मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
४९५१ ते ४९६०

बोधपर अभंग - ४९५१ ते ४९६०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥४९५१॥
एकविध नारायण । तेथें विषमाचा सीण ॥
पालटों चि भिन्न । नये अणुप्रमाण ॥१॥
अवघें सारावें गाबाळ । चुकवूनियां कोल्हाळ ।
आनंदाचें स्थळ । एकाएकीं एकांत ॥२॥
कायावाचामन । स्वरुपींच अनुसंधान ॥
लक्ष भेदी बाण । येणें पाडें लवलाहो ॥२॥
तुका म्हणे आळस निद्रा । येथें देउनियां चिरा ॥
देउनियां धीरा । मिठी जाणा जागृती ॥४॥

॥४९५२॥
विषम वाटे दुरवरी । चालूनि परती धरी ॥
मागील ते उरी । नाहीं उरली भयाची ॥१॥
मुख्य न व्हावा तो नाड । सेवटाचे हातीं गोड ॥
सरलिया चाड । मग कैचे उद्वेग ॥२॥
होता पहिला अभ्यास । समयीं घालावया कास ॥
तेव्हां लटिके दोष । योगें अनुतापाच्या ॥३॥
तुका ह्मणे आहे । बुद्धी केलियानें साहे ॥
जवळी च पाहे । देव वाट स्मरणाची ॥४॥

॥४९५३॥
सत्य त्यागा चि समान । नलगे वेचावें वचन ॥१॥
नारायणा ऐसे दास । येरयेरांची च आस ॥२॥
मळ नाहीं चित्ता । तेथें देवाची च सत्ता ॥३॥
तुका ह्मणे जाण । तें च भल्याचें वचन ॥४॥

॥४९५४॥
सत्य माप वाढे । गबाळाची चाली खोडे ॥१॥
उतरे तें कळे कसीं । विखरोन सर्व देशीं ॥२॥
घरामध्यें राजा । नव्हे हो वा पाटपूजा ॥३॥
तुका ह्मणे साचें । रुप तें दर्पणाचें ॥४॥

॥४९५५॥
उचिताचा काळ । साधावया युक्तिबळ ॥
आपलें सकळ । ते प्रसंगीं पाहिजे ॥१॥
नेम नाहीं लाभ हानि । अवचित घडती दोनी ।
विचारुनि मनीं । पाहिजे तें प्रयोजावें ॥२॥
जाळ जाळा काळें । करपों नेदावें आगळें ॥
जेवितां वेगळें । ज्याचें त्याचें तेथें शोभे ॥३॥
पाळी नांगर पाभारीं । तन निवडूनि सोंकरी ॥
तुका ह्मणे धरी । सेज जमा सेवटीं ॥४॥

॥४९५६॥
हेंही ऐसें तेंही ऐसें । उभय पिसें अविचार ॥१॥
अभिमानाचे ठेलाठेलीं । मधीं झाली हिंपुटि ॥२॥
धीरा शांती ठाव नुरे । हाचि उरे आबाळ्या ॥३॥
कौतुक हें पाहे तुका । काढतां लोकां आधणीं ॥४॥

॥४९५७॥
हित जाणे चित्त । कळोम येतसे उचित ॥१॥
परिहार ते संपादनी । सत्य कारण कारणीं ॥२॥
वरदळ तें नुतरे कसीं । आगीमध्यें तें रसी ॥३॥
तुका ह्मणे करुनी खरें । ठेवितां तें पुढें बरें ॥४॥

॥४९५८॥
नाहीं सरों येत कोरडया उत्तरीं । जिव्हाळ्याची बरी ओल ठायीं ॥१॥
आपुलिया हिता मानिसी कारण । सत्या नारायण साह्य असो ॥२॥
निर्वाणीं निवाड होतो आगीमुखें । तप्त लोह सुखें धरितां हातीं ॥३॥
तुका म्हणे नेम न टळतां बरें । खर्‍यासीचि खरें ऐसें नांव ॥४॥

॥४९५९॥
मंगळाचा मंगळ सांटा । विट तोटा नेणे तें ॥१॥
हें भरा सातें आलें । भलें भलें ह्मणवावें ॥२॥
जनीं जनार्दन वसे । येथें दिसे तें शुद्ध ॥३॥
तुका म्हणे बहुतां मुखें । खरें सुखें ठेवावें ॥४॥

॥४९६०॥
चित्त तें चिंतन कल्पनेची धांव । जे जे वाढें हांव इंद्रियांची ॥१॥
हात पाव दिसे शरीर चालतां । नांवें वेद सत्ता जीवाची ते ॥२॥
रवीचिये अंगीं प्रकाशक कळा । वचनें निराळा भेद दिला ॥३॥
तुका ह्मणे माप वचनाच्या अंगीं । मौन्य काय रंगीं निवडावें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP