मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|उपदेश|
संसारिकांस उपदेश १ ते २

उपदेश - संसारिकांस उपदेश १ ते २

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१.
जन्मा येऊनियां काय पुण्य केलें । बाळपण गेलें वांयांविण ॥१॥
संतसंगें सुख हुंडारलें जाणा । नामसंकीर्तना ओळखत ॥२॥
तरुणपणोंहि नाठवेचि देवा । वृद्धपणीं सेवा अंतरली ॥३॥
यापरी जन्मुनि गेलसिरे वांयां । पंढरीच्या राया नोळखतां ॥४॥
आलों मी संसारीं गुंतलों व्यापारीं । आझूनि कां श्रीहरि नोळखली ॥५॥
सहस्र अपराध जरी म्यांरे केले । तारिलें विठ्ठलें म्हणे नामा ॥६॥

२.
बाळपणीं वर्षे बारा । तीं तुझीं गेलीरें अवधारा । तैं तूं घांवसी सैरा । खेळाचेनि विनोदें ॥१॥
ह्मणवोनि आहेस नागर तरुणा । तवं वोळगे रामराणा । आलिया म्हातारपणां । मग तुज कैंचि आठवण ॥२॥
तुज भरलीं अठरा । मग तूं होसी निमासुरा । पहिले पंच-विसीच्या भरा । झणें गव्हारा भुललासी ॥३॥
आणिक भरलिया सात पांचा । मग होसी महिमेचा । गर्वें खिळेल तुझी वाचा । देवा ब्राह्मणांतें न भजसी ॥४॥
त्वचा मांस शिरा जाळी। बांधोनि हाडांची मोळी । लेखि-तोसि सदाकाळी । देहचि रत्न आहे माझें ॥५॥
बहु भ्रम या शिराचा रे । ह्मणे मी मी तारुण्याच्या भरें । ऐसा संशय मनाचा रे । तूं संडीं रे अज्ञाणा ॥६॥
माथवीय पडे मासोळी । ते म्हणे मी आहे प्रबळ जळीं । तैसी विषयाच्या पाल्हाळीं । भूललसिरे ग-व्हारा ॥७॥
तुज भरलिया सांठीं । मग तुझ्या हातीं येईल काठीं । मग ती अडोरे लागती । म्हणती बागुल आलारे ॥८॥
म्हणती थोररे म्हातारा । कानीं झालसि बहिरा । कैसें न ऐकसी परिकरा । नाम हरिहरांचें ॥९॥
दांतांची पाथीं उठी । मग चाववेना भाकर रोटी । नाक लागलें हनुवटी । नाम होटीं न उच्चारवे ॥१०॥
बैसोनि उंबरवटिया तळवटी । आया बाया सांगती गोष्टी । म्हणती म्हातारा बैल दृष्टी । कैसा अक्षयीं झाला गे ॥११॥
खोकलिया येतसे खंकारा । म्हणती रांडेचा म्हातारा । अझूनि न जाय मरण द्वारां । किती दिवस चालेल ॥१२॥
ऐसा जाणोनि अवसर । वोळगा वेगें सारंगधर । विष्णुदास नामया दातार । वर विठ्ठल पंढरीये ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP