मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|उपदेश|
वेषधार्‍यांस उपदेश ३६ ते ४०

उपदेश - वेषधार्‍यांस उपदेश ३६ ते ४०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


३६.
करीना साधन जिवासी बंधन । कोणे काळीं मन नोहे शुद्ध ॥१॥
करूं जातां तप अभिमानरूप । त्रिविधादि ताप कैसा निवे ॥२॥
नित्यानित्य करी विवेक आपण । तेणें अभि-मान वाढतसे ॥३॥
नामा ह्मणे जन्म विसरोनियां गेलों । मरोनि राहिलों देहातीत ॥४॥

३७.
शिकला गाणें राग आळवण । लोकां रंजवण करावया ॥१॥
भक्ताचें तें गाणें बोबडिया बोलीं । तें तें विठ्ठलीं अर्पियलीम ॥२॥
बोबडिया बोलीं जे कोणी हांसती । ते पचिजेती रौरवीं ॥३॥
नामा म्हणे बहुत बोलों आतां कांई । विठोबाचे पाय अंतरती ॥४॥

३८.
सुवर्ण आणि परिमळ । हिरा आणि कोमळ । योगी आणि निर्मळ । हें दुर्लभ जी दातारा ॥१॥
देव जरी बोलता । तरी कल्पतरु चालता । गज जरी दुभता । हें दुर्लभ जी दातारा ॥२॥
धनवंत आणि दयाळु । व्याघ्र आणि कृपाळु । अग्नि आणि सीतळु । हें दुर्लभ जी दातारा ॥३॥
सुंदर आणि पतिव्रता । साव-धान होय श्रोता । पुराणिक तरी ज्ञाता । हें दुर्लभ जी दातारा ॥४॥
क्षत्रिय आणि शूर भला । चंदन फुलीं फुलला । स्वरूपीं गुण व्यापिला । हे दुर्लभ जी दातारा ॥५॥
ऐसा संपूर्ण सर्व गुणीं । केवी पाविजे शारंगपाणी । विष्णुदास नामा करी विनवणी । मुक्ति चरणीं त्याचिया ॥६॥

३९.
शब्दामृत मांडे येती भोजना । अभ्यासी अज्ञाना तरी फळें ॥१॥
मुंगीचे थडके फुटे जों आकाश । ब्रह्मत्वेम सायास नये हातीं ॥२॥
मशका ओढी मेरू हाले बुडीं । जीवाचे ते जोडी ब्रह्म मिळे ॥३॥
उदकीं जरी मासोळी सूर्यासी भेटे । वारियाचे कोठें दृष्टि पडे ॥४॥
चंद्राचें चांदणें घेती जे पालवी । मिथ्या माया देवी नामा म्हणे ॥५॥

४०.
नामाचें लेखन श्वानाचिये कानीं । धांवतसे घाणी चर्माचिये ॥१॥
विंचू ह्मणतसे मी उदार दाता । उचित हें देतां नलगे वेळ ॥२॥
सूकर ह्मणे गृहस्थ भला । शेखीं तयाचा डोळा विष्ठेवरी ॥३॥
नापिक ह्मणे माझी । नांदणूक मोठी । धोकटिं मा-झारीं जन्म गेला ॥४॥
नामा ह्मणे माझी वासना हे खोती । विठ्ठल चरणीं मिठी पडली असे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP