मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|उपदेश|
जनांस उपदेश १ ते ५

उपदेश - जनांस उपदेश १ ते ५

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१.
देवा धर्मीं नाहीं चाड । त्यासि पुढें आली नाड ॥१॥
जैसें डोंगरींचें झाड । त्याचें जन्म झालें । वाड ॥२॥
नामा म्हणे भक्ति गोड । स्वानंद नेणती ते मूढ ॥३॥

२.
पावावया ब्रह्मपूर्ण । सांडूनि देईं दोषगुण ॥१॥
सर्वांभूतीं समदृष्टि । हेचि भक्ति गोड मोठी ॥२॥
यावेगळें थोर नाहीं । बरवें शोधूनियां पाहीं ॥३॥
येणें संसार सुखाचा । ह्मणे नामा शिंपीयाचा ॥४॥

३.
ज्यालागीं जोडिसी ते न येती तुजसरसीं । यम कासाविसी करी तये वेळां ॥१॥
तूं तरी अज्ञान न देखसी डोळा । झालसि गोठोळा धनगरांसी ॥२॥
चिरीरी घेतो सांपडलिया हातीं । अवधी त्याची पळती टाकोनियां ॥३॥
संतीं न म्हणावें वचन निषुर । वेगीं ठाका द्बार केशवाचें ॥४॥
नामा म्हणे शरन रिघा हरि पायीं । तया शेषशायी न विसंबे ॥५॥

४.
विषयांचे कोड कां करिसी गोड । होईल तुज जोड इंद्रियबाधा ॥१॥
सर्व हें लटिकें जाणूनि तूं निकें । रामेंविण एके न सुटिजे ॥२॥
मायाजाळमोहो इद्रियांचा रोहो । परि न धरिसी भावो भजनपंथें ॥३॥
नामा ह्मणे देवा करी तूं लवलाहो । मयूरचा टाहो घन गर्जे ॥४॥

५.
लव निमिष म्हणतां आहे नाहीं पाहतां । क्षण एक संपादितां विषयो हा ॥१॥
स्वहित तें आचरा हित तें विचारा । नामीं भाव धरा जाणतेनो ॥२॥
संपत्तीचे बळें एक जहाले आंधळे । वेढिलें कळिकाळें स्मरण नाहीं ॥३॥
एक विद्यावंत जातीचा अभि-मान । ते नेले तमोगुणें रसातळां ॥४॥
मिथ्या मायामोह करूनि हव्यास । वेंचिलें आयुष्य वांयांविण ॥५॥
नामा म्हणे कृपा करूनि ऐशा जीवा । सोडवीं केशवा मायबापा ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP