मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५००१ ते ५०१०

बोधपर अभंग - ५००१ ते ५०१०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५००१॥
आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाहीं ऐसा मनीं अनुभवावा ॥१॥
आवडी आवडी कळिवरा कळिवरीं । वरिलीं अंतरी ताळी पडे ॥२॥
अपूर्व दर्शन मातेपुत्रा भेटी । रडूं मागे तुटी हर्षयोगें ॥३॥
तुका ह्मणे एकें कळतें दुसरें । बरियाचें बरें आहाचें आहाच ॥४॥

॥५००२॥
न मिळती एका एक । जये नगरीचे लोक ॥१॥
भलीं तेथें राहूं नये । क्षणें होईल नकळे काय ॥२॥
नकरितां अन्याय । बळें करीती अपाय ॥३॥
नाहीं पुराणाची प्रीति । ठायींठायीं पंचाइती ॥४॥
भल्या बुर्‍या मारी । होतां कोणी न निवारी ॥५॥
अविचार्‍या हातीं । देऊनि प्रजा नागविती ॥६॥
तुका ह्मणे दरी । सुखें सेवावी ते बरी ॥७॥

॥५००३॥
विषयांचे लोलिंगत । ते फजीत होतील ॥१॥
नसरे येथें यातिकुळ । शुद्ध मूळबीज व्हावें ॥२॥
शिखासूत्र सोंग वरी । दुराचारी दंड पावे ॥३॥
तुका म्हणे अभिमाना । नारायणा न सोसे ॥४॥

॥५००४॥
समर्थाचे सेवे बहु असे हित । विचार हृदयांत करुनी पाहें ॥१॥
वरकडाऐसा नव्हे हा समर्थ । क्षणेंचि घडित सृष्टी नासे ॥२॥
ज्याची कृपा होतां आपणा ऐसें करी । उरों नेदी उरी दारिद्राची ॥३॥
ऐशालागीं मन वोळगे अहर्निशीं । तेणें वंद्य होशी ब्रह्मादिकां ॥४॥
तुका ह्मणे हेंचि आहे पैं मुद्दल । सत्य माझा बोल हाचि माना ॥५॥

॥५००५॥
ढाल तरवारें गुंतले हे कर । ह्मणोनि झुंजार कैसा झुंजों ॥१॥
पेटी पडदळे सिले टोप ओझें । हे तों झालें दुजें मरणमूळ ॥२॥
बैसविलें मला येणें आश्वावरी । धांवू पळूं तरी कैसा आतां ॥३॥
आसोनि उपाय ह्मणे हे अपाय । ह्मणे हाय हाय करुं ॥४॥
तुका ह्मणे हा तो स्वये परब्रह्म । मुर्ख नेणे वर्म संतचरणें ॥५॥

॥५००६॥
किती सांगों तरी नाइकति बटकीचे । पुढें सिंदळीचे रडतील ॥१॥
नका नका करुं रांडेची संगती । नेवोनी अधोगती घालिल यम ॥२॥
तुका म्हणे जरी देवीं नाहीं चाड । हाणोनि थोबाड फोडिल यम ॥३॥

॥५००७॥
नरदेह वांया जाय । सेवीं सद्गुरुचे पाय ॥१॥
सांडोनियां अहंभाव । धरीं भक्ती पुजीं देव ॥२॥
थोराचिये वाटे । जातां भयशोक आटे ॥३॥
प्रल्हादातें तारी । तुका म्हणे तो कंठीं धरीं ॥४॥

॥५००८॥
हरिविण जिणें व्यर्थचि संसारीं । प्रेत अळंकारीं मिरवत ॥१॥
देवाविण शब्द व्यर्थचि कारण । भांड रंजवण सभेसिगा ॥२॥
आचार करणें देवाविण जोगा । सर्पाचिया अंगा मृदुपण ॥३॥
तुका ह्मणे काय बहु बोलों फार । भक्तीविण नर अभाग्य कीं ॥४॥

॥५००९॥
दो दिवसांचा पाहुणा चालतो उताणा । कां रे नारायणा न भजसी ॥१॥
तूं अखंड दुश्चित्ता तुज नेती अवचिता । मग पंडरिनाथा भजसी केव्हां ॥२॥
तुका ह्मणे ऐसे आहेत उदंड । तया केशव प्रचंड केवीं भेटे ॥३॥

॥५०१०॥
शिकवणेसाठीं वाटतें तळमळ । पुढें येईल काळ फोडों डोई ॥१॥
तेव्हां त्यासि काय देशील उत्तर । मेळउनी अंतर ठेवितोसि ॥२॥
येथींचिया सोंगें भोरपियाचे परि । होईल तें दुरि शृंगारिलें ॥३॥
तुका ह्मणे कां रे राखिलें खरकटें ॥ रागेल्याचे तंट रागेलें का ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP