मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
४७५१ ते ४७६०

बोधपर अभंग - ४७५१ ते ४७६०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥४७५१॥
एकादशीव्रत सोमवार न करिती । कोण त्यांची गति होइल नेणों ॥१॥
काय करुं बहु वाटे तळमळ । आंधळीं सकळ बहिर्मुख ॥२॥
हरिहरां नाहीं बोटभरी वाती । कोण त्यांची गति होइल नेणों ॥३॥
तुका ह्मणे नाही नारायणीं प्रीति । कोण त्यांची गति होइल नेणों ॥४॥

॥४७५२॥
नव्हे आराणूक संवसारा हातीं । सर्वकाळ चित्तीं हाचि धंदा ॥१॥
देवधर्म सांदीं पडिला सकळ । विषयीं गोंधळ गाजतसे ॥२॥
रात्रि दीस नपुरे कटुंबाचे समाधान । दुर्लभ दर्शन ईश्वराचें ॥३॥
तुका ह्मणे आत्महत्यारे घातकी ॥ थोर होते चुकी नारायणीं ॥४॥

॥४७५३॥
स्मशान ते भूमि प्रेतरुप जन । सेवाभक्तिहीन ग्रामवासी ॥१॥
भरतील पोट श्वानाचिया परी । वस्ति दिली घरीं यमदुतां ॥२॥
अपूज्य लिंग तेथें अतित न घे थारा । ऐसी वस्ती चोरां कंटकांची ॥३॥
तुका म्हणे नाहीं ठावी स्थिति मती । यमाची निश्विती कुळवाडी ॥४॥

॥४७५४॥
भोगें घडे त्याग । त्यागें अंगा येती भोग ॥१॥
ऐसें उपराटें वर्म । धर्मा अंगी च अधर्म ॥२॥
देव अतरे तें पाप । खोटे उगवा संकल्प ॥३॥
तुका ह्मणे भिड खोटी । लाभ विचारावा पोटीं ॥४॥

॥४७५५॥
चोरें चोरातें करावा उपदेश । आपुला अभ्यास असेल तो ॥१॥
शिंदळीच्या मागें वेचितां पाउलें । होईल आपुलें तिच्या ऐसें ॥२॥
तुका ह्मणे भितों पुढिलिया दत्ता । ह्मणऊनी चिंता उपजली. ॥३॥

॥४७५६॥
दया तिचें नांव भूतांचें पाळण । अणीक निर्दळण कंटकांचें ॥१॥
पाप त्याचें नांव न विचारितां नीत । भलतेंचि उन्मत्त करी सदा ॥२॥
धर्म नीतीचा तो ऐकुनी वेव्हार । निवडिलें सार असार तें ॥३॥
तुका ह्मणे धर्म रक्षावयासाठीं । देवासही आटी जन्म घेणें ॥४॥

॥४७५७॥
थोडें परी निरें । अवीट तें घ्यावें खरें ॥१॥
घ्यावें जेणें नये तुटी । बीज वाढे बीजा पोटीं ॥२॥
चित्त ठेवी खाही । आणिकांशी चाड नाहीं ॥३॥
आपुलें तें हित फार । तुका ह्मणे खरें सार ॥४॥

॥४७५८॥
येथे नाहीं उरों आले अवतार । येर ते पामर जीव किती ॥१॥
विषयाचे झणी व्हाल लोलिंगत । चेवलिया अंत न लगे मज ॥२॥
वाहोनियां भार कुंथसील ओझें । नव्हे तेंचि माझें थीता त्याग ॥३॥
तुका ह्मणे कैसी नाही त्याची लाज । संतीं केशीराज सधियेला ॥४॥

॥४७५९॥
चालावा पंथ तो पाविजे त्या ठाया । ऐकिल्या वांयां वारता त्या ॥१॥
ऐका जी वोजे पडतसें पायां । भावाचि तें जायावाट नव्हे ॥२॥
व्याली कुमारीचा अनुभवें अनुभव । सांगतां तो भाव येत नाहीं ॥३॥
तुका ह्मणे येथें पाहिजे आरालें । बिंबीं निवळलें तरी भासे ॥४॥

॥४७६०॥
सदैव तुम्हां अवघें आहे । हातपाय चालाया ॥१॥
मुखीं वाणी कानीं कीर्ति । डोळें मूर्ती देखावा ॥२॥
अंध बहिर ठ्कलीं किती । मुकीं होती पांगुळें ॥३॥
घरास आग लावूनी जागा । न पळे तो गा वाचेना ॥४॥
तुका ह्मणे जागा हिता । कांही आतां आपुल्या ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP