मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|उपदेश|
मुमुक्षूंस उपदेश ५६ ते ६०

उपदेश - मुमुक्षूंस उपदेश ५६ ते ६०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


५६.
कळावंताच्या कळाकुसरी । त्या मी नेणें ना श्रीहरी ॥१॥
वारा धांवे भलत्या ठायां । तैसी माझी रंग छाया ॥२॥
प्रे-मभातें भरलें अंगीं । तेणें छंदें नाचें रंगीं ॥३॥
घातमात नेणें देवा । नामा विनवितो केशवा ॥४॥

५७.
भक्तिप्रतापें पावलों मी सुपंथ । सफळ निश्चित पर-मार्थ ॥१॥
देवा सर्वांभूतीं असतां प्रगट । निर्वाणीं चोखट भक्ति जाण ॥२॥
धरूनियां मनीं जपसील नाम । तेणें निजधाम पावसील ॥३॥
जप तप ध्यान न लंग साधन । भक्ति ते कारण नामा ह्मणे ॥४॥

५८.
माझिया मनें मज उपदेश केला । तो मज बिंबला ह्लदयकमळीं ॥१॥
निर्वाणींची एक सांगितली खून । कैवल्य चरण केशवाचे ॥२॥
वेदशास्त्र श्रुति आणीक पुराणें । पढोनि जाणणें हेंचि सत्य ॥३॥
क्रिय कर्म धर्म करणें ज्या कारणें । ते खूण निर्वाण चरण हेचि ॥४॥
जप तप अनुष्ठान करोनि साधन । प्रत्यक्ष निधान चरण हेचि ॥५॥
नामा ह्मणे मज कळलें अनुभवें । न विसंबें चरण जीवें तुझे ॥६॥

५९.
धरीं नांदतो बरवेपरी । म्हणूनि केलीसे अंतुरी । नित्य भांडण तया वरीं । आणिक कांहीं न देखों ॥१॥
दुसरी न करावी बाईल । भंड फजिती होईल । बोभाट वेसदारा जाईल । बायकाच्या पाणवथ्या ॥२॥
धाकटीकडे पाहतां कोडें । वडील धडधडा रडे । मेल्या तुझें गेलें मढें । तिकडे कांरे पहातोसी ॥३॥
वडील बाईल म्हणे उण्या । धाकटी बाईल केली सुण्या । लाज नाहीं तुझ्या जिण्या । काळतोंड्या बैसलासी ॥४॥
वडील बाईल धरी दाढी । धा-कटी ओढून धरी शेंडी । सांपडलासी यमझाडी । लाशीपरी पड-लाशी ॥५॥
सवती सबतीचा करकरा । उभा शिणलों दातारा । भेटी करी बनींच्या व्याघ्रा । परी संसारा उबगलों ॥६॥
सवती सबतीचा कैशी धरणी। कौतुक पहाती शेजारिणी । तया पुरुषाची विटंबनी । थोर जाचणी तयाशी ॥७॥
नामा ह्मणे गा श्रीहरी । दोघी बायका ज्याचे घरीं । त्याचे नसावें शेजारीं । थोर दु:ख तयाशी ॥८॥

६०.
संसार सागरींरे । माझें माहेर पंढरपुरीं ॥ विठोबा बाप माझा । माता रखुमाई सुंदरी ॥१॥
पुंडलिक भाऊ माझा । तोही नांदे बरव्यापरी ॥ सासुरें दुर्बळ भारी । मज मोकलिलें दुरी ॥२॥
सुख दु:ख कवणा सांगूं । माझें माहेर पंढरपुरीं ॥ध्रु०॥
भ्रतार निष्ठुर बो । काम क्रोध दोघे दीर ॥ आशा हे सासू माझी । ते मज गांजितसे थोर ॥३॥
तृष्णा हे नणंद सखी । तिनें व्यापियेले घरीं ॥ भक्ति हे माझी बहिणी । ते मज होईल निर्धारीं ॥४॥
वर्ष महिने दिवस घडिया । बाट पाहे अझुमी ॥ देहामाजी करिती देखा । न्यावया न पवे कोणी ॥५॥
गजेंद्र हरिश्चंद्र त्यासी । सोडावया आला । प्र-र्‍हाद अंबऋषि । तिहीं तुझा धांवा केला ॥६॥
उपमन्यु दूध मागतां । क्षीरसागरु दिल्हा ॥ गजेंद्र अजामेळ । त्यांच्या सत्वा तूं पावला ॥ नामया विष्णुदास गीतीं गोविंदु गाइला ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP