मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५१७१ ते ५१८०

बोधपर अभंग - ५१७१ ते ५१८०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५१७१॥
थोराचिया मना नीचाचें भाषण । नये अनुमान पडतसे ॥१॥
परिसें धातूतें धि:कारिल्यावरी । कैंचा तयावरी गुण चढे ॥२॥
कल्पतरु तळीं याचक अमृत । कोणतें महत्व आलें अंगा ॥३॥
घरीं चिंतामणी चिंता जरी उरे । काय त्याचें सरे थोरपण ॥४॥
तुका ह्मणें देह विठोबाचे पायीं । ठेविलिया कायी लाज नये ॥५॥

॥५१७२॥
असत्य तें पाप सुकृताचा लोप । दुष्टा वज्रलेप दोष होती ॥१॥
अनाचारी गर्भी भोगी नरकास । स्वर्गी पितरांस ठाव नाहीं ॥२॥
असत्य असुर असे दुराचार । असत्यासी थार नाहीं कोठें ॥३॥
सत्यपुण्यक्षय श्वान खर होय । असत्यानें जाय यशकीर्ति ॥४॥
असत्यानें भोग जोडे क्षयरोग । असत्याचें अंग विटाळाचें ॥५॥
असत्य तो क्रोधी असत्य दुर्बुद्धि । असत्यासी व्याधी नाना होत ॥६॥
असत्य अपेशी असत्य तें दोषी । सत्य असत्यासी नाहीं कदा ॥७॥
तुका ह्मणे मुक्ति सत्यापाशीं घेणें । असत्यानें जाणें यमलोका ॥८॥

॥५१७३॥
शब्दीं गौरवीत वाणी । भाव आंत वरी दोनी ॥१॥
शोभे तरीच वेडी । नग्न होय धडफुडी ॥
नाहीं जीवित्वाची आस्था । लज्जा भय शंका - चित्ता ॥३॥
काय न पाहों आणिकां । मागें दुजें ह्मणे तुका ॥४॥

॥५१७४॥
कथेचिया मिषें करितो सोहळे । पुरवी डोहळे वासनेचे ॥१॥
कायीसी सांगणें सांगोनी नेटका । आपण फुटका परळ जैसा ॥२॥
गातों तेंचि नाहीं कायीं तया ठावें । तोंड वासी देव म्हणतसे ॥३॥
तुका म्हणे मध पायस मिष्ठान्न । तैसा दुर्जन शिवों नये ॥४॥

॥५१७५॥
आह्मा कवतुक जगा दया नीत । करावें फजित चुकलिया ॥१॥
कासयाचा वाद एकाच्या निरोपें । काय व्हावें कोपें जगाचिया ॥२॥
अविद्येचा येथें कोठें परिश्रम । रामकृष्णनाम ऐसे बाण ॥३॥
तुका ह्मणे येथें खर्‍याचा विकरा । न सरती येरा खोटयापरी ॥४॥

॥५१७६॥
काळ उचितानुचित । वेळ रक्षीसी अनंत ॥१॥
युक्ति आपुलिया बळें । साह्य प्रसंगीं त्या फळे ॥२॥
नेम साधनीं पारिखें । सुख नसावें हें दु:ख ॥३॥
तुका म्हणे काय यांत । मानूं नये दुजी मात ॥४॥

॥५१७७॥
हीनवरा भार्या सदा दु:ख भोगी । वयसा अभोगीं व्यर्थ जाय ॥१॥
सदा हडहडी न कोणी ह्मणे बरें । सासुरवास पार तें ही करी ॥२॥
सासुरा म्हणती पोशिलासे दांडा । पाठी लागे भांडा सर्व काळीं ॥३॥
नणंद कामासी सदा द्वेष करी । सुधिया उत्तरीं नये कदा ॥४॥
भावा म्हणे कैसा पोसिला हा रेडा । नेसाया घोंगडा धड नेदी ॥५॥
द्वेषिया तो दिर सदा करी चेष्टा । हिचिया अदृष्टा हद्द नाहीं ॥६॥
वर्जी अन्न सासु लवण ज्या नाहीं । रात्रंदिन पाही द्वेष मोठा ॥७॥
जावा काम घेती निज नाहीं रात्रीं । चकलिया देती शिव्या मार ॥८॥
घरींचें कोणीही न पाहेचि धड । अवघ्यांत द्वाड मानीतसे ॥९॥
भ्रतार खेळतां दिस नेणे रात्र । पोटीं कैचा पुत्र अभागीण ॥१०॥
माहेरीं तों कोणी नं पुसेचि कधीं । चिंतेचिया मधीं बुडलीसे ॥११॥
तुका ह्मणे क्षण नाहीं सुखलेश । तया पंढरीश कैसा पावे ॥१२॥

॥५१७८॥
कुळधर्मे पुण्य कुळधर्मे दान । कुळआचरण योग्य होय ॥१॥
कुळधर्माचार कुळधर्म थोर । कुळधर्म सार साध्य होय ॥२॥
कुळधर्म भुक्ती कुळधर्म मुक्ति । कुळधर्म पूर्ति पितृदेव ॥३॥
कुळधर्म पूजा घडतसे देवा । नव्हे दुज्या भावा कुळधर्म ॥४॥
तुका म्हणे देव भेटे कुळधर्मे । नये जरी कर्मे मध्यें कांहीं ॥५॥

॥५१७९॥
स्वधर्म विरक्ति स्वधर्म ते भक्ति । स्वधर्मे विश्रांती परलोकीं ॥१॥
ऐसें वर्म कोणी जाणे भाग्यवंत । तेथेंचि अच्युत वास करी ॥२॥
स्वधर्म तो श्रेष्ठ स्वधर्म वरीष्ठ । स्वधर्म उद्धट साधनासी ॥३॥
स्वधर्मी महंती स्वधर्मी सद्भक्ती । स्वधर्मे तीं होती पुण्य श्लोक ॥४॥
तुका ह्मणे राहे स्वधर्मासी तर । तेथें तो श्रीधर तिष्ठतसे ॥५॥

॥५१८०॥
स्वधर्मेचि ज्ञान स्वधर्मेचि मान । स्वधर्म तें मौन साधकासी ॥१॥
स्वधर्म आचार विहित सकळां । दुर्लभ गोपाळा योग्य होय ॥२॥
स्वधर्म तो मूळ स्वधर्मी च कुळ । स्वधर्म केवळ साधे तया ॥३॥
स्वधर्म नाशीतो भवभय रोग । स्वधर्म तो योग अष्टांगादि ॥४॥
स्वधर्म तो भाव स्वधर्म तो देव । तुका ह्मणे शिव माथां वाहे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP