मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५०११ ते ५०२०

बोधपर अभंग - ५०११ ते ५०२०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५०११॥
लेखी दुखण्यासमान । वेचला नारायणीं क्षण ॥
उद्यांचें आजिच मरण । आणोनि ह्मणे हरि भोक्ता ॥१॥
नाहीं कांहीं पडों येत तुटी । जाणें तो आहे शेवटीं ॥
लाभ विचारोनी पोटीं । होई शेवटीं जागृत ॥२॥
आहे ते उरे कटा । लावुनि चळ आपुला फाटा ॥
पुरे हें न पुरे शेवटा । तरण्या बळकटा सदा वास ॥३॥
ह्मणोनि मोडावा कंटाळा । अविद्यात्मक कोंवळा ॥
होतील प्रबळा । आशा तृष्णा माया ॥४॥
क्षण या देहाचें अंतीं । जड होऊन राहेल माती ॥
परदेश ते परवर होती । चिळसविती नाकडोळे ॥५॥
जंव या नाहीं पातल्या विपत्ति । आयुष्य भविष्य आहे हातीं ॥
लाभ विचारोन गुंती । तुका ह्मणे अंतीं सर्व पिसुनें ॥६॥

॥५०१२॥
आजि नव्हे कालिच्या ऐसें । अनारिसें पालटे ॥१॥
आतां लागवेग करा । ज्याचें धरा टाके तें ॥२॥
नका सांगों वाउग्या गोष्टी । चाहुल खोटी ये ठायीं ॥३॥
तुका ह्मणे मोडा माग । आपल्या लागवरुनी ॥४॥

॥५०१३॥
खाणोरियांचीं पुसों घरें । जीं हीं बरीं पाळती ॥१॥
सांगती त्या जावें वाटा । धरुनी पोटामध्यें गोष्टी ॥२॥
आली गेली होती ठाया । सत्य छाया कळली ॥३॥
तुका ह्मणे आपुलें बळ । युक्ति काळ कारण ॥४॥

॥५०१४॥
विठ्ठल नावाडा फुकाचा । आळविल्या साटीं वाचा ॥१॥
कटीं कर जैसे तैसे । उभा राहिला न बैसे ॥२॥
न पाहे सिदोरी । जाती कुळ न विचारी ॥३॥
तुका ह्मणे भेटी । हाक देतां उठाउठीं ॥४॥

॥५०१५॥
कासवींचे बाळ वाढे कृपादृष्टी । दुधा नाहीं भेटी अंगसंग ॥१॥
नये दाखवीतां प्रेम बोलतां सांगतां । अनुभव चित्ता चित्त जाणे ॥२॥
पोटामध्यें कोणें सांगीतलें सर्पा । उपजत लपा ह्मणऊनी ॥३॥
तुका ह्मणे हें तों विचारावें मनीं । आणिक भल्यांनीं पुसूं नये ॥४॥

॥५०१६॥
सोवळा तो झाला । अंगीकार देवें केला ॥१॥
येर करिती भोजन । पोट पोसाया दुर्जन ॥२॥
चुकला हा भार । तयाचीच येरझार ॥३॥
तुका ह्मणे दास । झाला तया नाहीं नास ॥४॥

॥५०१७॥
शुद्ध चर्या हें चि संताचें पूजन । लागत चि धन नाहीं वित्त ॥१॥
सगुणाचे सोई सगुण विश्रांती । आपण चि येती चोजवीत ॥२॥
कीर्तनीं चि वोळे कृपेचा वोरस । दुरीपनें वास संनिधता ॥३॥
तुका ह्मणे वर्म सांगतों सवंगें । मन लावा लागें स्वहिताच्या ॥४॥

॥५०१८॥
करिती तया वेवसाव आहे । येथें व्हारे साहे एकां एक ॥१॥
गातां आइकतां समानचि घडे । लाभें लाभ जोडे विशेषता ॥२॥
प्रेमाचें भरतें भातें घ्यावें अंगीं । नटे टाळी रंगीं शुरत्वेंसी ॥३॥
तुका ह्मणे बहुजन्मांचें खंडण । होईल हा सीण निवारोनि ॥४॥

॥५०१९॥
घातला दुकान । पढीये तैसा आहे वान ॥१॥
आह्मी भांडारी देवाचे । द्यावें घ्यावें माप वाचे ॥२॥
उगवूं जाणों मोडी । झाली नव्हे त्याची जोडी ॥३॥
तुका ह्मणे पुडी । मोल तैसी खरी कुडी ॥४॥

॥५०२०॥
ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी । तरि कां हिंपुटी वेदशास्त्रें ॥१॥
शास्त्रांचें भांडण जप तीर्थाटण । उर्वीचें भ्रमण याचसाटीं ॥२॥
याचसाटीं जप याचसाटीं तप । व्यासें ही अमुप ग्रंथ केले ॥३॥
याचसाटीं संतपाय हे सेवावे । तरिच तरावें तुका ह्मणे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP