मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५३८१ ते ५३९०

बोधपर अभंग - ५३८१ ते ५३९०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५३८१॥
शुरां साजती हत्यारें । गांडया हांसतील पोरें ॥१॥
काय केली विटंबना । मोती नासिकांवांचून ॥२॥
परिव्रते रुप साजे । शिंदळी काजळ लेतां लाजे ॥३॥
दासीपत्नीसुता । नव्हे सरी एकचि पिता ॥४॥
तुका ह्मणे तरी । अंतर शुद्ध धंद्यावरी ॥५॥

॥५३८२॥
अजामिळ भिल्ली तारिली कुंटिणी । प्रत्यक्ष पुराणीं वंद्य होय ॥१॥
नीचाचे जातीचा उंच वंद्य होय । श्रीहरीचे गाय गुणानुवाद ॥२॥
त्याची निंदा करी त्याची कुष्ठ बुद्धी । मुखें संवदणी रजकाची ॥३॥
तुका ह्मणे येथें भजन प्रमाण । काय थोरपण जाळशील ॥४॥

॥५३८३॥
धन्य तेचि प्राणी क्षमा ज्यांचे अंगीं । न भंगे प्रसंगीं धैर्यबळ ॥१॥
न ह्मणे कोणासी उत्तम वाईट । महत्व वरिष्ठ नसे जेथें ॥२॥
अंतरीं सबाह्य सारिखे निर्मळ । हृदय कोमळ गंगारुप ॥३॥
तुका ह्मणे काया कुरवंडीन तया । ठेवीन मी पाया मस्तक हें ॥४॥

॥५३८३॥
धन्य तेचि प्राणी क्षमा ज्यांचे अंगीं । न भंगे प्रसंगीं धैर्यबळ ॥१॥
न ह्मणे कोणासी उत्तम वाईट । महत्व वरिष्ठ नसे जेथें ॥२॥
अंतरीं सबाह्य सारिखे निर्मळ । हृदय कोमळ गंगारुप ॥३॥
तुका ह्मणे काया कुरवंडीन तया । ठेवीन मी पाया मस्तक हें ॥४॥

॥५३८४॥
ज्याचा सखा हरी । त्यावरी विश्व कृपा करी ॥१॥
ऐसा असूनी अनुभव । कासावीस होतो जीव ॥२॥
करितां हरीचें चिंतन । त्यासि बाधूं न सके विघ्न ॥३॥
तुका ह्मणे हरी । प्रल्हादासी यत्न करी ॥४॥

॥५३८५॥
विरोधाचें मज न साहे वचन । बहु होतें मन कासावीस ॥१॥
ह्मणवुनी जीवा न साहे संगती । बैसतां एकांतीं गोड वाटे ॥२॥
देहाची भावना वासनेचा संग । नावडे उबग आला यांचा ॥३॥
तुका ह्मणे देव अंतरे यामुळें । आशा मोहजाळें दु:ख वाटे ॥४॥

॥५३८६॥
नाहीं धर्माची वासना । काय करुनी प्रदक्षणा ॥१॥
असें नव्हे भक्तिवर्म । तेथें नाहीं माझा राम ॥२॥
नये कृपा कांहीं केल्या । नाहीं नेम जीव गेल्या ॥३॥
जैसी खांडियाची धार । विठ्ठलपायीं तुका शूर ॥४॥

॥५३८७॥
ज्यासी माता परनारी । त्याचे मुखीं खरा हरी ॥१॥
इतर पोटासाठीं सोंग । तेथें कैंचा पांडुरंग ॥२॥
ज्याला परधन विष । तोचि खरा हरीदास ॥३॥
तुका ह्मणे सत्य सत्य । कृष्णपायाची शपथ ॥४॥

॥५३८८॥
अंतरीं निर्मळ वाचेचा रसाळ । त्याचे गळां माळ असो नसो ॥१॥
आत्मानुभवीं चोखाळील्या वाटा । त्याचे माथां जटा असो नसो ॥२॥
परस्त्रीचे ठायीं जो का नपूंसक । त्याचे आंगा राख असो नसो ॥३॥
परद्रव्या अंध निंदेसी जो मुका । तोची संत देखा तुका ह्मणे ॥४॥

॥५३८९॥
नरदेहा यावें हरिदास व्हावें । तेणें चुकवावें गर्भवासा ॥१॥
नाहीं तरी वायां शीणविली माय । नरकासी जाय जन्मोजन्मीं ॥२॥
तीर्थव्रतदान देवाचें पूजन । ऐसें हें साधन साधकाचें ॥३॥
तुका ह्मणे मुखीं नित्य ह्मणे हरी । तया सुखा सरी नाहीं पार ॥४॥

॥५३९०॥
कवणाचें घर कवणाचें दार । सोडोनी संसार जाणे लागे ॥१॥
जाणे लागे अंतीं एकला एकवट । व्यर्थ खटपट जन्मवरी ॥२॥
जन्मवरी जाण संसारीं गोविलें । नाहीं कांही केलें आत्महीत ॥३॥
आत्महीत गेलें संसाराचे ओढी । अंतीं कोण सोडी रामावीण ॥४॥
घातकचि आहे लोकांचा तो संग । ह्मणोनी नि:संग तुका राहे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 04, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP