मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५३७१ ते ५३८०

बोधपर अभंग - ५३७१ ते ५३८०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५३७१॥
पुत्र व्हावा ऐसा श्रावनासारिखा । मायबाप देखा नेत होता ॥१॥
नेत होता फुलें रोहिदास बाळ । डंकियेलें काळें करिल काय ॥२॥
न करी मर्यादा चिलयातो बाळ । भोजनाचें बळ मांडियलें ॥३॥
मांडिलें संकट रुक्मांगदापोटीं । स्वर्गी झाली दाटी विमानांची ॥४॥
तुका ह्मणे धन्य त्याचें पुत्रपण । वडिलांचें महिमान राखियेलें ॥५॥

॥५३७२॥
वारकरी जाणा कोणी । कुळें दोन्हीं उद्धरी ॥१॥
तयांसंगती मुढजन । होती पावन तात्काळ ॥२॥
मेरु सम पुण्यराशी । वस्ती ज्यासी राहिला ॥३॥
तुका ह्मणे नाम साचें । घ्या फुकाचें वाचेसी ॥४॥

॥५३७३॥
गुण ज्याचा जो अंतरीं । तोचि त्यासि पीडा करी ॥१॥
विंचू वागवी विखार । त्यासी पैंजाराचा मार ॥२॥
करी चोरी कर्म । खोडा पडे भोगी भ्रम ॥३॥
हर्षे चाहडी सांगे । ग्वाही देतां दंड मागे ॥४॥
परद्वार करी । दु:खभरें बोंबा मारी ॥५॥
तुका ह्मणे संता निंदी । पडे यमाचिये बंदीं ॥६॥

॥५३७४॥
दुर्बळासी दान देई तोचि दाता । समर्थासी भलता जवळी करी ॥१॥
गरीब नादान जरि आले शरण । शरणांगता मरण चिंतूं नये ॥२॥
परदेशीं उपवासी बैसे भलते ताटीं । धरुन मणगटीं उठवूं नये ॥३॥
तुका ह्मणे माझे पुरवी मनोरथ । देई सदोदित प्रेमकळा ॥४॥

॥५३७५॥
बरें नाणवट निक्षेपिलें जुनें । काढिलें ठेवणें समर्थाचें ॥१॥
मजुराच्या हातें मापाचा उकल । मी येथें फोल सत्ता त्याची ॥२॥
कुल्लाळाचे घरीं कुंभाच्या आकृती । पाठविल्या जाती पाकस्थला ॥३॥
तुका ह्मणे तेंचि जिवन नारायणें । प्रभा जातां किरणें प्रकाशलीं ॥४॥

॥५३७६॥
कोणी करो जपध्यान । कोणी साधो गोरांजन ॥१॥
नवजाऊं तया वाटा । नाचूं पंढरीचोहाटा ॥२॥
कोणी करो आत्मस्तुती । कोणा होत नित्य मुक्ती ॥३॥
तुका ह्मणे छंद । आह्मा हरिच्या दासां निंद्य ॥४॥

॥५३७७॥
शरीर विटाळाचें आळें । शरीर मायामोहपाश जाळें ॥
पतन शरीराच्या मुळें । शरीर काळें व्यापिलें ॥१॥
शरीर उपमे चांगलें । शरीर सुखाचे घोसुळें ॥
शरीर होय साध्य केलें । शरीर परब्रह्म ॥२॥
शरीर दु:खाचे आगर । शरीर रोगाचें भांडार ॥
शरीर दुर्गंधीची थार । शरीर नाहीं अपवित्र तुका म्हणे ॥३॥

॥५३७८॥
शरीरें सकळही सिद्ध । शरीर निधीचे ही निघ ॥
शरीरें तुटे भवबंध । वसे मध्यभागीं देव शरीर ॥१॥
शरीरा सुख नेंदावा भाग । नेंदावें दु:ख न करी भोग ।
नव्हे वोखटें ना चांग । तुका ह्मणे वेग हरीभजनीं ॥२॥

॥५३७९॥
चित्ताच्या संकोचें कांहींच न घडे । अतिशय वेडे चार तेचि ॥१॥
जिवींचें जाणावें या नांवें आवडी । हेंकड ते वोढी अमंगळ ॥२॥
काळाविण कांहीं नाहीं रुचों येत । करुन संकेत ठेवियेले ॥३॥
तुका ह्मणे कळे वचनें चांचणी । काय तें बोलुनी वेळोवेळां ॥४॥

॥५३८०॥
भक्तिविण देवा । कैच्या रुपें घडती सेवा ॥१॥
शोभविलें येरा । सोनें एकांग हीरा ॥२॥
देवाविण भक्ता । कोण देईल निष्कामता ॥३॥
तुका ह्मणे बाळा । माते श्रेष्ट जैसा झाला ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 04, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP