मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५१३१ ते ५१४०

बोधपर अभंग - ५१३१ ते ५१४०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५१३१॥
सतीचा वोवसा जेणें पदरीं घ्यावा । संकल्प सोडावा जिवीत्वाचा ॥१॥
जयानें पैं घ्यावें वेडियाचें सोंग । तेणें सर्व अंग बांधूनि द्यावें ॥२॥
ब्रीद बांधोनियां ह्मणवी जो गाजी । तेणें मरणामाजी फिरुं नये ॥३॥
तुका ह्मणे ज्यासी पाहिजे संतपण । निंदो परी जन ढळों नये ॥४॥

॥५१३२॥
काय बोलोनियां तोंडें । मनामाजी कान कोडें ॥१॥
पर स्त्रीसीं ह्मणतां माता । चित्त लाजवीतें चित्ता ॥२॥
धर्माधर्मीक गोष्टी सांगे । उष्ठे हातीं नुठवी कांगे ॥३॥
जुनें कर्म घडलें अंगीं । तें तें आठवी प्रसंगीं ॥४॥
बोले तैसा चाले । तुका ह्मणे तो अमोल ॥५॥

॥५१३३॥
नपुंसका हातीं दिधली पद्मीण जाती । शिंदळीस पती काय होय ॥१॥
सुकरा कस्तुरी गाढवा चंदन । मर्कटा सिंहासन काय होय ॥१॥
आंधळ्या दर्पण नकटया भूषण । दारिद्री शहाणा काय कीजे ॥३॥
नपुंसका सिंहासन श्वानासी पालखी । देखोनियां भुंकी सर्वकाळ ॥४॥
तुका ह्मणे ऐसें पूर्वपुण्य कीजे । तरिच पाविजे ब्रह्मज्ञान ॥५॥

॥५१३४॥
अंगें तैसें व्हावें । मग देवारां बैसावें ॥१॥
जैसें पाहे गंगाजळ । तैसें हृदय निर्मळ ॥२॥
परक्याची कांता । जैसी मानी आपुली माता ॥३॥
तुका ह्मणे पायवणी । त्याचें पाजा मज कोणी ॥४॥

॥५१३५॥
साराचें हें सार वेदाचें जिव्हार । ध्यावा रघुविर ऐक्य भावें ॥१॥
द्वैताची झाडणी गुरुचे वचनीं । करुनीयां मनी गुह्य ध्यावें ॥२॥
हरीचें हें नाम संतसमागम । होऊनी निष्काम देहातीत ॥३॥
तुका ह्मणे येथें नलगे आयास । पाहिजे विश्वास गुरुपायीं ॥४॥

॥५१३६॥
कळलें ह्मणती आह्मा ब्रह्मज्ञान । धुरेचें अज्ञान जाणावें तें ॥१॥
व्यासशिवादिकां नव्हेची अंत । ज्ञान तें स्वतंत्र हरीरुप ॥२॥
वृत्तिरुप ज्ञाना भुलले सकळ । राहिले वेगळें अनादी जें ॥३॥
तुका ह्मणे हरी हंसरुप झाला । बोधिलें पुत्राला तेंची खरें ॥४॥

॥५१३७॥
जें ठायीं गेला विवेक बुडून । विठ्ठल चरण तेची खरे ॥१॥
सकळ विपत्ती लाजोनियां गेल्या । श्रुति परतल्या नेति नेति ॥२॥
वेद माहाराज पायीं मौनावलां । सिद्धांती तो झाला समरस ॥३॥
तुका ह्मणे हरीचरणाचा अंत । नकळे निश्चित ब्रह्मादिकां ॥४॥

॥५१३८॥
सर्वाचीं अंतरें जाणतोसी हरी । तयापुढें चोरी केवी घडे ॥१॥
मन बुद्धिजाती धुंडाया पदार्थ । विठ्ठल समर्थ उभा तेथें ॥२॥
परद्वार केलें एकांतीं जाऊनीं । मानियेलें मनीं तिचें नाहीं ॥३॥
तुका ह्मणे साक्षी अनंत ब्रह्मांडीं । तस्कराचे पिंडीं कैंसा नाहीं ॥४॥

॥५१३९॥
अनुभवा येतां विठ्ठल सांवळा । हरती सकळा आधिव्याधी ॥१॥
विरोनीयां जाती देहादिक भाव । अंतरीं माधव कृपा करी ॥२॥
समदृष्टी ज्ञान प्रकाशिता हरी । परेहुनी पर सुख दावी ॥३॥
तुका ह्मणे गुरुकृपेचें हें फळ । येतो घननीळ प्रत्ययासी ॥४॥

॥५१४०॥
पंच भूतें जाती लया । अंतीं आपुलाले ठाया ॥१॥
अस्ति मांस पृथ्वी नेत । आप उदकीं मिळत ॥२॥
तेज अग्नीरुप झालें । प्राण वायुसीं मिळाले ॥३॥
शब्द आकाशीं निमाला । त्रिगुणाचा क्षय झाला ॥४॥
तुका ह्मणे मृगजळ । भास लटीका सकळ ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP