TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५४२१ ते ५४३०

बोधपर अभंग - ५४२१ ते ५४३०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


बोधपर अभंग - ५४२१ ते ५४३०
॥५४२१॥
अनंताची लिला न कळे ह्मणोनी । लागले चरणीं ब्रह्मादिक ॥१॥
गाई गोप झाला स्वयें घननीळ । कळलें सकळ विधातिया ॥२॥
गर्वहत झाला शरण रिघाला । स्तवोनियां गेला निजस्थाना ॥३॥
तुका ह्मणे हरीहरांसी न कळे । अच्युताचे लिळे अगम्य ते ॥४॥

॥५४२२॥
कडु तो भोपळा वाराणशी गेला । काय तो मुकला कडुपणा ॥१॥
अंगीं लावितसे शेण आणि माती । काय तो श्रीपति त्यासी भेटे ॥२॥
वेदशास्त्र झाला जरी तो संपन्न । काय नारायण कृपा करी ॥३॥
तुका ह्मणे करी देहाचें सांडणें । तरीच नारायण त्यासी भेटे ॥४॥

॥५४२३॥
कागाचिये विष्टे जन्म त्या पिंपळा । पांडवांच्या कुळा पाहतां दोष ॥१॥
गायत्री स्वमुखें भक्षीं अमंगळ । मिळाल्या ओहळ वंद्य गंगा ॥२॥
वाल्मीक विश्वामित्र वसिष्ठ नारद । यांचे पूर्व शुद्ध काय होतें ॥३॥
नव्हतीं झालीं याचि कर्मे नरनारी । अनुतापें हरी स्मरतां मुक्त ॥४॥
शकुंतलासूत कर्ण शृंगी व्यास । त्यांचे नामें नाश पातकासी ॥५॥
तुका ह्मणे मूळ नाठवी श्रीहरी । कूळ जो विचारी नर्क त्यासी ॥६॥

॥५४२४॥
वारा गांव पाणी जाळी । समुद्रांत ज्वाळामाळी ॥१॥
राहे उदधिउदरीं । हरीआज्ञा पाळी शिरीं ॥२॥
नुलंघवे ते मर्यादा । सागरासी काळीं कदा ॥३॥
वाउगी हे पृथ्वी शिरीं । वागवीत निरंतरीं ॥४॥
तुका ह्मणे सर्व सत्ता । एक हरी जगत्राता ॥५॥

॥५४२५॥
चंद्र सूर्य फिरताती । वायुचक्रीं राहाटती ॥१॥
नाहीं आकाशा टेंगण । समीरासी कोठें स्थान ॥२॥
सर्वा चाळक श्रीहरी । जबरदस्त सत्ता शिरीं ॥३॥
तो हा विठ्ठल सांवळा । तुका ह्मणे विश्वडोळा ॥४॥

॥५४२६॥
डोळियांत डोळा कोण । न जाणती मूढ जन ॥१॥
वाचा वदविता कोण । चळे वळे कैसा प्राण ॥२॥
मन इंद्रियें सकळ । वर्तताती कोणे बळें ॥३॥
अन्नउदकपचन । केंवि होय तें क्षाळण ॥४॥
तुका ह्मणे हरीसत्ता । प्रतिपाळी सर्व भूतां ॥५॥

॥५४२७॥
आठवण नाठवण । होत हरीचे कृपेनें ॥१॥
जीव जंतु आचरती । तया कैंची आपमती ॥२॥
मुंगी आदि ब्रह्मादिक । सत्ता विठ्ठल चालक ॥३॥
तुका म्हणे सत्ता जाणे । तोचि नरनारायण ॥४॥

॥५४२८॥
वासुदेव सर्व जयासी प्रचीत । बाणली निश्चित गुरुकृपा ॥१॥
तया नाहीं कांहीं उरलें किंचित । जाहला अद्वैत आपणचि ॥२॥
न साहेचि बोल अनादित्व खोल । आत्मत्व पाहिल त्याचा तोचि ॥३॥
तुका ह्मणे ऐसा दुर्लभ महात्मा । चराचरी आत्मा स्वत: सिद्ध ॥४॥

॥५४२९॥
अमृताचे ताटीं बैसला भोजना । तक्राची वासना कैंची तया ॥१॥
ऐरावतावरी वहन जयाचें । तटू काबाडाचें नको तया ॥२॥
स्यमंतक मणी असे जया कंठीं । तया कांचवटी वाहवेना ॥३॥
तयेपरी जया आत्मलाभ झाला । असार तयाला वांती जैसी ॥४॥
तुका ह्मणे हरीकृपेचें हें फळ । लाधला प्रांजळ निजरुप ॥५॥

॥५४३०॥
ऐसी नको ते संपत्ती । जेणें पावे अधोगती ॥१॥
नको असुरीचा संग । अंतरेल पांडुरंग ॥२॥
दैवी संपत्ती असावी । गोडी ईश्वरीं लागावी ॥३॥
तुका ह्मणे साधुसंत । मज बहु आवडत ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2019-04-04T19:45:42.0030000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

incretory organ

  • (endocrine organ or gland) अंतःस्त्रावी इंद्रिय (ग्रंथि) 
RANDOM WORD

Did you know?

घराच्या दाराबाहेर शुभ-लाभ कां लिहीतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.