स्कंध ४ था - अध्याय २१ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१४४
नगरांत राव येई हें ऐकूनि । आनंदित मनीं सकळ प्रजा ॥१॥
गुढयातोरणांनीं नगरशृंगार । करिती नारीनर अत्यानंदें ॥२॥
मार्गी जागोजाग पूजिती नृपासी । गौरवी जनांसी प्रेमें पृथु ॥३॥
दिव्य वाद्यनादें कोंदलें गगन । प्रवेशला जाण नगरीं राव ॥४॥
शांत कार्यदक्ष गर्वहीन राजा । निधान तो साचा सद्‍गुणांचें ॥५॥
यापरी पृथूचें चरित्र ऐकूनि । मुनीतें तोषूनि वदला क्षत्ता ॥६॥
मुने, कैशापरी आयुष्य नृपानें । पुढती कंठिलें कथन करा ॥७॥
वासुदेव म्हणे मैत्रेय क्षत्त्यासी । पृथूचें कथिती वृत्त ऐका ॥८॥

१४५
गंगा-यमुनातटाकीं । विदुरा, वास्तव्य पृथूसी ॥१॥
तेथ प्रारब्धावशेष । संपावें हा धरी हेत ॥२॥
योगायोगासम भोग । भोगी निरपेक्षचित्त ॥३॥
यज्ञमंडपीं एकदां । भाषणार्थ राही उभा ॥४॥
उंच धिप्पाड शरीर । नेत्र आरक्त विशाल ॥५॥
मनोहर दंतपंक्ति । तेज:पुंज अंगकांति ॥६॥
नियमित इंद्रियगण । केलें ढुकूल परिधान ॥७॥
निशिकांत नक्षत्रांत । तैसा शोभला सभेंत ॥८॥
सुरस वक्तृत्व तयाचें । बहु विस्मय जनांतें ॥९॥
वासुदेव म्हणे राजा । काय बोलला तें ऐका ॥१०॥

१४६
धर्मतत्त्वेच्छूंनीं सज्जनांपुढती । आपुलाली मति कथणें योग्य ॥१॥
यास्तव आपुले कथितों विचार । नाहीं ज्ञानगर्व लवही मनीं ॥२॥
स्वस्वधर्मयुक्त निर्वाहसमर्थ । करुनि प्रजेस संरक्षावें ॥३॥
तेंवी शिक्षणार्थ योजिलें मजसी । लाभेल सद्‍गति राजधर्मे ॥४॥
विरुद्ध वर्तनें मज प्रजादोष । लागूनि ऐश्वर्य क्षीण होई ॥५॥
यास्तव सभ्यहो, मम कल्याणार्थ । ठेवूनियां साक्ष ईश्वरातें ॥६॥
योग्य मार्गे करा स्वधर्मपालन । तोचि मी मानी अनुग्रह ॥७॥
वासुदेव म्हणे पृथु ऐशापरी । जनांसी विनवी पुढती ऐका ॥८॥

१४७
सज्जनहो, मज द्यावें अनुमोदन । तेणें तेंचि पुण्य तुम्हांप्रति ॥१॥
कर्ता, शास्ता, अनुमोदकही तेंवी । कर्मफलभोगी ऐसें शास्त्र ॥२॥
ईश्वरार्थ कर्म वेनासी अमान्य । परी मनूसम थोर थोर ॥३॥
ध्रुव, ब्रह्मदेव तैसाचि शंकर । अर्पी कर्मफल म्हणती ईशा ॥४॥
यास्तव अर्पिती सर्व कर्मे त्यासी । अज्ञान वेनासी उघडचि हें ॥५॥
ऐशा अज्ञांस्तव दु:ख सज्जनांसी । सामर्थ्य ईशासी सकळ कांहीं ॥६॥
वासुदेव म्हणे कर्ता करविता । ईश्वरचि, निष्ठा तारक हे ॥७॥

१४८
चरणांगुष्ठी ते उपजूनि गंगा । पापमुक्त जगा जेंवी करी ॥१॥
तैसी ईशप्रीति उगवतां चित्तीं । यथाक्रम नाशी सकल पापें ॥२॥
पुढती विरागें घडे तत्त्वज्ञान । ईशपदप्रेम अचल जेणें ॥३॥
क्लेशकारक या संसाराची बाधा । घडेनाचि कदा ऐशा नरा ॥४॥
यास्तव सभ्यहो, काया वाचा मनें । अर्पा स्वस्वकर्मे ईश्वरासी ॥५॥
तेणें सकलही पुरतील काम । विश्वासही पूर्ण असों द्यावा ॥६॥
वासुदेव म्हणे यज्ञ तैं यज्ञांगें । भगवंताचीं रुपें फलासवें ॥७॥

१४९
प्रकृति काल तैं वासना प्राक्‍कर्म । शरीरासी जन्म देत असे ॥१॥
भिन्न भिन्न जरी भासती तीं परी । अंतर्यामी हरी एक असे ॥२॥
आकारें विभिन्न अग्नि जेंवी भासे । एकचि तयांचें असतां रुप ॥३॥
प्रजा मजवरी करी उपकार । स्वस्वधर्माचार आचरुनि ॥४॥
बलैश्वर्ययुक्त होतांही नृपानें । स्वमर्यादा ज्ञानें ओळखाव्या ॥५॥
कदाही स्वसत्ता ईश्वरभक्तांसी । तैसी सद्विप्रांसी दाऊं नये ॥६॥
तितिक्षा, तप तैं विद्याचि तयांचें । तेज:पुंज असे नित्यैश्वर्य ॥७॥
विप्रपदीं नम्र स्वयें भगवंत । सर्वदा हें तत्व ध्यानीं असो ॥८॥
वासुदेव म्हणे अनायासें शुद्धि । वंदितां विप्रांसी पुरती हेतु ॥९॥

१५०
महायोगी ज्ञाते वंदिती विप्रांतें । सेवा ते प्रभूतें मान्य होई ॥१॥
सर्वही देवता विप्रांचिया ठायीं । तयां अन्न देई तोचि धन्य ॥२॥
ब्रह्मज्ञ विप्र ते चिद्रूप ईशाचें । सेवितां तयातें ईश तोषे ॥३॥
ईश्वरस्वरुप वेदांचें पठण । तैसेंचि मनन एकचित्तें ॥४॥
तैसीच ठेवूनि श्रद्धा सद्वर्तन । तपश्चर्या, मौन, इंद्रियजय ॥५॥
ऐशा गुणवंत विप्रपादरजां । घेईन मी माझ्या शिरीं नित्य ॥६॥
ब्राह्मण, गोकुळ, तेंवी जनार्दन । सर्वदा प्रसन्न होवो मज ॥७॥
वासुदेव म्हणे पृथु भाग्यवंत । बोलतां आनंद सकलां ऐसा ॥८॥

१५१
साधु साधु ऐसें बोलले सज्जन । नृपाचें भाषण ऐकूनियां ॥१॥
सत्पुत्रें सद्गति म्हणणी तें सत्य । तारक वेनास पृथु राजा ॥२॥
हिरण्यकशिपु निंदूनि प्रभूसी । नरकीं जातां रक्षी बाळ तया ॥३॥
महाभक्ता, वीरा राजा, हो दीर्घायु । धन्य आम्हीं होऊं तुझ्यायोगें ॥४॥
तुझ्यासम आम्हां लाभला नरपती । जाहलों जगतीं धन्य आम्हीं ॥५॥
नित्य सत्त्वगुणें प्रजेचें पालन । करिसी कल्याण होवो तुझें ॥६॥
वासुदेव म्हणे आशीर्वाद ऐसे । फलद्रूप कैसे नच होती ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP