मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५२७१ ते ५२८०

बोधपर अभंग - ५२७१ ते ५२८०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५२७१॥
बाइलेमुळें होय भजनाचा घात । तिच्या हातीं हात गवसला ॥१॥
संसार मायेचा करावा तो कोणी । मावेची ते खाणी मूळ नारी ॥२॥
सर्व सांडोनिया हरीनाम गावें । तुका ह्मणे व्हावें जिवन्मुक्त ॥३॥

॥५२७२॥
ज्याचा जैसा ध्यास तैसें त्याचें मन । तयास पुराण काय होय ॥१॥
नपुंसकाचें तें ध्यान क्लीबपण । तयास पद्मीण काय करी ॥२॥
मायबाप व्याला पोर मुकें जाण । त्यासी वेदाध्ययन कैसें सांगे ॥३॥
तुका ह्मणे जरी गुरुकृपा वसे । तरीच हा बसे स्वस्थ ठायीं ॥४॥

॥५२७३॥
आइकाया वाटे ब्रह्मज्ञान गोड । परी अवघड एक दिसे ॥१॥
नाशिवंत देह ठेवी लपवून । मागे मग ज्ञान गुरुपाशीं ॥२॥
मनाचा तो मळ आधीं धुउनी घ्यावा । तीर्थप्रसाद ठेवा शेष कांहीं ॥३॥
तुका ह्मणे तुळसी निर्माल्य विठोबाचा । भक्षी तोचि साचा हरिदास ॥४॥

॥५२७४॥
उदार तरी देऊं गांडीची लंगोटी । कुटिलाच्या काठी नाकीं देऊं ॥१॥
भले तरी आह्मी जगासी दाखऊं । दुर्जनासी होऊं काळ तैसे ॥२॥
भल्याचिया आह्मी कुटुंबास तारुं । निंदकाचा संसारु पहावेना ॥३॥
तुका ह्मणे आह्मा दया येते कांहीं । ह्मणोनियां कांहीं बोलतसें ॥४॥

॥५२७५॥
ह्मणवितां भलें संताचा सेवक । आइल्याची भीक सुखरुप ॥१॥
ठसावतां बहु लागती प्रयास । चुकल्या घडे नाश अल्प वर्म ॥२॥
पाक सिद्धी लागे संचित आइतें । घडतां साइतें तेव्हां गोड ॥३॥
तुका ह्मणे बर्‍या सांगतांचि गोष्टी । रणभूमी दृष्टी न पडे तों ॥४॥

॥५२७६॥
आलें तेव्हां तेंचि राहिलें पिकोन । जरी तें जतन होय देंठी ॥१॥
नामेंचि सिद्धी नामेंचि सिद्धी । व्यभिचार बुद्धी न पावतां ॥२॥
चालिला पंथ तो पावला त्या ठाया । जरी आड तया कांहीं नये ॥३॥
तुका ह्मणे मध्यें पडती आघात । तेणें होय घात हाणी लाभ ॥४॥

॥५२७७॥
धन्य त्याची माता धन्य त्याचें कूळ । जया गोपाळ आवडे मनीं ॥१॥
धन्य त्याचा देश धन्य त्याचें गांव । तया पंढरीराव आवडे मनीं ॥२॥
धन्य ते भुमीका धन्य त्याचें घर । वैकुंठीची धूर सखां केला ॥३॥
तुका ह्मणे धन्य तयाची संगती । ज्या मेळीं श्रीपती खेळे सदां ॥४॥

॥५२७८॥
वृंदावन फळें घोळिली शर्करा । भितरील थारा न मोडेची ॥१॥
तैसे दुर्जनाचे न जाती दुर्गुण । स्वभाव कठीण ह्मणोनियां ॥२॥
पाषाण न विरे भिजतां सागरीं ॥ काग गंगातीरीं न्हाती काय ॥३॥
तुका ह्मणे केली कारळ्याची खीर । घालीतां साखर कडू वाटे ॥४॥

॥५२७९॥
सुवर्णाचें ताट खिरीनें वोगरिलें । भक्षावया दिलें गर्दभासी ॥१॥
वेदपारायण बधिरा सांगे ज्ञान । तयाची ते खूण काय सांगे ॥२॥
मुक्ताफळहार मर्कटांच्या गळां । कस्तुरी शूकरा चोजविली ॥३॥
तुका ह्मणे ज्याचें तोचि जाणे वर्म ।भक्तीचें महिमान साधु जाणे ॥४॥

॥५२८०॥
आधीं नरतनु जन्म ही ब्राह्मण । त्याही वरी जाण ब्रह्मज्ञानी ॥१॥
आधींच सोन्याचें वरी जडावाचें । लेणें श्रीमंताचें शोभिवंत ॥२॥
ऐसें जया घडे धन्य तोचि एक । वैकुंठनायक ह्मणति तया ॥३॥
तुका ह्मणे दैवें असती चोखट । तरीच घडती स्पष्ट चारी गोष्टी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 04, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP