मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
४८८१ ते ४८९०

बोधपर अभंग - ४८८१ ते ४८९०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥४८८१॥
कायावाचामनें झाल विष्णुदास । काम क्रोध त्यास बाधीतना ॥१॥
विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता । सकळ भोगिता होय त्याचें ॥२॥
तुका ह्मणे चित्त करावें निर्मळ । येऊनि गोपाळ राहे तेथें ॥३॥

॥४८८२॥
चुकलिया ताळा । वाती घालूनि बैसें डोळा ॥१॥
तैसें जागें करी चित्ता । कांहीं आपुलिया हिता ॥२॥
निक्षेपिलें धन । तेथें गुंतलेसें मन ॥३॥
नासिवंतासाठीं । तुका ह्मणी करिसी आटी ॥४॥

॥४८८३॥
करुनि जतन । कोणा कामा आलें धन ॥१॥
ऐसें जाणतां जाणतां । कां रे होतोसी नेणता ॥२॥
प्रिया पुत्र बंधु । नाहीं तुज यांशीं संबुंधु ॥३॥
तुका ह्मणे एका । हरीविण नाहीं सखा ॥४॥

॥४८८४॥
आमची जोडी ते देवाचे चरण । करावें चिंतन विठोबाचें ॥१॥
लागेल तरी कोणी घ्यावें धरणीवरी । आमुपचि वरी आवडीच्या ॥२॥
उभारिला कर प्रसिद्ध या जग । करुं केला त्याग मागें पुढें ॥३॥
तुका ह्मणे होय दरिद्र विच्छिन्न । ऐसें देऊं दान एकवेळें ॥४॥

॥४८८५॥
ऐका गाये अवघे जन । शुद्ध मन तें हित ॥१॥
अवघा काळ नव्हे जरी । समयावरी जाणावें ॥२॥
नाहीं कोणी सवें येता । संचिता या वेगळा ॥३॥
बरवा अवकाश आहे । करा साहे इंद्रियें ॥४॥
कर्मभूमी ऐसा ठाव । वेवसाव जाणावा ॥५॥
तुका ह्मणे उत्तम जोडी । जातो घडी नरदेह ॥६॥

॥४८८६॥
भय हरिजनीं । कांहीं न धरावें मनीं ॥१॥
नारायण ऐसा सखा । काय जगाचा हा लेखा ॥२॥
चित्त वित्त हेवा । समर्पून रहा देवा ॥३॥
तुका ह्मणे मन । असों द्यावें समाधान ॥४॥

॥४८८७॥
कांरे माझीं पोंरें ह्मणसील ढोंरें । मायबाप खरें काय एक ॥१॥
कांरें गेलें ह्मणोनि करिसी तळमळ । मिथ्याचि कोल्हाळ मेलियाचा ॥२॥
कांरे माझें माझें ह्मणसील गोत । नो सांडविती दूत यमा हातीं ॥३॥
कांरे मी बळिया ह्मणविसी ऐसा । सरणापाशीं कैसा उचलविसी ॥४॥
तुका ह्मणे न धरीं भरंवसा कांहीं । वेगीं शरण जाई पांडुरंगा ॥५॥

॥४८८८॥
कां न वजावें बैसोनि कथे । ऐसें ऐकाहो श्रोते ॥ पांडुरंग तेथें । उभा असे तिष्टत॥१॥
ह्मणउनि करी धीर । लक्ष लावूनि सादर ॥ भवसिंधुपार । असेल ज्या तरणें ॥२॥
कथे कांहीं अणुमात्र । नो बोलावें हा वृत्तांत ॥ देवभक्तां चित्त । समरसीं खंडणा ॥३॥
कां वैष्णवा पुजावें । ऐका घेईल जो भावें ॥ चरण रजा शिवावें । वोडविला मस्तक ॥४॥
ऐसें जाणाहे निभ्रांत । देव वैष्णवांचा अंकित ॥ अलिप्त अतीत । परमीत त्यां साठीं ॥५॥
घालोनी लोळणी । तुका आला लोटांगणीं ॥ बंदी पायवणीं । संत चरणींचें माथां ॥६॥

॥४८८९॥
वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची । कीर्ती मानवाची सांगों नये ॥१॥
उदंडचि झाले जन्मोनियां मेले । होऊनियां गेले राव रंग ॥२॥
त्यांचें नाम कोणी नेघे चराचरीं । साही वेदचारी वर्णिताती ॥३॥
अक्षय अढळ चळेना ढळेना । तया नारायणा ध्यात जावें ॥४॥
तुका ह्मणे तुह्मी विठ्ठल चित्तीं ध्यातां । जन्ममरणव्यथा दूर होतीं ॥५॥

॥४८९०॥
नये वांटूं मन । कांहीं न देखावें भिन्न ॥१॥
पाय विठोबाचे चित्तीं । असों द्यावे दिवसराती ॥२॥
नये काकुळती । कोणा यावें हरिभक्ति ॥३॥
तुका ह्मणे साई । करील कृपेची विठाई ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 02, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP