स्कंध ४ था - अध्याय २२ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१५२
इतुक्यांत तेज:पुंज । दिसती कुमार नभांत ॥१॥
नृपासवें सकल जन । सन्मानिती त्यां उठून ॥२॥
सर्व उपचारें राजा । प्रेमें करी त्यांची पूजा ॥३॥
अत्यादरें चरणतीर्थ । सिंची मस्तकीं तो नृप ॥४॥
वासुदेव म्हणे मुनि । वंद्य शिवासीही जनीं ॥५॥

१५३
सनत्कुमारांसी जोडूनियां कर । बोलला नृपाळ धन्य झालों ॥१॥
दुर्लभ हें अद्य जाहलें दर्शन । आलें महापुण्य फळा वाटे ॥२॥
ब्रह्मा, विष्णु, शिव, प्रसन्न जयांसी । भेटले मजसी तेचि अद्य ॥३॥
आत्म्यासम नित्य सर्वत्र आपण । परी मूढजन नेणती हें ॥४॥
निर्धनही नित्य आपणा जो सेवी । धन्य तोचि होई जगामाजी ॥५॥
वैभवयुक्तही असतां सदन । चरणरज:कण सद्भक्तांचे - ॥६॥
पडती न जेथें, वृक्ष तो ससर्प । चंदनाचा, व्यर्थ भयकारी ॥७॥
वासुदेव म्हणे नम्रभावें राजा । वदला जें ऐका पुढती काय ॥८॥

१५४
विप्रहो, वर्णावें काय मी तुम्हांसी । बाल तुम्ही व्रती मोक्षास्तव ॥१॥
कृपेवीण आम्हां अन्य न उपाय । कर्मेचि हा भव प्राप्त आम्हां ॥२॥
विषयचि आम्हां पुरुषार्थ वाटती । सोडवा आम्हांसी संकटीम या ॥३॥
शिष्टाचारभंग मानूं नका मनीं । सर्वदाचि तुम्ही कुशलरुप ॥४॥
परितप्तां तुम्ही नित्य शांतिप्रद । कल्याणाचा मार्ग दावा आम्हां ॥५॥
ईश्वरचि भक्तांस्तव सिद्धरुपें । कल्याणार्थ हिंडे भक्तप्रेमें ॥६॥
यास्तव मुनिहो, तुम्हीचि ईश्वर । वाटतां साचार आम्हांप्रति ॥७॥
वासुदेव म्हणे कुमार ऐकूनि । नृपाळाची वाणी वदती ऐका ॥८॥

१५५
कुमार बोलती नृपा, हे सर्वज्ञा । जगाच्या कल्याणा करिसी प्रश्न ॥१॥
सज्जनांवांचूनि अन्या न हे मति । भाग्येंचि संगती घडली तव ॥२॥
दुर्लभचि ईशपादपद्मीं भक्ति । पाहूनि हे तुझी निष्ठा, हर्ष ॥३॥
काममल कदा नि:शेष न होई । ईशकथा नेई विलयासी तो ॥४॥
कठिणही ईशप्रेम लाभे यत्नें । केवळ श्रवणें कोणा प्राप्त ॥५॥
कोणासी त्याहूनि पडतील श्रम । परी हेतु पूर्ण होतीलचि ॥६॥
वासुदेव म्हणे कुमार सदय । कथिती उपाय श्रवण करा ॥७॥

१५६
गुरुशास्त्रवाक्यीं विश्वास ठेवावा । नित्य आचरावा भक्तिपंथ ॥१॥
ज्ञानप्राप्तीस्तव धरावा उत्साह । द्रव्येंद्रिय प्रिय संग नसो ॥२॥
इंद्रियोपभोग तेंवी द्रव्यासक्ति । तिरस्कारबुद्धि व्हावीए तेथ ॥३॥
एकांतींचि आत्मचिंतनीं रमावें । चिंतन त्यजावें श्रवणास्तव ॥४॥
योग्यांसम शांति, संयम करावा । द्वंद्वांचा न व्हावा विजय कदा ॥५॥
यदृच्छाप्राप्तचि अन्न आच्छादन । संग्रहेच्छु मन असूं नये ॥६॥
वर्णावे, ऐकावे ईश्वराचे गुण । विश्वास ठेवून तयांवरी ॥७॥
वासुदेव म्हणे येणें आत्मप्रीति । वाढे देहासक्ति सुटोनियां ॥८॥

१५७
सुनिश्चल ऐशा ईशप्रेमें ज्ञान । सद्‍गुरुवचनश्रवणें घडे ॥१॥
ज्ञान-वैराग्यानेम कामक्रोधनाश । वासनाविनाश पुढती सुखें ॥२॥
ऐशा क्रमें होई विषयविस्मृति । चित्त स्वस्वरुपीं तेणें स्थिर ॥३॥
अग्निसंयोगें जैं कष्ट दग्ध होई । तैसें नष्ट होई अंत:करण ॥४॥
देह मिथ्या ज्ञानें भान न तयाचें । स्वप्नचि हें भासे सकळ कार्य ॥५॥
वासुदेव म्हणे ऐसें ईशप्रेम । नेई यथाक्रम पूर्णतेसी ॥६॥

१५८
अव्हेरुनि आत्मवस्तु देहादिकीं । ठेवील जो प्रीति अज्ञानानें ॥१॥
प्रथम तयाची हांव द्रव्यावरी । पुढती सुंदरी कांता इच्छी ॥२॥
प्रासादसदृश पुढती सदन । गायन वादन नृत्यादीही ॥३॥
ऐशा भिन्न भिन्न वाढती वासना । एक दुजीविना अपूर्णंचि ॥४॥
एकामागें एक कामना या ऐशा । समाधान चित्ता न मिळों देती ॥५॥
अंतीं अविचारें पूर्वस्मृति नष्ट । होऊनि, विनष्ट होत असे ॥६॥
वासुदेव म्हणे ऐसा आत्मघात । अज्ञानें स्वयेंच करुनि घेई ॥७॥

१५९
सर्वदा सर्वत्र अस्तित्वें जयाच्या । आवडती साच्या सकळ वस्तु ॥१॥
आत्म्याचा त्या नाश होतां नाश अन्य । अधिक त्याहून असे काय ॥२॥
यास्तव सर्वदा अर्थाचें चिंतन । विषयांत मन अथवा गुंग ॥३॥
सकल पुरुषार्थविहीन जो पाहीं । येऊनियां देहीं व्यर्थचि तो ॥४॥
परोक्षापरोक्ष ज्ञानासी तो मुके । वृक्षादिक त्यातें जन्म येती ॥५॥
यास्तव पुरुषार्थविनाशक प्रेम । करुं नये जाण कवण्या ठाईं ॥६॥
वासुदेव म्हणे मोक्षाची श्रेष्ठता । कुमारोक्त आतां परिसा भावें ॥७॥

१६०
राया, हे उत्पन्न झाली सृष्टि । नाशही तदाचि समजें तिज ॥१॥
आब्रह्मस्तम्ब हें विश्व अशाश्वत । धर्म, काम, अर्थ, पुरुषार्थही ॥२॥
शाश्वत एकचि चिंतूनियां मोक्ष । जाणावें मी ईश स्वयें ऐसें ॥३॥
म्हणसील जरी जाणतों मी जीवा । सहजचि तदा ज्ञाता अन्य ॥४॥
परतंत्र कर्म जाणे न तयासी । स्वयंप्रभ त्यासी ईश जाणे ॥५॥
पुष्पमालेवरी सर्प जेंवी भासे । भ्रमात्मक तैसें जीवरुप ॥६॥
मालाज्ञानें जेंवी सर्पभ्रमनाश । जीवत्वविनाश तेंवी बोधें ॥७॥
वासुदेव म्हणे विशुद्ध चैतन्य । कर्ता मी मानून जीव होई ॥८॥

१६१
कर्मे कर्तृत्वाभिमान । अहंकार तोचि जाण ॥१॥
ईशप्रेमें कर्मनाश । तेणें अभिमानराहित्य ॥२॥
योगी करिताती संयम । परी न सुटे त्यांचें कर्म ॥३॥
तेणें न सुटे अहंकार । भक्त चिंतिती ईश्वर ॥४॥
कर्ता - करविता त्यासी । मानितां न अहंवृत्ति ॥५॥
वासुदेव म्हणे ऐसा । महिमा वर्णिती भक्तीचा ॥६॥

१६२
राया, एक सर्वाधार । जाणें अंतरीं ईश्वर ॥१॥
दुस्तर हा भवसिंधु । माजी नक्र काम-क्रोधु ॥२॥
लोभ, मद तैं मत्सर । महानक्र अहंकार ॥३॥
ईशपादपद्मनौका । मार्ग एकचि तेथींचा ॥४॥
ईशप्रेमेंवीण अन्य । मार्ग, कष्टचि ते जाण ॥५॥
करितां तयाचा आश्रय । वासुदेव भवपार ॥६॥

१६३
राव म्हणे पूर्वी झाला अनुग्रह । तयाचें पूर्णत्व परी आजी ॥१॥
अनंत उपकार केले मजवरी । अर्पूं काय परी गुरुदक्षिणा ॥२॥
मुने, आपुलेंचि वैभव हें सारें । परी वरुणनीरें वरूणा अर्घ्य ॥३॥
तैसेंचि अर्पितों पुत्रकलत्रादि । मुने, हें तुम्हांसी सकळ राज्य ॥४॥
वासुदेव म्हणे पृथूचें वचन । देऊनियां ध्यान पुढती ऐका ॥५॥

१६४
सेनापत्य, राज्य, दंड, नेतृत्वही । योग्यता हे पाहीं ज्ञात्यासीच ॥१॥
अधिकारी तेथ वेदशास्त्रवेत्ता । विप्रचि स्वातंत्र्या योग्य असे ॥२॥
अनुग्रहें त्याच्या सकळांचे भोग । विप्र स्वयंसिद्ध जगीं एक ॥३॥
मुने, तूं सर्वज्ञ यथार्थ प्रतीति । ईशस्वरुपाची दिधली मज ॥४॥
उतराई केंवी होऊं तें कळेना । वंदीन चरणां नम्रभावें ॥५॥
वासुदेव म्हणे कृतज्ञ जो नित्य । ज्ञानऋणमुक्त तोचि एक ॥६॥

१६५
षोडशोपचारें घेऊनियां पूजा । कुमार आपुला क्रमिती पंथ ॥१॥
उपदेश त्यांचा धरुनियां ध्यानीं । रमला स्वकर्मी पृथुराजा ॥२॥
अंतर्मुखवृत्ति ठेवूनियां नित्य । राज्य ईश्वरार्थ करीतसे ॥३॥
‘अर्चि’ कांतेप्रति तया पंचपुत्र । विजिताश्व, हर्यक्ष, धूम्रकेतु ॥४॥
द्रविण, वृक, हीं नांवें तयांप्रति । पित्यासम त्यांसी रुप गुण ॥५॥
वासुदेव म्हणे प्रजानुरंजन । करुनियां धन्य होई पृथु ॥६॥

१६६
सौम्य शांत जेंवी सोम । पराक्रमें सूर्यासम ॥१॥
सज्जनांचा संरक्षक । दुर्जनांसी बहु धाक ॥२॥
अग्नीसम तो दु:सह । विजयशाली जैं महेंद्र ॥३॥
गंभीर तो पृथ्वीसम । स्वर्गावरी पुरवी काम ॥४॥
पर्जन्यचि तो धनद । शक्ति बुद्धीचा न अंत ॥५॥
अचल मेरुसम धैर्य । धनवंत जैं कुबेर ॥६॥
वासुदेव म्हणे ऐसे । सकल सद्‍गुण नृपातें ॥७॥

१६७
अद्‍भुत वस्तूंचें भांडारचि जैसा । हिमाचल तैसा पृथुराजा ॥१॥
नियंता तो यम, गोप्ता कीं वरुण । सर्वत्र गमन वायूपरी ॥२॥
अश्रुतपूर्वचि सकल सामर्थ्य । शिवासम उग्र, मदन रुपें ॥३॥
पराक्रमें सिंह, मनु दयालुत्वें । लोकनियंतृत्वें ब्रह्मदेव ॥४॥
गुरुचि ब्रह्मज्ञ, विष्णु आत्मज्ञान । गोविप्रपालन करी नित्य ॥५॥
ईशभक्ति, लोकनिंदेचें त्या भय । थोरांचा आदर सर्वकाळ ॥६॥
पर उपकारीं सर्वदा निरत । ऐशा सद्‍गुणांस उपमा नसे ॥७॥
सज्जन सर्वदा स्तविती तयासी । रामासम चित्तीं सर्वत्रांच्या ॥८॥
वासुदेव म्हणे पृथुराज ऐसा । प्राण सकलांचा सुस्वभावें ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP