स्कंध ४ था - अध्याय २० वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१३५
पृथुयज्ञें तुष्ट होई भगवंत । म्हणे क्षमा इंद्र मागे तव ॥१॥
यास्तव क्षमावें नृपाळा, तयासी । द्वेष न कोणासी करिती ज्ञाते ॥२॥
राया, तूंही जरी होसी मोहमग्न । वृद्धसेवा जाण व्यर्थ तरी ॥३॥
विषयेच्छायुक्तकर्मेचि हा देह । जाणतांचि मोह तुटे याचा ॥४॥
संपादित पुत्र-कलत्रीं आसक्ति । न राहे तयाची ऐशा ज्ञानें ॥५॥
देहचि नश्वर ऐसें जया ज्ञान । विषय त्या अन्य रुचती केंवी ॥६॥
वासुदेव म्हणे प्रत्यक्ष श्रीहरी । नृपाळासी करी बोध ऐका ॥७॥

१३६
निर्विकार आत्मा, सविकार देह । चेतन तो, देह जड असे ॥१॥
निर्मलचि आत्मा, देह तो मलिन । तैसा तो निर्गुण, सगुण देह ॥२॥
अमर्याद आत्मा, मर्यादा देहासी । आत्मा कोण झांकी, वस्त्र देहा ॥३॥
अदृश्यचि आत्मा परी देहसाक्षी । दृश्यही देहासी, न दिसेचि तें ॥४॥
आत्मचिंतन हें करील जो नित्य । असूणि अलिप्त संसारीं तो ॥५॥
वासुदेव म्हणे स्वानंदनिमग्न । आत्मानात्मज्ञान जयाप्रति ॥६॥

१३७
ऐसें शुद्ध ज्याचें मन । लाभे तयासी विज्ञान ॥१॥
तेणें ईश्वरासी ऐक्य । पावेल तो भाग्यवंत ॥२॥
मायास्थिताही त्या दोष । कदा बाधती न सत्य ॥३॥
निराशी जो श्रद्धान्वित । स्वस्वधर्मे भजे मज ॥४॥
हळु हळु मन त्याचें । राया, प्रसन्नत्वा लाभे ॥५॥
प्रसन्न तो सम्यक्‍दर्शी । गुणत्यागें पावे शांति ॥६॥
सर्वाध्यक्ष उदासीन । साक्षात्‍ तोचि प्ररब्रह्म ॥७॥
कदा बाधे न त्या द्वंद्व । सर्वत्रचि समभाव ॥८॥
ईश्वरोक्त अमात्यादि । साह्य राज्यरक्षणासी ॥९॥
नारायण रक्षी भक्तां । वासुदेवा नको चिंता ॥१०॥

१३८
स्वधर्माचरणीं सर्वत्र जो सम । मजवरी प्रेम करी नित्य ॥१॥
त्यागूनियां पक्षपात करीं राज्य । राया, धर्म हाच नृपाळाचा ॥२॥
ऐशा मार्गे प्रजा पुण्यमार्गी रत । लाभे तो षष्ठांश रायाप्रति ॥३॥
स्वधर्माचाराचें पुण्यही त्या लाभे । विपरीत मार्गे दोष बहु ॥४॥
प्रजादोष तेणें रायाच्या मस्तकीं । क्रमीं जो ज्ञात्यांसी मान्य पंथ ॥५॥
परंपराप्राप्त ऐशा मार्गे जातां । सहज सिद्धांचा लाभ घडे ॥६॥
यज्ञाहूनि मज निर्मात्सर्य, शांति । आवडे, वसे ती तुझ्या ठायीं ॥७॥
यास्तव जाहलों प्रत्यक्ष तुजसी । देईन मागसी तोचि वर ॥८॥
वासुदेव म्हणे सद्‍गद नृपती । प्रार्थी भगवंतासी स्तवनरुपें ॥९॥

१३९
प्रसन्न तूं पाहूनिया हर्ष फार होई ॥ परी मागूं काय ऐसी शंका मनीं येई ॥१॥
इंद्रियार्थसंयोग ते नरकलोकींही ॥ मोक्षपते मागूनि त्या कांही लाभ नाहीं ॥२॥
सौख्यभोग मजलागीं न देई दयाळा ॥ लोकनाथा, मोक्षही तो नकोरे मजला ॥३॥
संतमुखपद्मांतूनि दिव्य मकरंद ॥ प्रभो, पादपद्मींचा या न लाभेचि तेथ ॥४॥
यास्तव दयाळा, छंद लागो त्वद्‍गुणांचा ॥ श्रवणार्थ अयुत कर्ण लाभ घडो ऐसा ॥५॥
वासुदेव म्हणे ईशगुणश्रवणाची ॥ आवडी जयासी त्याच्या पादरजीं मुक्ति ॥६॥

१४०
मार्गभ्रष्टाही श्रवणें । तत्त्वबोध अंगीं बाणे ॥१॥
तेणें होई मार्गस्थित । देवा, श्रवण ऐसें श्रेष्ठ ॥२॥
सहजही जरी ज्ञाता । कदा ऐके मंगल कथा ॥३॥
तरी तल्लीन तो होई । विषयभान त्या न राही ॥४॥
चरणीं असूनीही नित्य । श्रवण आवडे लक्ष्मीस ॥५॥
वैर तियेचें मजसी । होतां तूंचि संरक्षिसी ॥६॥
वासुदेव म्हणे आतां । दोष ऐका श्रीहरीचा ॥७॥

१४१
वंचना दयाळा, करिसी भक्तांची । आशा कामनेची दावूनियां ॥१॥
क्षुद्र कामनेची करुनियां पूर्ति । भक्तांसी लोटिसी भवचक्रीं ॥२॥
मायावंचित ते असतां आधींचि । वंचिसी तयांसी तूंही केंवी ॥३॥
ऐशा कर्मे काय श्रेष्ठत्व तुजसी । कळे न मजसी दयावंता ॥४॥
पुत्राचें कल्याण करी जेंवी पिता । संरक्षावें भक्तां तैसें देवा ॥५॥
वासुदेव म्हणे निष्कपट प्रेम । पाहूनि भगवना वदला ऐका ॥६॥

१४२
दुर्घटही माया नृपाळा, मानूनि । मम पादपद्मीं धरिलें प्रेम ॥१॥
ऐश्वर्य सकळ लेखिलेंसी तुच्छ । होऊनि निरिच्छ ईशप्रेमें ॥२॥
यास्तव नृपाळा, झालों अति तुष्ट । राहील अखंड हेचि भक्ति ॥३॥
ममाज्ञेंने करीं प्रजेचें पालन । अप्रमत्त मन राखूनियां ॥४॥
सर्वत्र सर्वदा कल्याण यापरी । होईल न करीं लवही चिंता ॥५॥
वासुदेव म्हणे धन्य पृथुराज । गुणगानीं धुंद ऐशापरी ॥६॥

१४३
क्षत्त्यासी मैत्रेय वदती यापरी । बोलतां श्रीहरी राव वंदी ॥१॥
पुनरपि पूजा करुनि प्रभूची । सन्मानी ऋषींसी देवांसवें ॥२॥
घेऊनि निरोप जातां नारायण । भरले लोचन नृपाळाचे ॥३॥
दृष्टिआड होई तोंवरी त्या पाही । नमस्कार घेईं म्हणे अंतीं ॥४॥
वासुदेव म्हणे नृपाळ स्वस्थानीं । कृतार्थ होऊनि जाई तदा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP