TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५४९१ ते ५५००

बोधपर अभंग - ५४९१ ते ५५००

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


बोधपर अभंग - ५४९१ ते ५५००
॥५४९१॥
धोंडा दुध प्याला रेडा बोलविला । अंगें फुलें झाला ह्मणुनियां ॥१॥
वारुळाचा झगा लेऊनी बैसला । पाला जो फुटला टोणप्यासी ॥२॥
बाळा तुडउनी चिखल जो केला । बाळ मडकें झाला नवल जेव्हां ॥३॥
फाडोनियां पोट लपविला विठो । येईल चोरटा ह्मणोनियां ॥४॥
तुका ह्मणे ऐसे मरोनियां गाजी । उरे जगामाजी कीर्ति त्याची ॥५॥

॥५४९२॥
पालथी घागरी घातलें जीवन । न राहे क्षण वाहुनि जाय ॥१॥
पाषाण जिवनीं घातला कल्पवरी । पहतां अंतरीं कोरडाची ॥२॥
कचुर तो मुग न येतसे पाका । पाहतां सारिखा दिसतसे ॥३॥
तुका ह्मणे उपाय असती सकळां । न चलती खळा वृथा सर्व ॥४॥

॥५४९३॥
नामधारकाच्या लोळाचें मोरीस । जावें घरास अभक्तांच्या ॥१॥
नामधारकाचें श्वान व्हावें वोजा । न घ्यावी ते पूजा अभक्तांची ॥२॥
नामधारकाची व्हावी केरसुणी । न व्हावी पट्टराणी अभक्तांची ॥३॥
तुका ह्मणे भला सत्संगीं उपवास । नको अमृतग्रास अभक्तांचा ॥४॥

॥५४९४॥
राजहंस भोक्ता पयाचा निश्चयें । वायस तो होय खताहारी ॥१॥
संतांची संगती प्रेमळ धरिती । कुटील ते जाती यमपंथें ॥२॥
पर्तिव्रते मनीं पती तो ईश्वर । जारिणीचा सार परपुरुष ॥३॥
तुका ह्मणे हरी आवडतो भक्तां । विषय अभक्तां माया गोड ॥४॥

॥५४९५॥
पुत्र वित्त दारा गृहादि सकळ । देउनी दयाळ वाट पाहे ॥१॥
देवाचे मनांत मज हे ध्यातील । अंतीं पावतील निजपद ॥२॥
सोडुनी देवासी गुंतले दोरासी । झाले अविश्वासी विठ्ठलाचे ॥३॥
तुका ह्मणे फार भुलुनियां मेले । विरळा लागले हरिपायीं ॥४॥

॥५४९६॥
पशु पक्षी यांसी नाहीं आत्मज्ञान । काय नारायण जाणताती ॥१॥
नर देह वांटा हरी जाणावया । अधिकार तया दिला देवें ॥२॥
प्राचीनाचे बळें अमृत जो होय । तेचि धरी सोय हरिपायीं ॥३॥
तुका ह्मणे देहीं चुकलिया हरी । आली तया फेरी चौर्‍याशीची ॥४॥

॥५४९७॥
भावाविण माझा विठ्ठल नाकळे । धन विद्या बळें दुरावत ॥१॥
धनवंताकडे न जाय श्रीहरी । धुंडीत भिकारी प्रेमळासी ॥२॥
दीनांसी दयाळ अभक्तांसी काळ । हृद्गत सकळ जाने हरी ॥३॥
तुका ह्मणे दंभ न चले विठ्ठलीं । बहुत शिणली वेद शास्त्रें ॥४॥

॥५४९८॥
कोटी करितां साधन । हाता नये नारायण ॥१॥
वेद शास्त्रें पारंगत । जरी झाले मुखोद्गत ॥२॥
रिद्धि सिद्धि अनुकूळ । झाल्या न भेटे गोपाळ ॥३॥
तुका ह्मणे गुरुविणें । आत्मलाभ नाहीं होणें ॥४॥

॥५४९९॥
निर्विकल्प हरी अयोध्या विहारी । षड चक्रधारी पांडुरंग ॥१॥
मथुरानिवासी विश्वेश्वर कासी । सांभव कैलासीं पांडुरंग ॥२॥
वैकुंठभूपाळ काळाचाही काळ । तो हा घननीळ पांडुरंग ॥३॥
तुका ह्मणे सर्व व्यापी हा विठ्ठल । पहावा सखोल ज्ञानदृष्टी ॥४॥

॥५५००॥
बाळा दुध कोण करितो उत्पत्ती । वाढवी श्रीपति स्वये दोन्ही ॥१॥
फुटती तरुवर उष्णकाळामाजी । जीवन तयासी कोण घाली ॥२॥
काय खाती तया भुजंगांची पिलीं । कोशिळाची केली चिंता कोणी ॥३॥
कुर्मिणीच्या बाळा नाहीं पयपान । स्वयें नारायण जिववितो ॥४॥
तुका ह्मणे देव विश्वासा पाळीता । त्यासी नसे चिंता तुमची कां ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2019-04-04T19:51:56.3430000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

Did you know?

I'm not able to locate this Mahakurma PuraNa vAkhya
Category : Hindu - Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.