मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५४३१ ते ५४४०

बोधपर अभंग - ५४३१ ते ५४४०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५४३१॥
पाहिल्या विठ्ठल विरे सर्व चिंता । प्रेम वाढे चित्ता सुख होय ॥१॥
त्रितापाची धुनी होय तत्क्षणीं । मोक्ष ये धांवोनी भक्तांपाशीं ॥२॥
चंद्रभागे स्नान ऐकिल्या कीर्तन । ओस पडे स्थान यमपुरीं ॥३॥
त्रैलोक्याचे देव येती दरुशना । प्रसादाचा दाणा घ्यावयासी ॥४॥
दुर्लभ हे पाय विठ्ठलाचे सम । अरी भक्ता सम तुका ह्मणे ॥५॥

॥५४३२॥
सगुणाची प्रीति अत्यंत अर्जुना । विश्वरुपीं जाणा न बैसेचि ॥१॥
अष्टादश अध्याय पाजीलें अमृत । गीता हे अद्वैत किरीटीसी ॥२॥
बोधुनियां केला आत्मपदीं स्थिर । संग्रामा सत्वर सिद्ध केला ॥३॥
तुका ह्मणे देव करील तें होय । इतरांचे जाय वाहवत ॥४॥

॥५४३३॥
धन्य तयाची जननी । जया वश चक्रपाणी ॥१॥
धन्य तोचि त्र्यैलोक्यांत । झाला आपण अद्वैत ॥२॥
झाला शून्य भेदभाव । जनीं वनीं रमाधव ॥३॥
तुका ह्मणती देहाला । असो याची लज्जा तुला ॥४॥

॥५४३४॥
प्रती देहीं नाम भिन्न । ठेविताती अभिधान ॥१॥
देहीं देह काय आहे । ज्ञान बोध लोपलाहे ॥२॥
न विचारी कोणी कोणा । विसरले रामराणा ॥३॥
तुका ह्मणती देहाला । असो याची लज्जा तुला ॥४॥

॥५४३५॥
गेलें बाळपण खेळीं । खातां हिंडता सकळीं ॥१॥
तारुण्याचा भर गेला । विष विषय भोगिला ॥२॥
वृद्धपण अंगीं आलें । प्राणी हीन दीन झाले ॥३॥
शत वरुषांची माती । केली विण रघुपती ॥४॥
तुका ह्मणे नारायण । अंतरला तया जाण ॥५॥

॥५४३६॥
वृद्धपणीं माळ धरी । ज्ञान नाहीं तिळभरी ॥१॥
प्राप्त झाला तृषाकाळ । कूप खणीतो गयाळ ॥२॥
क्षुधा लागली गव्हारा । तेव्हां पेरीतो बाजरा ॥३॥
आधीं बुडविलें सर्व । अंतीं आलें यमपर्व ॥४॥
तुका ह्मणे माझा हरी । अभाग्यासी राहे दुरी ॥५॥

॥५४३७॥
गुरुविण पार होणे । न घडेचि मूढजनें ॥१॥
यज्ञ तप दान केलें । चार वेद अभ्यासिले ॥२॥
अधिकचि गुंता झाला । अहंकार विरुढला ॥३॥
भोग मोक्ष तया येती । अंतीं नेती अधोगती ॥४॥
तुका ह्मणे तया नरा । हरी न मिळे सोयरा ॥५॥

॥५४३८॥
केला सोयरा श्रीहरी । तया नाहीं जन्मफेरी ॥१॥
झाला निर्भय अंतरीं । गुरुदेवदास्य करी ॥२॥
आत्मज्ञान पाउनियां । रेत झाला हरिपायां ॥३॥
तुका ह्मणे जोडियेलें । तेणें धन जें आपुलें ॥४॥

॥५४३९॥
निजधन ठेवी भारी । न पुसती नरनारी ॥१॥
नारदादी वडिलांनीं । हांडा ठेविला गाडोनी ॥२॥
आहे हृदयमंदिरीं । न पाहती जाती दुरी ॥३॥
आहे ठाउकें जयाला गुरुकृपें तो धाला ॥४॥
तुका ह्मणे निवडती । थोडे फार फुललेती ॥५॥

॥५४४०॥
पूर्व दोष आड येती । हरीपायीं नाहीं प्रीति ॥१॥
बळें घालिती अघोरीं । संतगुरुनिंदा करी ॥२॥
दासीलागी वेंची धन । धर्म नाहीं मुष्टि अन्न ॥३॥
तुका ह्मणे निरुपायें । कर्म बळिवंत होय ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 04, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP