मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५४८१ ते ५४९०

बोधपर अभंग - ५४८१ ते ५४९०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५४८१॥
अन्न देणार श्रीहरी । प्रतिपाळ तोचि करी ॥१॥
जेणें अन्न उदक केलें । तेणें विश्व हें निर्मिलें ॥२॥
हरिला चुकती बापुडीं । अन्न अन्न करिती वेडीं ॥३॥
तुका ह्मणे एक । विठ्ठल ब्रह्मांडनायक ॥४॥

॥५४८२॥
मुक्त होता परी बळें झाला बद्ध । घेउनियां छंद माझें माझें ॥१॥
पाप पुण्य अंगीं घेतलें जडून । वर्म नेणे कोण करिता तो ॥२॥
तुका ह्मणे वांयां गेलें वायां विण । जैसा मृगशीण मृगजळीं ॥३॥

॥५४८३॥
ब्रह्मचारी तरी न ह्मणों नारदमुनी । गोपिका कामिनी इच्छितसे ॥१॥
ब्रह्मचारी तरी न ह्मणों मारुती । क्रोधें अंगीं शक्ति धडाडती ॥२॥
ब्रह्मचारी तरी न म्हणों भीष्म नरेंद्र । युद्ध वैराकार इच्छितसे ॥३॥
ब्रह्मचारी तरी न म्हणों शुक योगींद्र । कामें दिगांतर पळतसे ॥४॥
तुका म्हणे हें तो इंद्रियाचे जाती । ब्रह्मचारी मुर्ती वेगळ्याचि ॥५॥

॥५४८४॥
ब्रह्मचारी तरी पंडुसुतधर्म । सदा शुभ कर्म आचरतसे ॥१॥
ब्रह्मचारी तरी विदेही भूपाळ । पांच सतमाळ वनिता ज्याच्या ॥२॥
ब्रह्मचारी तरी वसिष्ठ जमदग्नि । रेणुका कामिनी अंगसंग ॥३॥
तुका म्हणे काम क्रोध मदमत्सर । ब्रह्मीं केले स्थिर तोचि योगे ॥४॥

॥५४८५॥
भागवताचा भाव सांगवेल आव । करणी स्वभाव नये नये ॥१॥
संतांची आकृति आणवेल युक्ति । काम क्रोध शांति नये नये ॥१॥
अवताराचें सोंग आणवेल जाण । क्रिया तत्समान नये नये ॥३॥
तुका म्हणे विठ्ठलकृपेवांचुनी । बोलाऐसी करणी नये नये ॥४॥

॥५४८६॥
देव एक पंढरीनाथ । अंतर भाव तो जाणे ॥१॥
रोगा ऐशा याव्या वल्ली । जाणे झाली बाधा ते ॥२॥
नेदी रुका वेंचूं मोल । पाहे बोल प्रीतीचे ॥३॥
तुका म्हणे दयावंता । सदा चिंता दिनाची ॥४॥

॥५४८७॥
वांयां आवतणें जेविल्या साच । काय विश्वासाचें तेंचि खरें ॥१॥
कोल्हाटिनी त्यागें आकाशीं खेळत । काय ते पावत मोक्षपद ॥२॥
जळ मंडण्याचे घोडे ते नाचती । काय तगवती युद्धालागीं ॥३॥
तुका म्हणे मतवादियाचें जिणें । दिसे लाजिरवाणें देखतांचि ॥४॥

॥५४८८॥
ज्यानें पेरिले धुतरे । त्याचे वांयां गेले सारे ॥१॥
ज्यानें पेरिला एरंड । तो कां रुसे कवण्या तोंडें ॥२॥
ज्यानें पेरियेला उंस । तोचि प्याला ब्रह्मरस ॥३॥
जैसें द्यावें तैसें घ्यावें । तुका म्हणे कां रुसावें ॥४॥

॥५४८९॥
आणिकां छळावया झालासी शहाणा । स्वहिता घातलें खाण ॥
अडके पैके करुनियां कृपणें सांचिलें धन । न जिरे क्षीर श्वाना भक्षितां याती तयाचा गुण ॥
तारुण्य दशे अधम पातला । दवडी हातपाय कान ॥१॥
काय झालें यास वांया कां ठकले हातीं सांपडलें टाकीतसे । घेऊनि स्फटिकमणी टाकी चिंतामणी नागवेल आपुले इच्छे ॥
सिद्धी सेविलें सेविती अधम पात्राच सारिखें फळ । शिंपला मोती जन्मलें स्वाती वरुशले सर्वत्र जळ ॥
कापुसपट नयेचि कारणा तयासी पातला काळ ॥
तेंचि भुजंगें धरियलें कंठीं विष झालें त्याचें गरळ ॥२॥
भक्षून मिष्टान्न घृतसाखरे सहित सोलून केळें । घालुनियां घसा अगोळिया हात वात करुं पाहे बळें ।
कुंथावयाची आवडी वोवा उन्हवनी रडवी बाळें । तुका म्हणे जे जैसे करिती ते पावती तैशींच फळें ॥३॥

॥५४९०॥
दिन दिन वाढे । आयुष्य नेणवतां गाढें ॥१॥
कैसीं भुललीं बापुडीं । मोहविषयाचे सांकडीं ॥२॥
विसरला मरण । त्याची नाहीं आठवण ॥३॥
देखत देखत पाही । तुका ह्मणे आठव नाहीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 04, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP