मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|उपदेश|
मनास उपदेश ७ ते १०

उपदेश - मनास उपदेश ७ ते १०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


७.
वासनेची करणी ऐकें तूं मना । या केली रचना ब्रह्मांडाची ॥१॥
निर्गुण चैतन्य सदा सुखरासी । त्या दिल्ही चौ-र्‍यांशीं लक्ष सोंगें ॥२॥
ऐसो हे लाघवी खेळे नाना खेळ । तेथें तूं दुर्बळ काय करिसी ॥३॥
क्षण एक चंचळ क्षण एक निश्चळ । क्षण एक विफळ सावध करी ॥४॥
क्षण एक कृपाळ क्षण एक निष्ठुर । क्षण एक उदार कृपण करी ॥५॥
क्षण एक सात्विक क्षण एक राजस । क्षण एक तामस करोनि सांडीं ॥६॥
क्षण एक प्रवृत्ति क्षण एक निवृत्ति । क्षण एक विश्रांति तप्त कर ॥७॥
क्षण एक आवडे क्षण एक नावडे । क्षण एक विघडे घडलें सुख ॥८॥
ऐसी हे लाघवी पा-हतां क्षणभंगुर । ब्रह्मादि हरिहर ठकिले जेणें ॥९॥
नामा म्हणे तरीच इचा  संग तुटे । दैवयोगें भेते संतसंग ॥१०॥

८.
वेदीं तोचि शास्त्रीं सर्वांठायीं तोचि । पुराणांत तोचि अंत:करणीं ॥१॥
नाम सदा ध्यायीं नाम सदा ध्यायीं । रामनाम ध्यायीं अरे मना ॥२॥
नामा म्हणे देह नाहीं पुनरुपें । केशवनाम सोपें उच्चारीं बापा ॥३॥

९.
धरींरे मना तूं विश्वास या नामीं । अखंड रामनामीं ओळखी धरीं ॥१॥
जप करीं अखंद खंडेना । निशिदिनीं मना होय जागा ॥२॥
नामा म्हणे मना होईं रामरूप । अखंडित जप सोहं सोहं ॥३॥

१०.
प्रेमामृत सरिता पवित्र हरिकथा । त्रिभुवनींच्या तीर्थां मुगुटमणि ॥१॥
तेथें माझ्या मना होईं क्षेत्रवासी । राहें संतांपाशीं सुख घेतां ॥२॥
ऐहिक्य परत्र दोन्हीं समतीरीं । परमानंदलहरी झेंपावत ॥३॥
मुक्तांचें जीवन मुमुक्षा माउली । शिणल्या साउली विषयासक्तीं ॥४॥
परमहंसकुळ सनकादिक सकळ । राहिले निश्चळ करोनि नित्त ॥५॥
नामा म्हणे मना सोइरे हरिजन । तारक त्याचें चरण दृढ घरीं ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP