मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५०२१ ते ५०३०

बोधपर अभंग - ५०२१ ते ५०३०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५०२१॥
विधीनें सेवन । विषय त्यागातें समान ॥१॥
मुख्य धर्म देव चित्तीं । आदि अवसान अंतीं ॥२॥
बहु अतिशय खोटा । तर्के होती बहु वाटा ॥३॥
तुका ह्मणे भावें । कृपा करीजेते देवें ॥४॥

॥५०२२॥
काय उणें आह्मां विठोबाचे पायीं । नाहीं ऐसें कायी येथें एक ॥१॥
तें हें भोंवतालें ठायीं वांटूं मन । बराडी करुन दारोदारीं ॥२॥
कोण बळी माझ्या विठोबा वेगळा । आणीक आगळा दुजा सांगा ॥३॥
तुका ह्मणे मोक्ष विठोबाचे गांवीं । फुकाचीं लुटावीं भांडारें तीं ॥४॥

॥५०२३॥
शोकें शोक वाढे । हिमतीचे धीर गाढे ॥१॥
येथें केलें नव्हे कायी । लंडीपण खोटें भाई ॥२॥
करिती होया होय । परी नव्हे कोणी साह्य ॥३॥
तुका ह्मणे घडी । साधिलिया एक थोडी ॥४॥

॥५०२४॥
हीं च त्यांचीं पंचभूतें । जीवन भातें प्रेमाचें ॥१॥
कळवळा धरिला संतीं । ते निगुती कैवाड ॥२॥
हा च काळ वर्तमान । साधन ही संपत्ती ॥३॥
तुका ह्मणे दिवसराती । हें चि खाती अन्न ते ॥४॥

॥५०२५॥
दुध दहीं ताक पशूचें पाळण । त्यांमध्यें कारण घृतसार ॥१॥
हें चि वर्म आह्मां भाविकांचे हातीं । ह्मणउनी चित्तीं धरिला राम ॥२॥
लोहो कफ गारा अग्नीचिया काजें । येर्‍हवी तें ओझें कोण वाहे ॥३॥
तुका ह्मणे खोरीं पाहारा जतन । जोंवरि हें धन हातीं लागे ॥४॥

॥५०२६॥
सवंग झालें सवंग झालें । घरा आलें बंदरींचें ॥१॥
आतां हेवा करा सोस । भक्तिरस बहु गोड ॥२॥
पाउल वेचे चिंता नाहीं । आड कांहीं मग नये ॥३॥
तुका ह्मणे संचिताचें । नेणें काचें राहो तें ॥४॥

॥५०२७॥
कल्पतरु रुया नव्हती बाभुळा । पुरविती फळा इच्छितिया ॥१॥
उदंड त्या गाई ह्मैसी आणि शेळ्या । परि त्या निराळ्या कामधेनु ॥२॥
तुका ह्मणे देव दाखवील दृष्टी । तया सवें भेटी थोर पुण्य ॥३॥

॥५०२८॥
महुरा ऐसी फळें नाहीं । आलीं कांहीं गळती ॥१॥
पक्वदशे येती थोडीं । नास आढी वेचे तों ॥२॥
विरळा पावे विरळा पावे । अवघड गोवे सेवटाचे ॥३॥
उंच निंच परिवार देवी । धन्या ठावी चाकरी ॥४॥
झळके तेथें पावे आणी । ऐसे क्षणी बहु थोडे ॥५॥
पावेल तो पैल थडी । ह्मणों गडी आपुला ॥६॥
तुका ह्मणे उभार्‍यानें । कोण खरें मानितसे ॥७॥

॥५०२९॥
गति अधोगति मनाची युक्ति । मन लावीं एकांतीं साधुसंगें ॥१॥
जतन करा जतन करा । धांवतें सैरा ओढाळ तें ॥२॥
मान अपमान मनाचे लक्षण । लाविलिया ध्यान तें चि करी ॥३॥
तुका ह्मणे मन उतरी भवसिंधु । मन करी बंधु चौर्‍याशीचा ॥४॥

॥५०३०॥
स्वयें पाक करी । संशय तो चि धरी ॥
संदेहसागरीं आणीक परी बुडती ॥१॥
जाणे विरळा एक । झालें तेथींचें हे सुख ॥
देखिलें बहुतेक । पुसतां वाट चुकले ॥२॥
तो चि जाणे सोंवळें । शोधी विकल्पाचीं मुळें ॥
नाचती पाल्हाळें । जे विटाळें कोंडिले ॥३॥
तोचि साधी संधी । सावध त्रिकाळ जो बुद्धि ॥
संदेहाचा संधी । वेठी आणिक धरियेले ॥४॥
अखंड तें ध्यान । समबुद्धि समाधान ॥
सोंग वांयांविण । ते झांकून बैसती ॥५॥
करणें जयासाठीं । जो नातुडे कवणे आटी ॥
तुका ह्मणे साटी । चित्तवित्तें वांचूनी ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP