मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५३२१ ते ५३३०

बोधपर अभंग - ५३२१ ते ५३३०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५३२१॥
काय खावयाची आस । ओस पडे स्वहितास ॥१॥
कोडें संसाराकडे । न पाहेचि मागें पुढें ॥२॥
सदां तळमळी रांडा । घाली जिवानांवा धोंडा ॥३॥
तुका ह्मणे बरें झालें । घे घे बाईल वहिलें ॥४॥

॥५३२२॥
शिकविली कळा ह्मणुनियां दावी । अर्थी दृष्टी लावी नेणे पुसों ॥१॥
दिसेभरी घोकी बहु केलें पाठ । अर्थाची त्या भेट नव्हे कधीं ॥२॥
त्या वाचे राम येऊं पाहे कैंचा । विश्रामाचें कैंचा धाम पावे ॥३॥
शिकलें तें वाचे पढो जाणे निकें । न कळे वैदिकें ज्ञान कैसें ॥४॥
तुका ह्मणे जैसा शिकविला पुंसा ॥ लागल्या अभ्यासा बोलूं जाणे ॥५॥

॥५३२३॥
धनालागीं करी नाना व्यवसाय । दु:खी जीव होय राणभरी ॥१॥
धनालागीं नीच सेवा सेवी निंद्य । वदती अवद्य वाणीयेसी ॥२॥
धनालागी सत्य सुकृतें वेंचिती ॥ प्रतिग्रह घेती पाप लागे ॥३॥
धनालागीं नाना आचार ते दान । कुळबुडवण होत असे ॥४॥
तुका ह्मणे ऐसी धनाची अपेक्षा । यमाची ते शिक्षा तयां माथां ॥५॥

॥५३२४॥
पुढिल्याचें दु:ख देखतसे डोळां । बळेंचि आंधळा होत आहे ॥१॥
न धरीच सोय मागील रहाटी । मनासवें कष्टी होत पुढें ॥२॥
गोरा वाडी जाय सुना धुंडी बिदी । सांगितली बुद्धी नायकेचि ॥३॥
बळें फाडी गांड घाली धसावरी । मग चुरमुरी दु:ख होतां ॥४॥
तुका ह्मणे ज्याची बुद्धी असे कुडी । हेत धडधडी शुद्ध कैची ॥५॥

॥५३२५॥
गोहो आला घरा । दु:खें विवळे ती पोरां ॥१॥
पोटीं शूळ मिळे पथ्या । वेडा पुसे काय व्यथा ॥२॥
धाडा तांदुळ साखर । दुध अनेक घागर ॥३॥
चवी कधीं नाहीं मुखा । वेळा मिळे तें भुका ॥४॥
गोडी नेदी कीं नारळ । हातें चोळी सोन केळ ॥५॥
भीडां आणुनी बांधला । तुका ह्मणे वेडा तिला ॥६॥

॥५३२६॥
पाषाण सुवर्ण भीमा जांबुनद । वंशाचा संबंध ब्रह्मयाच्या ॥१॥
सुवर्णाची पुरी समुद्राचा वेढा । समुदाय गाढा राक्षसांचा ॥२॥
चवदा चौकडया आयुष्यगणणा । बंधू बिभीषण कुंभकर्ण ॥३॥
ऐशीं सहस्त्र ज्या सुंदर कामिनी । मुख्य पट्टराणी मंदोदरी ॥४॥
पुत्रपौत्रांचा लेखा कोण करी । देवां आणि हारी इंद्रजित ॥५॥
लंकेमाजि घरें किती तीं आइका । सांगतसें संख्या जैसी तैसी ॥६॥
पांच लक्ष घरें पाषाणाचीं जेथें । सात लक्ष तेथें विटबंदी ॥७॥
कोटी घरें तेथें काशा ही तांब्याचीं । शुद्ध कांचनाचीं शत कोटी ॥८॥
तुका ह्मणे ज्याची संपदा एवढी । सांगातें कवडी नेली नाहीं ॥९॥

॥५३२७॥
पंडित ते जन करितील कथा । न मिळती अर्था निजसुखा ॥१॥
शिकविल्या बोला घालतील वाद । अनुभव भेद नाहीं कोणा ॥२॥
तुका ह्मणे देती लांचासाठीं ग्वाही । देखिली ती नाहीं वस्तु ठायीं ॥३॥

॥५३२८॥
पर्जन्य पडला नदी पूर आला । भुजंग वाहावला लोटभारें ॥१॥
खळाळीं पडला फार कष्टी झाला । मग तो बोलला काढी मज ॥२॥
राजहंस पक्ष्यें चंचुनें धरिला । बाहेर काढिला भुजंग तो ॥३॥
सावध होवोनी घातलें वेटाळें । तत्काळ भक्षिलें पक्षियातें ॥४॥
असंगाचा संग पक्षासी घडला । प्राणासी मुकला तुका ह्मणे ॥५॥

॥५३२९॥
कंटकाचे गांवीं साधूची वैरळी । सांपडली वृकां माजी ॥१॥
कंटकाचे गांवीं अवघीच हाव । नारायण नांव नेघे कोणी ॥२॥
मोतियांची गोणी माळव्या शेजारी । ह्मणती पांसेरी केवढयाची ॥३॥
तुका ह्मणे शाख कडू भोंपळयाची । केली नये रुची उपेगासी ॥४॥

॥५३३०॥
तेजियाचे गुण युद्धा आंत घ्यावे । तया उपमावें खर कैसें ॥१॥
काय सांगूं आतां सारिखी आकृती । आरबी न होती तटू ऐसे ॥२॥
चिंतामणी गळां नांवाचा तुरंग । नये गुण भाग गर्दभासी ॥३॥
तुका ह्मणे तैसे भले आणि खळ । ते कैसे केवळ सरी होय ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 04, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP