स्कंध ४ था - अध्याय १७ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१२२
मुनिप्रेरित ही ऐकूनियां स्तुति । सन्मानी सर्वांसी पृथुराजा ॥१॥
क्षत्ता म्हणे केंवी दोहिलें पृथ्वीसी । निवेदा मजसी सकल वृत्त ॥२॥
मैत्रेय कथिती नि:सत्त्व तैं पृथ्वी । यदा नृपाळासी राज्यलाभ ॥३॥
क्षुधातुल प्रजा विनवी पृथुसी । वृक्ष अग्निगर्भी तेंवी आम्हीं ॥४॥
जठराग्निदाहें पावतों विनाश । संरक्षीं आम्हांस अन्नदानें ॥५॥
ऐकूनि ते दीनवाणी सकलांची । निजांतरीं चिंती पृथुराजा ॥६॥
पुढती क्रोधानें सज्ज करी चाप । भूमीवरी रोंख धरिला वेगें ॥७॥
वासुदेव म्हणे अलौकिक कर्म । करितांचि जाण इष्टलाभ ॥८॥

१२३
क्रोध पाहूनि पृथूचा । कंप पावे धरणीमाता ॥१॥
व्याधभयें जैं हरिणी । तेंवी गोरुपें धरणी ॥२॥
करी वेगें पलायन । राव धांवला मागून ॥३॥
अंतीं संरक्षिता कोणी । अन्य नाहीं हें जाणूनि ॥४॥
म्हणे नृपाळासी माता । शरण तुजसी मी सर्वथा ॥५॥
रक्षीं रक्षीं तूं मजसी । जाणावें मी निरपराधी ॥६॥
ऐसी स्त्रीहत्या न करीं । धर्माधारा, मी धरित्री ॥७॥
वासुदेव म्हणे भूमि । वधितां वदे प्रळय जनीं ॥८॥

१२४
पृथु म्हणे माझी आज्ञा न मानिसी । यास्तव तुजसी वधीन मी ॥१॥
हविर्भाग यज्ञीं अर्पितांही धान्य । न देसी म्हणून शासन हें ॥२॥
भक्षूनिही तृण देईन जे दुग्ध । धेनु शासनार्ह जयापरी ॥३॥
ब्रह्मयानें अर्पिलीं जीं बीजें । न देसी जनांतें मूढे, केंवी ॥४॥
क्षुधेनें ही प्रजा जाहली व्याकुळ । त्वद्वधें सांभाळ करीन तिचा ॥५॥
श्रेष्ठभावें स्वार्थे निर्दय जो होई । वधार्ह तो पाहीं नृपाळासी ॥६॥
गर्विष्ठे त्वद्वधें पातक न मज । तारीन जनांस बुडतांही तूं ॥७॥
वासुदेव म्हणे भयाकुल भूमि । नृपासी जोडूनि कर बोले ॥८॥

१२५
विष्णूचा तूं नृपा, अससी अवतार । घेई नमस्कार नम्र माझा ॥१॥
भूताधारास्तव निर्मिलेंसी मज । वधार्थ कां सिद्ध होसी ऐसा ॥२॥
पालनार्थ असे अवतार तुझा । योग्य न हा ऐसा घात राया ॥३॥
वराह होऊनि मज रक्षिलेंसी । काय दुग्धासाठीं वधिसी धेनु ॥४॥
मैत्रेय बोलती भक्तांचेंही आम्हां । चरित्र कळेना मायामोहें ॥५॥
विदुरा, केंवी तें ईश्वरचरित्र - । रहस्य, ध्यानांत येई मग ॥६॥
सर्वदा भक्तांसी असो नमस्कार । जोडी तयां कर वासुदेव ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP