती भक्ताची ॥१॥
भक्तिभावें हें ऐकतां । सकल हरे भवव्यथा ॥२॥
ईशपदीं जडे भक्ति । आयुरारोग्याभिवृद्धि ॥३॥
पुण्यकीर्ति, धन-धान्य - । वृद्धि, होऊनि कल्याण ॥४॥
प्रात:सायं पठतां नित्य । येई उदयासी भाग्य ॥५॥
अमा, पौर्णिमा, द्वादशी । क्षयतिथि, व्यतिपातासी ॥६॥
श्रवण नक्षत्र संक्रांत । दिन आदित्याचा श्रेष्ठ ॥७॥
ऐशादिनीं तरी याचें । पठण करितां सिद्धि लाभे ॥८॥
वासुदेव म्हणे ऐसी । श्रेष्ठ कथा हे ध्रुवाची ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP