मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५३६१ ते ५३७०

बोधपर अभंग - ५३६१ ते ५३७०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५३६१॥
खोळंबां ती मग तातडीची धांव । अंगा आणी भाव निश्चयाचा ॥१॥
ह्मणउनी बरी विचारावी चाली । उरे तेचि बोली कामा येती ॥२॥
कोरडें वैराग्य मांजिर तें खरें । शूरत्व उतरे अंगींचे तें ॥३॥
तुका ह्मणे नीट झर्‍याची ते चाली । सांठवण खोली कैसी याची ॥४॥

॥५३६२॥
प्रयाणाचे योगें वाटेवरी गंगा । जातां स्नान कांगा करुं नये ॥१॥
तीर्थवासीं तेणें आलिया पर्वणी । आळसें करुनी साधूं नये ॥२॥
क्षेत्रवास तया सहज असोन । देवाचें दर्शन घेऊं नये ॥३॥
तैसा विठोबाचा मुद्रांकित तुका । सांगे हिता तें कां ऐकूं नये ॥४॥

॥५३६३॥
क्षमा दया लोकां । अंतपार नाहीं लेखा ॥१॥
घरोघरीं लक्ष्मीवास । आला दरिद्राचा त्रास ॥२॥
नाहीं केलं जप तप । नरनारी सुखरुप ॥३॥
तुका ह्मणे कृपा केली । देवें मग ओंवाळिली ॥४॥

॥५३६४॥
अंगीं नाहीं स्वत:शक्ती । कांहीं भक्ति वैराग्य ॥१॥
तया कैसें घडे जाण । नाहीं मन हातीं तों ॥२॥
शांती इंद्रियाची झाली सर्व मेली वासना ॥३॥
कैसा होय ब्रह्म तेणें । हिंडे मन सैराट ॥४॥
तुक ह्मणे मिराशीचें । शेत ज्याचें वाहेना ॥५॥

॥५३६५॥
दुर्जनाचा संग आगीचें तें झाड । अंगा येती फोड लागतांचि ॥१॥
काय लाभ त्याचे शेजे बैसायाचा । वीट या देहाचा कां करावा ॥२॥
गूळ टाकोनियां वृंदावन खावें । ऐसें कां करावें तुका ह्मणे ॥३॥

॥५३६६॥
उद्धरल्या जाती । द्रव्ये रंगल्या पद्धती ॥१॥
बहु ह्मणवोनि फार । त्याचें असावें अंतर ॥२॥
कैंची पाठी पोट । गोड विषासी शेवट ॥३॥
तुका ह्मणे सोपा । नेणे कुरवाळिलें बापा ॥४॥

॥५३६७॥
जाणा वाण निवडिलें । ऐसें भलें वाईट ॥१॥
सारासार भरे पोटीं । खरें हातीं घेतलें ॥२॥
खरें खोटें वेळावेळ । हरीबळ जाणती ॥३॥
शुद्धाशुद्ध भाव नेणें । तुका ह्मणे मी एक ॥४॥

॥५३६८॥
पोटासाठीं लेकराची । प्रीत मानी समर्थाची ॥१॥
दाट बळें संत निंदा । करी नाइकावें सदा ॥२॥
पोटामध्यें पाळी कोण । पुढें अन्न देतें कोण ॥३॥
तुका ह्मणे पोट । भाग्यवंता घरीं भाट ॥४॥

॥५३६९॥
आलिया याचका ह्मणतां हो पुढें । आपुलें रोकडें सत्व जातें ॥१॥
काय कामभार घेऊनि मस्तकीं । हीनकर्मी लोकीं ह्मणावया ॥२॥
दारीं हाक कैसें करावें भोजन । रुची तरी अन्न कैसें देतें ॥३॥
तुका ह्मणे ध्वज उभारिला कर । ती शक्ति उदार काय झाली ॥४॥

॥५३७०॥
करावा संकोच आपणा भोंवता । होय तें बहुतां सुख किजे ॥१॥
देवाची ते पुजा भुतांचें पाळण । मत्सर तो शीण बहुतांचा ॥२॥
रुसावें फुगावें आपुलियावरी । उरला तो हरी सकळ ही ॥३॥
तुका ह्मणे संतपण याचि नांवें । जरी होय जीव सकळांचा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 04, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP