स्कंध ४ था - अध्याय १४ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१०८
अंगराज्यत्यागें होई अराजक । निरुपायें राज्य वेना देती ॥१॥
आधींच तो क्रूर त्यांत होता राजा । करी सज्जनांचा अपमान ॥२॥
यज्ञ, दान, होम, करुं नये कोणी । डांगोरा पिटूनि जनां कथी ॥३॥
स्वयें रथारुढ होऊनि आज्ञापि । तदा कांपे पृथ्वी स्वर्गासह ॥४॥
वृत्त हें सकळ कळतां मुनींसी । पाजिलें सर्पासी दग्ध वाटे दुग्ध ॥५॥
असो, आतां पाहूं करुनियां बोध । न ऐकतां दग्ध करुं तेजें ॥६॥
वासुदेव म्हणे चिंतूनियां ऐसें । पातले सभेतें मुनिश्रेष्ठ ॥७॥

१०९
शांतपणें मुनि विनविती वेना । आचरीं स्वधर्मा स्वहितार्थ ॥१॥
आयुष्य, संपत्ति, तेंवी बल, कीर्ति । धर्ममार्गे जाती तयांलागीं ॥२॥
धर्ममार्गे प्रजापालन जो करी । कृपा तयावरी श्रीहरीची ॥३॥
वेद, हवनीयद्रव्यें, तपश्चर्या । स्वरुपें हीं आर्या, भगवंताचीं ॥४॥
वैभवाचें मूळ लोकपालकृपा । संतोष तयांचा यज्ञमार्गे ॥५॥
सन्मान विप्रांचा यास्तव करावा । बोध वासुदेवा मोद देईं ॥६॥

११०
ऐकूनियां मुनिबोध । वेन बोलला उन्मत्त ॥१॥
अधर्मासी कथितां धर्म । करितां विपरीत कर्म ॥२॥
संरक्षक मी तुम्हांसी । पूजा त्यागूनियां माझी ॥३॥
ऐसें जारिणीचें कृत्य । आचरितां तुम्ही मूर्ख ॥४॥
करिती अवज्ञा राजाची । कदा न त्यां इष्टप्राप्ति ॥५॥
ब्रह्मा, विष्णु, शिव, इंद्र । देव नभांत सकळ ॥६॥
विष्णूचि तो नरपती । आराधना करा माझी ॥७॥
मजचि द्यावें बलिदान । श्रेष्ठ मजहूनि कोण ॥८॥
वासुदेव म्हणे ऐसीं । मुक्ताफळें उन्मत्ताची ॥९॥

१११
ऐकूनि नृपाची उन्मत्त ते वाणी । संक्रुद्ध होऊनि मुनिश्रेष्ठ ॥१॥
म्हणती तत्काळ वध याचा योग्य । निर्लज्ज हा जग संहारिल ॥२॥
राज्यपदालागीं असे हा अपात्र । दुर्बुद्धि हा क्रूर अधार्मिक ॥३॥
जयाच्या कृपेनें ऐसी राज्यप्राप्ति । तया ईश्वरासी निंदितो हा ॥४॥
मरणचि तेणें योग्य या दुष्टासी । वासुदेव कथी पुढती ऐका ॥५॥

११२
संयमित क्रोध उफाळे मुनींचा । दुर्वर्तनें होता मृतचि राव ॥१॥
हुंकारें तयाचा करुनियां नाश । गेले आश्रमास सुखें मुनि ॥२॥
पुत्रशोकें दु:ख पावली ‘सुनीथा’ । रक्षी पुत्रप्रेता मंत्रबळें ॥३॥
ऐसा कांही काळ लोटतां वनांत । दुश्चिन्हें मुनींस कळलीं बहु ॥४॥
तस्कर जनांसी बहु पीडिताती । प्रतिकार त्यांसी न करी कोणी ॥५॥
अराजकामाजी समर्थही जन । अनिष्ट जाणून मनांत मुनिश्रेष्ठ ॥७॥
अंग वंशावरी कृपा श्रीहरीची । व्हावी वंशवृद्धि तयाचीच ॥८॥
वासुदेव म्हने चिंतूनियां ऐसें । निज अधिकारातें स्मरती मुनि ॥९॥

११३
अनाथरक्षणास्तव शांतवृत्ति - । विप्रेंही, दुष्टांसी वधणें योग्य ॥१॥
उपेक्षा द्ष्टाची होतां शिरीं पाप । तपश्चर्याभंग ब्राह्मणांचा ॥२॥
जाणूनि हे शास्त्र औदासिन्यत्याग । करणें उचित म्हणती मुनि ॥३॥
पुढती वेनाच्या अंकाचें मंथन - । करितां, कृष्णवर्ण प्रगटे नर ॥४॥
हस्त पाद र्‍हस्व, दीर्घ हनु त्याची । नासिका निम्न ती रक्तनेत्र ॥५॥
ताम्रवर्ण केश आंखूड शरीर । होऊनियां नम्र अत्यादरें ॥६॥
काय करुं ऐसें म्हणतां निषीद । बोलले तयास मुनिश्रेष्ठ ॥७॥
निषाद वनींचे संतती तयाची । वेनपापरुपी नगरबाह्य ॥८॥
वासुदेव म्हणे यापरी निषाद । वसती वनांत सर्वकाळ ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP