मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५०९१ ते ५१००

बोधपर अभंग - ५०९१ ते ५१००

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५०९१॥
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपण चि देव होय गुरु ॥१॥
पढिये देहभावे पुरवितो वासना । अंतीं तें आपणापाशीं न्यावें ॥२॥
मागें पुढें उभा राहे सांभाळीत । आलीया आघात निवारावे ॥३॥
योगक्षेम त्याचें जाणे जडभारी । वाट दावी करीं धरुनियां ॥४॥
तुका ह्मणे नाहीं विश्वास ज्या मनीं । पाहावें पुराणीं विचारुनी ॥५॥

॥५०९२॥
उदंड शाहाणे होत तर्कवंत । परि या नेणवे अंत विठोबाचा ॥१॥
उदंडा अक्षरां करोत भरोवरी । परि ते नेणवे थोरी विठोबाची ॥२॥
तुका ह्मणे नाहीं भोळेपणाविण । जाणीव ते सिण रितें माप ॥३॥

॥५०९३॥
एका पुरुषा दोघी नारी । पाप वसे त्याचे घरीं ॥१॥
पाप नलगे धुंडावें । लागेल तेणें तेथें जावें ॥२॥
कांहीं दुसरा विचार । नलगे करावा चि फार ॥३॥
असत्य जे वाणी  तेथें पापाचीच खाणी ॥४॥
सत्य बोले मुखें । तेथें उचंबळती सुखें ॥५॥
तुका ह्मणे दोन्ही जवळीच लाभहानी ॥६॥

॥५०९४॥
गंगा न देखे विटाळ । तेंचि रांजणी ही जळ ॥१॥
अल्पमहदा नव्हे सरी । विटाळ तो भेद धरी ॥२॥
काय खंडिली भूमिका । वर्णा पायरिकां लोकां ॥३॥
तुका ह्मणे अगीविण । बीजें वेगळीं तों भिन्न ॥४॥

॥५०९५॥
जग तरि आह्मां देव । परि हे निंदितों स्वभाव ॥१॥
येतो हिताचा कळवळा । पडती हातीं म्हून काळा ॥२॥
नाहीं कोणी सखा । आह्मां निपराध पारिखा ॥३॥
उपक्रमें वदे । तुका वर्मासी तें भेदें ॥४॥

॥५०९६॥
समर्थाचें केलें । कोणां जाईल मोडिलें ॥१॥
वांयां करावी ते उरे । खटपट सोस पुरे ॥२॥
ठेविला जो ठेवा । आपुलाला तैसा खावा ॥३॥
ज्याचें त्याचे हातीं । भुंके तयाची फजिती ॥४॥
तुका ह्मणे कोटी । बाळे झाले शूळ पोटीं ॥५॥

॥५०९७॥
दुर्बळा वाणीच्या एक दोनि सिद्धि । सदैवा समाधि विश्वरुपीं ॥१॥
काय याचें वांयां गेले तें एक । सदा प्रेमसुख सर्वकाळ ॥२॥
तीर्थे देव दुरि तया भाग्यहीना । विश्व त्या सज्जना दुमदुमिलें ॥३॥
तुका ह्मणे एक वाहाती मोळिया । भाग्यें आगळिया घरा येती ॥४॥

॥५०९८॥
परिमळें काष्ट ताजवां तुलविलें । आणीक नांवांचीं थोडीं ॥
एक तीं कांतवें उभविलीं ढवळारें । एकाचिया कुड मेडी ॥
एक दिनरुप आणिती मोळिया । एक ते बांधोनि माडी ॥
अवघिय़ां बाजार एकचि झाला । मांविकलीं आपुल्या पाडीं ॥१॥
गुण तो सार रुपमध्यकार । अवगुण तो फार पीडीतसे ॥२॥
एक गुणें आगळे असती । अमोल्य नांवांचे खडे ॥
एक समर्थ दुर्बळा घरीं । फार मोलाचे थोडे ॥
एक झगझग करिती वाळवंटीं । कोणी न पाहती तयांकडे ॥
सभाग्य संपन्न आपुलाले घरीं । मायेक दैन्य बापुडें ॥३॥
एक नामें रुपें सारिख्या असती । अनेक प्रकार याती ॥
ज्याचिया संचितें जैसें आलें पुढें । तयाची तैसीच गति ॥
एक उंचपदीं बैसोनि सुखें । दास्य करवी एका हातीं ॥
तुका म्हणे कां मानिती सुख । चुकलिया वांयां खंती ॥४॥

॥५०९९॥
नाहीं कोणी दिस जात वायांविण । साध्य नाहीं सीण लटिकाचि ॥१॥
एकाचिये माथां असावें निमित्त । नसो नाहीं हित कपाळींतें ॥२॥
कांहीं एक तरी बोलायाचा जागा । नेदिती वाउगा उभा ठाकों ॥३॥
तुका ह्मणे वर्मे कळों येती कांहीं । ओळखी जे नाहीं होईल ते ॥४॥

॥५१००॥
कामातुरा भय लाज ना विचार । शरीर असार तृणतुल्य ॥१॥
नवल हे लीळा करित्याचें लाघव । प्रारब्धें भाव दाखविले ॥२॥
लोभालोभ एका धनाचिये ठायीं । आणिकांची सोई चाड नाहीं ॥३॥
तुका ह्मणे भूक न विचारी प्रकार । योजे तेंचि सार यथाकाळें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP