मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५०६१ ते ५०७०

बोधपर अभंग - ५०६१ ते ५०७०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५०६१॥
मणि पडिला दाढेसी मकरतोंडीं । सुखें हस्तें चि काढवेल प्रौढीं ॥१॥
परि मूर्खाचें चित्त बोधवेना । दुधें कूर्मीच्या पाळवेल सेना ॥२॥
सकळ पृथ्वी हिंडतां कदाचित । ससीसिंगाची प्राप्ति होय तेथें ॥३॥
अतिप्रयत्नें गाळितां वाळुवेतें । दिव्य तेलाची प्राप्त होय तेथें ॥४॥
अतिक्रोधें खवळला फणी पाहीं । धरुं येतो मस्तकीं पुष्पप्रायी ॥५॥
पहा ब्रह्मानंदे चि एकीं हेळा । महापातकी तो तुका मुक्त केला ॥६॥

॥५०६२॥
मृगाचिये अंगीं कस्तुरीचा वास । असे ज्याचा त्यास नसे ठावा ॥१॥
भाग्यवंत घेती वेचुनियां मोलें । भारवाही मेले वाहतां ओझें ॥२॥
चंद्रामृतें तृप्तिपारणें चकोरा । भ्रमरासी चारा सुगंधाचा ॥३॥
अधिकारीं येथें घेती हातवटी । परीक्षवंता दृष्टी रत्न जैसें ॥४॥
तुका ह्मणे काय अंधळिया हातीं । दिलें जैसें मोतीं वांयां जाय ॥५॥

॥५०६३॥
गेली वीरसरी । मग त्यासी रांड मारी ॥१॥
मग नये तैसी सत्ता । गेली मागील आणितां ॥२॥
भंगिलिया चित्ता न ये काशानें सांदितां ॥३॥
तुका ह्मणे धीर । भंगलिया पाठीं कीर ॥४॥

॥५०६४॥
जेणें घडे नारायणीं अंतराय । होत बाप माय वर्जावीं तीं ॥१॥
येर प्रिया पुत्र धना कोण लेखा । करिती तीं दु:खा पात्र शत्रु ॥२॥
प्रल्हादें जनक बिभीषणें बंधु । राज्य माता निंदु भरतें केली ॥३॥
तुका ह्मणे सर्व धर्म हरिचे पाय । आणीक उपाय दु:ख मूळ ॥४॥

॥५०६५॥
देवाचे म्हणोनि देवीं अनादर । हें मोठें आश्चर्य वाटतसे ॥१॥
आतां येरा जना म्हणावें तें कायी । जया भार डोयी संसाराचा ॥२॥
त्यजुनी संसार अभिमान सांटा । जुलुम हा मोटा दिसतसे ॥२॥
तुका ह्मणे अळस करुनियां साहे । बळें कैसे पाहें वांयां जाती ॥३॥

॥५०६६॥
आंधळ्यासि जन अवघेचि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाहीं ॥१॥
रोग्या विषतुल्य लागे हें मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाहीं ॥२॥
तुका ह्मणे शुद्ध नाहीं जो आपण । तया त्रिभुवन अवघें खोटें ॥३॥

॥५०६७॥
रडोनियां मान । कोण मागतां भूषण ॥१॥
देवें दिले तरी गोड । राहे रुचि आणि कोड ॥२॥
लावितां लावणी । विके भीके केज्या दानी ॥३॥
तुका ह्मणे धीरा । विण कैसा होतो हिरा ॥४॥

॥५०६८॥
पूज्य एकासनीं आसनीं आसन । बैसतां गमन मातेशीं तें ॥१॥
सांगतों ते धर्म नीतीचे संकेत । सावधान हित व्हावें तरी ॥२॥
संतां ठायाठाव पूजनाची इच्छा । जीवनीं च वळसा सांपडला ॥३॥
तुका म्हणे एकाएकीं वरासन । दुजें तेथें भिन्न अशोभ्य तें ॥४॥

॥५०६९॥
मायबापें जरी सर्पीण बोका । त्याचे संगें सुखा नपवे बाळ ॥१॥
चंदनाचा शूळ सोनियाची बेडी । सुख नेदी फोडी प्राण नाशी ॥२॥
तुका म्हणे नरकीं घाली अभिमान । जरी होय ज्ञान गर्व ताठा ॥३॥

॥५०७०॥
इनामाची भरली पेठ । वाहाती दाट मारग ॥१॥
अवघेची येती वाण । अवघे शकुन लाभाचे ॥२॥
अडचणी त्या केल्या दुरी । देण्या उरी घेण्याच्या ॥३॥
तुका ह्मणे जोडी झाली । ते आपुली आपणा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP