मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
४८५१ ते ४८६०

बोधपर अभंग - ४८५१ ते ४८६०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥४८५१॥
काल लवणकणिकेविण । एके क्षीण सागर ॥१॥
मां हे येवढी अडचण । नारायणीं मजविण ॥२॥
कुबेर अटाहास जोडी । काय कवडी कारणें ॥३॥
तुका ह्मणे काचमणि । कोण गणी भांडारी ॥४॥

॥४८५२॥
कौडीकौडीसाठीं फोडिताती शिर । काढुनि रुधिर मलंग ते ॥१॥
पांघरती चर्म लोहावी सांकळी । मारिती आरोळी धैर्यबळें ॥२॥
तुका ह्मणे त्यांचा नव्हेचि स्वधर्म । न कळेचि वर्म गोविंदाचें ॥३॥

॥४८५३॥
ज्याची जया आस । तयाजवळी त्या वास ॥१॥
येर जवळी तें दुरी । धेनु वत्स सांडी घरीं ॥२॥
गोडी प्रियापाशीं । मुख उपजे येरासीं ॥३॥
तुका ह्मणे बोल । घडे तयाठायीं मोल ॥४॥

॥४८५४॥
तरिच होय वेडी । नग्न होय धडफुडी ॥१॥
काय बोलाचें गौरव । आंत वरी दोन भाव ॥२॥
मृगजळा न्याहाळितां । तान न वजाये सेवितां ॥३॥
न पाहे आणिकाची आस । शूर बोलिजे तयास ॥४॥
तुका ह्मणे या लक्षणें । संत अळंकार लेणें ॥५॥

॥४८५५॥
जिंकावा संसार । येणें नांवें तरी शूर ॥१॥
येरें काय तीं बापुडीं । कीर अहंकाराची घोडी ॥२॥
पण ऐशा नांवें । देव धरिजेतो भावें ॥३॥
तुका ह्मणे ज्यावें । सत्य कीर्तीनें बरवें ॥४॥

॥४८५६॥
घरोघरीं अवघें झालें ब्रह्मज्ञान । परि मेळवण बहु माझी ॥१॥
निरे कोणापाशीं होय एक रज । तरि द्या रे मज दुर्बळासी ॥२॥
आशा तृष्णा माया कालवूनि दोन्ही । दंभ तो दूरोनि दिसतसे ॥३॥
काम क्रोध लोभ सिणवी बहुत । मेळवूनि आंत काळकूट ॥४॥
तुका ह्मणे तेथें कांहीं हातां नये । आयुष्य मोलें जाये वांयांविण ॥५॥

॥४८५७॥
भावें गावें गीत । शुद्ध करुनियां चित्त ॥१॥
तुज व्हावा आहे देव । तरि हा सुलभ उपाव ॥२॥
आणिकांचे कानीं । गुण दोष मना नाणीं ॥३॥
मस्तक ठेंगणा । करीं संतांच्या चरणा ॥४॥
वेचीं तें वचन । जेणें राहे समाधान ॥५॥
तुका ह्मणे फार । थोडा तरी पर उपकार ॥६॥

॥४८५८॥
वचन तें नाहीं तोडीत शरीरा । भेदत अंतरा वज्राऐसें ॥१॥
कांहीं न साहावे काशा ही कारणें । संदेह निधान देह बळी ॥२॥
नाहीं शब्द मुखीं लागत तिखट । नाहीं जड होत पोट तेणें ॥३॥
तुका ह्मणे जरी गिळे अहंकार । तरि वसे घर नारायण ॥४॥

॥४८५९॥
नव्हों आतां जीवीं कपटवसती । मग काकुळती कोणा यावें ॥१॥
सत्याचिये मापें गांठीं नये नाड । आदि अंत गोड नारायण ॥२॥
चोखटिया नाहीं विटाळाचा आघात । साच तें साचांत सांचा पडे ॥३॥
विचारिली वाट उसंत सीतल । बुद्धिपुढें बळ तॄणतुल्य ॥४॥
आहाराच्या घांसेम पचोनियां जीरे । वासना ही उरे उर्वरीत ॥५॥
तुका ह्मणे ताळा घालावा वचनीं । तूं माझी जननी पांडुरंगा ॥६॥

॥४८६०॥
वैष्णवमुनिविप्रांचा सन्मान । करावा आपण घेऊं नये ॥१॥
प्रभु झाला तरी संसाराचा दास । विहित तयास यांची सेवा ॥२॥
तुका ह्मणे हे आशीर्वाद बळी । जाईल तो छळी नरका यासीं ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : April 02, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP