स्कंध ४ था - अध्याय २९ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


२०९
प्राचीनबर्ही तो बोले नारदासी । गूढार्थ मजसी निवेदावा ॥१॥
ज्ञात्यावीण कोण जाणील हें गूढ । नारदा, मी मूढ कर्ममग्न ॥२॥
ऐकूनि नारद गूढ निवेदिती । पुरंजन तोचि जीव राया ॥३॥
कर्मानुरुप तो शोधी निजदेह । अविज्ञात शिव मित्र त्याचा ॥४॥
हस्तपादयुक्त मानवशरीर । नवद्वार पुर तेंचि श्रेष्ठ ॥५॥
बुद्धि ते जाणावी कामिनी जीवाची । साधनें या भोगी विषय जीव ॥६॥
ज्ञान-कर्मेंद्रियें मित्र ते बुद्धीचे । मैत्रिणी तियेतें इंद्रियवृत्ति ॥७॥
वासुदेव म्हणे प्राण तोचि नाग । कथिती नारद मन मंत्री ॥८॥

२१०
पंचविषयांचा गोंवा । देश पंचाल जाणावा ॥१॥
मुखादिक नवद्वारें । देहपूर विराजलें ॥२॥
आविर्मुखी तैं कद्योता । वेशी लोचनस्वरुपा ॥३॥
चक्षुरिंद्रिय द्युमान । रुप, विभ्राजित जाण ॥४॥
जाणें नलिनी नालिनी । तींच नासापुटें दोन्हीं ॥५॥
घ्राणेंद्रिय ‘अवधूत’ । गंध तोचि सौरभदेश ॥६॥
मुख्या तेंचिअ मुख जाण । वागिंद्रिय तो विपण ॥७॥
रसज्ञ तें रसनेंद्रिय । ‘आपण’ तो वाग्‍व्यवहार ॥८॥
वासुदेव म्हणे अन्न । विविध तेंचि बहूदन ॥९॥

२११
पितृहू देवहू राया तेचि कर्ण । देश त्यांचे दोन कर्म ज्ञान ॥१॥
‘श्रुतधर’ तेंचि राया, श्रोत्रेंद्रिय । आसुरी तें होय शिश्नरुप ॥२॥
ग्रामकदेश तो संभोग जाणावा । उपस्थ जाणावा दुर्मद तो ॥३॥
निऋति तें गुद, वैशस नरक । इंद्रिय ‘लुब्धक’ जाण तेथ ॥४॥
निर्वाक ते हस्त पेशस्कृत पाद । अंध ते, हृदय अंत:पुर ॥५॥
विषूचीन तेचि मन सत्वादिक - धर्मे, शांति सुख दु:ख मूळ ॥६॥
वासुदेव म्हणे गुणांसम बुद्धि । पावे इंद्रियांची विकारता ॥७॥

२१२
रथ तोचि देह, इंद्रियें ते हय । वेग तेचि होय गति त्याची ॥१॥
पाप पुण्य चक्रें गुणत्रयध्वज । रज्जु ते सुदृढ पंचप्राण ॥२॥
मनचि लगाम, बुद्धि तो सारथी । हृदय वीराची वासभूमि ॥३॥
सुखादिक द्वंद्वें तींच अश्वस्थानें । विषय शस्त्रास्त्रें, धातु ढाली ॥४॥
बाह्यगति तया तींच कर्मेंद्रियें । मृगजळीं धांवे तेणें जीव ॥५॥
इंद्रियें ती सेना, अन्यायें विषयां । सेवितां मृगया नाम येई ॥६॥
वासुदेव म्हणे जीव रात्रंदिन । मृगयानिमग्न ऐशापरी ॥७॥

२१३
चंडवेग तोचि संवत्सरुप । दिन रात्री तेथ नर-नारी ॥१॥
तीनशतें साठ दिन रात्री ऐशा । नाश आयुष्याचा करिती क्रमें ॥२॥
कालकन्या जरा, मृत्यूचि यवन । व्याधी तें यवनसैन्य राया ॥३॥
विषमज्वर तो प्रज्वार जाणावा । दु:खभोग जीवा अज्ञानानें ॥४॥
जाणूनि कर्तव्य दुर्लक्षी जैं जीव । गुणांत तन्मय होऊनियां ॥५॥
सर्वश्रेष्ठ गुरु ईश परमात्मा । अवमानी तैं जन्मा पावे बहु ॥६॥
गुणभेदें भिन्न अवस्था तयासी । वासुदेव कथी पुढती ऐका ॥७॥

२१४
दारोदारीं श्वान हिंडूनि विविध । भोगितो पदार्थ शिक्षाही जैं ॥१॥
कामाधीन जीव तेंवी स्वर्गांदिक । पावतसे लोक कर्मासम ॥२॥
प्रतिकारें कर्म विनाश न पावे । शिरींचें गणावें स्कंधीं येई ॥३॥
जागृतीवांचूनि स्वप्नाचा न नाश । ज्ञानावीण भोग न सरे तेंवी ॥४॥
निष्कामभक्तीनें सर्वराज्यज्ञान । लाभतां कीर्तन गोड वाटे ॥५॥
अवीट ते गोडी उपजतां चितीं । कदा न द्वंद्वांची बाधा घडे ॥६॥
वासुदेव म्हणे जीव द्वंद्वमग्न । ऐकती न गुण ईश्वराचे ॥७॥

२१५
नृपासी नारद म्हणती आम्ही भक्त । करितों उपदेश कौशल्यानें ॥१॥
तप, विद्या तेंवी समाधि यामागें । यत्न दर्शनाचे करितों बहु ॥२॥
परी ईशबोध सुलभ न राजा । चिंतनेंचि कृपा घडे त्याची ॥३॥
अनुग्रहें त्याच्या सुटे कर्मासक्ति । पुरुषार्थप्राप्ति न घडे कर्मे ॥४॥
राया, कर्महेतु जाणें ईशतोष । तेथ स्थिरचित्त विद्या करी ॥५॥
रहस्य वेदांचें हेंचि असे राया । स्वर्गलोभ राया, रोचनार्थ ॥६॥
सर्वाधारा तया ईश्वराचें ज्ञान । जया, तो विद्वान, तोचि गुरु ॥७॥
वासुदेव म्हणे ज्ञानी तोचि देव । कथिती नारद स्वानुभवें ॥८॥

२१६
कल्याणार्थ राया, निवेदितों गुप्त । मार्ग एक चित्त स्थिर करीं ॥१॥
पुष्पवनीं एक मिताहारी मृग । समागमासक्त विचरे पहा ॥२॥
मंजु गुंजारवीं दंग त्याचे कर्ण । वृकां दुर्लक्षून पुढती जाई ॥३॥
ऐशा स्थितीमाजी विद्ध त्या पारधि । करिती, तो शोधीं मृग कोण ॥४॥
अभिप्राय त्याचा स्पष्ट निवेदिती । वासुदेव तोचि कथितो आतां ॥५॥

२१७
पुष्पांसम स्त्रिया, गंध कर्मफलें । आकर्षित झालें चित्त शब्दें ॥१॥
मोहक मधुर पुत्र कलत्रांचे । शब्द गुंग तेथें गृहस्थ तो ॥२॥
कालवृक त्याच्या पाठीस लागला । कर्मांत रंगला परी जीव ॥३॥
मृत्युपारधि तो नि:शंक स्वबाण । सोडूनियां प्राण हरीतसे ॥४॥
राया, मृगासम तूंचि घेई ध्यानीं । ईश्वरचिंतनीं मग्न होईं ॥५॥
इंद्रियवृत्तींसी आंवरुनि अर्पी । ईश्वरस्वरुपीं प्रयत्नानें ॥६॥
वासुदेव म्हणे विरागें । क्रमितां या मार्गे ईशप्राप्ति ॥७॥

२१८
प्राचीनबर्ही तें ऐकूनि मुनींसी । म्हणे शंका माझी हरिली सर्व ॥१॥
कर्मबोध मज केला तयांप्रति । होतें अज्ञातचि रहस्य हें ॥२॥
परस्परभिन्न वाक्यें तीं ऐकूनि । संशयचि मनीं दृढ झाला ॥३॥
निवृत्तीचि परी वेदांचे रहस्य । ऐकूनियां अद्य नि:शंक मी ॥४॥
परी अन्य एक शंका दूर करा । संदेह उदारा ज्ञात्यांसीही ॥५॥
स्थूलदेहें कर्म करी जीव एथें । फल भोगी त्याचें अन्य लोकीं ॥६॥
कर्ता स्थूल देह पावतो विनाश । कर्मे न करीच सूक्ष्मदेह ॥७॥
कर्माचार एथें, अन्यलोकीं फल । केंवी तें सकळ निवेदावें ॥८॥
वासुदेव म्हणे उत्तर प्रश्नासी । नारद रायासी देती ऐका ॥९॥

२१९
सूक्ष्मदेहचि तो सर्वकर्मकर्ता । परलोकीं भोक्ता तोचि राया ॥१॥
अन्य देहें स्वप्नव्यवहार जैसे । परलोकीं तैसे भोग जीवा ॥२॥
अहंममभावें पुनर्जन्म घेई । वासना ठरवी अन्य जन्म ॥३॥
वृत्तिबोधें पूर्वजन्मही आकळे । ऐकिलें चिंतिलें नाहीं तेंचि - ॥४॥
अनुभवी, स्वप्नीं प्रत्यय हा येई । पूर्वजन्म होई सिद्ध तेणें ॥५॥
स्मरण चिंतनाविण नसे स्वप्न । अनुभव जाण मूळ तया ॥६॥
वासुदेव म्हणे सूक्ष्म देहस्थित । संस्कार ते व्यक्त स्वप्नीं होती ॥७॥

२२०
राया, तात्पर्य घे ध्यानीं । चिंतितांचि निज मनीं ॥१॥
कळती पूर्वोत्तर जन्म । ग्रहणीं राहूचें दर्शन ॥२॥
ध्यानपरायणालागीं । बोध सर्वही तैसाचि ॥३॥
जोंवरी हा सूक्ष्मदेह । तोंवरी तो अहंकार ॥४॥
सिद्धान्त हा पुरातन । न करीं साशंकित मन ॥५॥
निद्रा मृत्यूच्या समयीं । इंद्रियांचें बल जाई ॥६॥
तेणें व्यक्तता न तयां । बाल्यीं वाढ न इंद्रियां ॥७॥
अमावस्येचा जैं चंद्र । बाळाचा तैं अहंकार ॥८॥
वासुदेव म्हणे ऐसी । अहंममतेची स्थिती ॥९॥

२२१
स्वप्नभय जेंवी असूनियां मिथ्या । विनाश तयाचा न घडे स्वप्नीं ॥१॥
जागृतीच तया उपाय न अन्य । नाशी तेंवी ज्ञान संसारासी ॥२॥
सचेतन यदा होई लिंगदेह । संज्ञा तया जीव लाभतसे ॥३॥
जीव सूक्ष्मदेहें स्थूलदेह घेई । सुख-दु:ख होई तया तेथ ॥४॥
तृणजलूका ते यदा अन्य तृण । धरी तैं प्रथम तृण सोडी ॥५॥
तैसी अन्य देहवासना ते यदा । पूर्वदेह तदा सोडी जीव ॥६॥
वासनास्वरुपी मनचि कारण । संसारासी जाण नृपश्रेष्ठा ॥७॥
वासुदेव म्हणे तत्त्व हें वरिष्ठ । जाणील तो श्रेष्ठ साधकांत ॥८॥

२२२
अभिमान तें अज्ञान । यदा स्वीकारितें मन ॥१॥
इष्टानिष्ट कर्मे तदा । प्राणी आचरी सर्वदा ॥२॥
कर्मासम भोगी भोग । भोगासक्ति तोचि रोग ॥३॥
तया रोगें येई जन्म । ऐसा रोग हा दारुण ॥४॥
यास्तवचि सर्वव्यापी । ईश्वराची करीं भक्ति ॥५॥
वासुदेव म्हणे ऐसा । श्रेष्ठ बोध नारदाचा ॥६॥

२२३
मैत्रेय बोलती विदुरा, यापरी । नृपालागीं करी बोध मुनि ॥१॥
निरोप नृपाचा घेऊनि नारद । सिद्धलोकपंथ आक्रमिती ॥२॥
प्राचीनबर्हीही पुत्रांप्रति राज्य । अर्पूनि तयास निघूनि जाई ॥३॥
कपिलाश्रमीं तो करी ईशध्यान । चुकवी जनन-मरण यत्नें ॥४॥
अध्यात्मपर हें आख्यान जो कोणी । ऐकवी, ऐकूनि अन्याप्रति ॥५॥
सूक्ष्मदेह त्याचा गळूनियां जाई । शाश्वत तो होई हरिरुप ॥६॥
दुर्लभ रुपक चिंतील हें त्याचा । अहंभाव साचा नष्ट होई ॥७॥
वासुदेव म्हणे कर्मफळ केंवी । भोगी तेंही येई ध्यानीं येणें ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP