मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
४९३१ ते ४९४०

बोधपर अभंग - ४९३१ ते ४९४०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥४९३१॥
आतां तळमळ । केली पाहिजे सीतळ ॥१॥
करील तें पाहे देव । पायीं ठेवूनियां भाव ॥२॥
तोचि अन्नदाता । नाहीं आणिकांची सत्ता ॥३॥
तुका म्हणे दासा । नुपेक्षिल हा भरंवसा ॥४॥

॥४९३२॥
काय दिवस गेले अवघे चि वर्‍हाडें । तें आलें सांकडें कथेमाजी ॥१॥
क्षण एके ठायीं मन स्थिर नाहीं । अराणूक कइं होईल पुढें ॥२॥
कथेचे विरसें दोषा मूळ होय । तरण उपाय कैचा माती ॥३॥
काय तें सांचवूनि उरलें हें मागें । घटिका एक संगें काय गेलें ॥४॥
तेचि वाणी येथें करा उजळणी । काढावी मथूनि शब्दरत्नें ॥५॥
तुका म्हणे होंवि बोलावया चाड । उभयतां नाड हित असे ॥६॥

॥४९३३॥
न धरी प्रतिष्ठा कोणाची ही यम । ह्मणतां कां रे राम लाजा झणी ॥१॥
सांपडे हातींचे सोडवील काळा । तो कां वेळोवेळां नये वाचे ॥२॥
कोण लोक जो हा सुटला तो एक । गेले कुंभपाक रवरवांत ॥३॥
तुका ह्मणे हित तों ह्मणा विठ्ठल । न ह्मणे तो भोगील कळेल तें ॥४॥

॥४९३४॥
ह्मणवितां हरी न ह्मणे तयाल दरवडा पडिला देहामाजी ॥१॥
आयुष्यधन त्याचें नेलें यमदूतीं । भुलविला निश्चिंती कामरंगें ॥२॥
नावडे ती कथा देउळासी जातां । प्रियधनसुता लक्ष तेथें ॥३॥
कोण नेतो तयां घडिका दिवसा एका । कां रे ह्मणे तुका नागवसी ॥४॥

॥४९३५॥
कथे बैसोनि सादरें । सुखचर्चा परस्परें ॥
नवल काय तो उद्धरे । आणीक तरे सुगंधें ॥१॥
पुण्य घेई रे फुकाचें । पाप दुष्टवासनेचें ॥
पेरिल्या बीजाचें । फळ घेई शेवटीं ॥२॥
कथा विरस पाडी आळसें । छळणा करुनि मोडी रस ॥
उडवी आपणासरिसें । विटाळसें नावेसी ॥३॥
सज्जन चंदनाचे परी । दुर्जन देशत्यागें दूरी ॥
राहे ह्मणे हरी । विनंती करी तुका हे ॥४॥

॥४९३६॥
कोण येथें रिता गेला । जो जो आला या ठाया ॥१॥
तातडी ते काय आतां । ज्याची चिंता तयासी ॥२॥
नांवासाठीं नेघें भार । न लगे फार वित्पत्ति ॥३॥
तुका ह्मणे न लगे जावें । कोठें देवें सुचने ॥४॥

॥४९३७॥
शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं ॥१॥
मुखीं अमृताची वाणी । देह देवाचे कारणीं ॥२॥
सर्वागीं निर्मळ । चित्त जैसें गंगाजळ ॥३॥
तुका ह्मणे जाती । ताप दर्शनें विश्रांती ॥४॥

॥४९३८॥
शिळा जया देव । तैसा फळे त्याचा भाव ॥१॥
होय जतन तें गोड । अंतरा येती नाड ॥२॥
देव जोडे भावें । इच्छेचें तें प्रेम घ्यावें ॥३॥
तुका ह्मणे मोड दावी । तैशीं फळें आलीं व्हावीं ॥४॥

॥४९३९॥
सकळ चिंतामणी शरीर । जरी जाय अहंकार आशा समूळ ॥
निंदा हिंसा नाहीं कपट देहबुद्धि । निर्मळ स्फटिक जैसा ॥१॥
मोक्षाचें तीर्थ न लगे वाराणसी । येती तयापाशीं अवघीं जनें ॥
तीर्थासी तीर्थ झाला तोचि एक । मोक्ष तेणें दर्शनें ॥२॥
मन शुद्ध तया काच करिसी माळां । मंडित सकळा भूषणांसी ॥
हरिच्या गुणें गर्जताती सदा । आनंद तया मानसीं ॥३॥
तन मन धन दिलें पुरुषोत्तमा । आशा नाहीं कवणाची ॥
तुका ह्मने तो परिसाहुनि आगळा । काय महिमा वर्णू त्याची ॥४॥

॥४९४०॥
समुद्र हा पिता बंधु हा चंद्रमा । भगिनी ते रमा शंखाची या ॥१॥
मेहुणा जयाचा द्वारकेचा हरि । शंख दारोदारीं भीक मागे ॥२॥
दृष्ट हें जाणावें आपुलें स्वहित । तुका ह्मणे मात ऐसी आहे ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : April 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP