मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य|
अध्याय १० वा

श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय १० वा

श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य


श्रीदत्तात्रेयाय नम: ॥
गुरु म्हने परमपवित्र । विष्णुदत्ताची गाथा विचित्र ।
जो दत्तभगवान् स्वतंत्र । होतो परतंत्र भावभुकेनें ॥१॥
अद्यापि यज्ञ ज्याला । तृप्ती न करिती तयाला ।
तृप्तीचा ढेंकर आला । श्राद्धान्न जेवितां हर्षानें ॥२॥
धन्य ती सुशीला सती । दत्ता जेवूं वाढी जी स्वहस्तीं ।
आग्रह करूनी निगुती । दीक्षिता गती न ये ही ॥३॥
धन्य तो विष्णुदत्त । ज्याचें परम शुद्ध चित्त ।
आराधोनियां श्रीदत्त । उद्धरिलें समस्त कुळ ज्याणें ॥४॥
धन्य तोही राक्षस । आपणासह विप्रास ।
उद्धरी ऐशा परम हितास । दावी तो खास परम गुरु ॥५॥
श्रीदत्तें विष्णुदत्तावर । अनुग्रह केला हा थोर ।
करावया परोपकार । दयेनें वर विद्या दिधल्या ॥६॥
ज्या ज्यावरी अनुग्रह करी । तो तरे या संसारीं ।
विष्णुदत्तासम उपकारी । ब्रह्मांडोदरी विरळ ॥७॥
ग्रहभूत डचकती । विष्णुदत्ता देव भीति ।
नुरवी लोकांची खंती । महामती दत्तवरें ॥८॥
आतां ऐक देवनाथा । पांचवी असे हे गाथा ।
कर्मविपाकाची कथा । मोक्षपंथा मिळेल ॥९॥
हरिशर्मा विप्र गोदावासी । एक पुत्र झाला त्यासी ।
अल्पवय असतां तयासी । मातापितयासी मृत्यु आला ॥१०॥
धनी होता म्हणून । तयाचें जाहलें लग्न ।
परि व्याधिग्रस्त दु:खमग्न । सदा उद्विग्न मन ज्याचें ॥११॥
उपजतांचि बरोबर गुल्मरोग । तेरावे वर्षीं क्षयरोग ।
अठरावे वर्षीं जलोदर रोग । सर्वांग निस्तेजस्क झालें ॥१२॥
एकुणीस वर्षें होतां अतिसार । कासश्वास बरोबर ।
पुढें झाला भगंदर । मग त्रिदोषें जोर केला ॥१३॥
करितां औषधदान । मृत्युंजयजप हवन ।
ग्रहदेवांचें अर्चन । करितां रोगांचें शमन न झालें ॥१४॥
त्याची भार्या सोला वर्षांची । ऐकूनि कीर्ति विष्णुदत्ताची ।
येऊनि पाउलें धरी त्याचीं । सौभाग्यदान द्या म्हणे ॥१५॥
माझा पती वीस वर्षांचा । त्याला गुल्मरोग जन्माचा ।
क्षयरोग आठ वर्षांचा । तीन वर्षांचा जलोदर ॥१६॥
एक वर्षाचा जीर्णज्वर । षण्मासांचा अतिसार ।
चौमासांचा भगंदर । त्रिदोष थोर वाढला आतां ॥१७॥
केले अनेक उपाय । तरी न झालें आरोग्य ।
मला द्यावें सौभाग्य । तुम्ही सभाग्य दत्तभक्त ॥१८॥
असी प्रार्थना ऐकून । तिचे सदनीं येऊन ।
तया विप्रा पाहून । बोले वचन विष्णुदत्त ॥१९॥
पूर्वपापें सर्व रोग होती । प्रायश्चित्तें पापें शमती ।
कर्मविपाकीं हे ख्याती । ऋशिसंमती अशीच असे ॥२०॥
ब्रह्मवधदोषें क्षय झाला । द्वादशाब्द प्रायश्चित कीजे तयाला ।
देवद्रोहें गुल्म झाला । षडब्द तयाला प्रायश्चित ॥२१॥
जलोदरा द्वादशाब्द । जीर्णज्वरा एकाब्द ।
भगंदरा एकाब्द । योजी अब्द अतिसारा ॥२२॥
पत्नीकरवीं विष्णुदत्त । करवी असें प्रायश्चित्त ।
ज्या ज्या रोगांचें जें जें प्रायश्चित्त । तें तें करितां तो तो रोग जाई ॥२३॥
त्रिदोषावरी रसायन । देतां त्याचें निरसन ।
जाहलें तेव्हां तो ब्राह्मण । बैसला उठोन सुखानें ॥२४॥
त्याचें हृदय स्पर्शोन । विष्णुदत्त मंत्र म्हणोन ।
तया देई आशीर्वचन । मनीं स्मरोनी श्रीदत्ता ॥२५॥
मग त्या द्विजा आरोग्य । आयुष्य प्रजा ऐश्वर्य ।
यश दिव्यगती वीर्य । मिळालें औदार्य विप्रवरें ॥२६॥
दत्तपदीं दृढ भक्ती । मिळाली उत्तम मुक्ती ।
निर्मळ जाहली मती । मंत्रशक्ती अशी हे ॥२७॥
विप्रस्त्री म्हणे विष्णुदत्ता । त्वां सौभाग्यदान दिलें आतां ।
यथेच्छ घेई वित्ता । विष्णुदत्त नको म्हणे ॥२८॥
तूं केवळ माझी कन्या । होसी निश्चयें विश्वमान्या ।
पतीसेवनें हो धन्या । तुम्हा अन्या गती नाहीं ॥२९॥
स्वप्नींही परपुरुषा न देखे ती । जाण ते उत्तम सती ।
बंधुसमान नरां देखे ती । मध्यम सती जाणावी ॥३०॥
परपुरुषा पाहुनी । उपजे काम जरी मनीं ।
राहे प्रयत्नें आवरूनी । कनिष्ठ सती ती जाण ॥३१॥
परपुरुषा भोगी नारी । ती जारिणी निर्धारी ।
ती विधवा होई जन्मांतरीं । पुन: पुन: निश्चित ॥३२॥
जी जारकर्म करी । ती कुलत्रय घाली रौरव घोरीं ।
स्वयेंही नरकीं कष्ट भारी । भोगी ती नारी दुर्भगा ॥३३॥
यास्तव साध्वी तूं आतां । धरीं पतीच्या चित्ता ।
स्वप्नींही न सोडीं सद्वृत्ता । मिळेल सुभगता अखंडित ॥३४॥
असा उपदेश करूनी । निस्पृह तो ये स्वभवनीं ।
विप्रा कर्मविपाक शास्त्रेंकरूनी । रोग जाऊनी ये सद्गती ॥३५॥
प्रायश्चित्तें रोगनाश । मग आरोग्य दे रस ।
तसा शास्त्रें होतां अविद्यानाश । प्रबोध ब्रह्मरस देतसे ॥३६॥
जरी फळाची लालुची । शास्त्रीं दाविली साची ।
ती मना वळवावयाची । युक्ती शास्त्राची जाणावी ॥३७॥
एक पुत्र बहु गोड खातां । रोगी झाला त्याची माता ।
त्या निंब पाजी तो तत्वता । न पिये माता तया बोले ॥३८॥
बाळा निंब जरी कडू । हा पितां तुला देईन लाडू ।
हें ऐकतां निंबरसाचा गडू । पिये तो लाडू मिळेल म्हणूनी ॥३९॥
हातीं लाडू देउनी । अपथ्य होईल म्हणूनी ।
युक्तीनें घे काढूनी । त्यापासूनी दयाळु माय ॥४०॥
लड्डूकासारिखें गौण फळ । आरोग्य हें मुख्य फळ ।
भवार्त हा जेवी रोगी बाळ । श्रुती कनवाळ मातेपरी ॥४१॥
शास्त्र नव्हे हें स्वर्गार्थ । नव्हे हें वशीकरणार्थ ।
नव्हे कामभोगार्थ । शत्रुघातार्थ नव्हे हें ॥४२॥
शस्त्र बुद्धिशुद्धी करी । युक्तीनें भ्रम निवारी ।
एतदर्थ अवधारी । साहावी गाता बरी असे ॥४३॥
सह्याद्रीचे उत्तरेस । विप्र एक करी वास ।
एके दिनीं मित्रानें त्यास । आपल्या गांवास पांचारिलें ॥४४॥
त्याची भार्या सुरूपा असे । तियेसी तो सांगतसे ।
मला मित्रानें पाचारिलें असे । एक मास रहावया ॥४५॥
त्वां सुखें राहावें घरीं । मी येईन मास लोटल्यावरी ।
तें ऐकूनियां नारी । पाथेय त्याकरीं देतसे ॥४६॥
तें घेऊनी तो निघाला । ती स्त्री स्नाना आली नदीला ।
मार्गी अश्वत्थीं झोटिंग बैसला । तेणें ती अबला देखिली ॥४७॥
ब्रह्मचारीदशेंत । जो मरे कामार्त ।
तो होय झोटिंग भूत । कामलंपट दुर्धर्श ॥४८॥
भूतवर्तमानज्ञान । भूतांला येतें स्पष्ट कळून ।
तिचा पती गेला हें जाणून । पतिसा होऊन ये घरीं ॥४९॥
त्याची भार्या पतिव्रता । नेणें तयाचिया कपटा ।
पती आला जाणूनि त्वरिता । हास्यवदनें पुढें आली ॥५०॥
तया आसन देऊण । पादप्रक्षालन करून ।
तें तीर्थ शिरसा वंदून । वायू घालूनी श्रम वारी ॥५१॥
मंद मंद वाक्यें बोले । त्वरित कां आगमन झालें ।
किंवा अपशकुन पाहूनी फिरविलें । काढिलेलें प्रस्थान माघारा ॥५२॥
किंवा माझ्या स्नेहामुळें । प्रवासीं मन न वळे ।
सतीचें मन विरहें वाळे । तुम्हां कळे हे यथार्थ ॥५३॥
मग तो कपटी काय बोले । ज्याकरितां मीं गमन केलें ।
ते मार्गीं जवळचि भेटले । त्यांणीं फिरविलें माघारां ॥५४॥
अशी ऐकूनी त्याची उक्ती । म्यां मागें फिरविली गती ।
पुन: जाऊं मासांती । व्यर्थ तुला वियोगार्ति कां द्यावी ॥५५॥
असें हें कपट्याचें वचन । तिणें सर्व ऐकून ।
तें यथार्थ मानून । करी तत्सेवन निष्कपटें ॥५६॥
अशी तीशी वश करून । तो झोटिंग दुर्जन ।
तीशीं रमे अनुदिन । पतीसमान होवोनी ॥५७॥
वय अवस्था रूप शीळ । शब्द वर्ण आकार सरळ ।
चाल चालणूक सकळ । दावी खळ पतीसमान ॥५८॥
रात्रौ करितां संग । तिचें चुरलें सर्वांग ।
परी त्याचा पुरा न हो भोग । ज्या नये भंग सुरतयुद्धीं ॥५९॥
त्याचें बळ दांडगेपण । भोगशक्ती दारुण ।
विकारही विलक्षण । जाणूनि शीण पावे नारी ॥६०॥
ती नारी खिन्न होउनी । विचार करी आपुले मनीं ।
भोग न देतां धर्महानी । देतां ग्लानी येतसे ॥६१॥
असें चिंतूनी हो दु:खित । त्याविषयीं संदेह वाटत ।
परी सांगावया लाजत । हा अनर्थ इतरांप्रती ॥६२॥
प्रत्यहीं सर्वरात्र तिला भोगितां । तया नये तृप्तता ।
तिये आली कृशता । तंव मास लोटतां पती आला ॥६३॥
तो द्वारीं पातला । तंव स्वसमान एक दारीं बैसला ।
तो त्याणें पाहिला । संदेह झाला तयासी ॥६४॥
विप्र म्हणे तूं कोण । माझें रूप घेऊन ।
माझे घरीं राहून । कापट्य करून साचा होशी ॥६५॥
झोटिंग बोले तया लागूनि । मी प्रख्यात घरधनी ।
तूं कोण आलासी कोठुनी । माझें रूप घेऊनी कपटिया ॥६६॥
तूं कपटी तूं कपटी म्हणती । असे परस्पर भांडती ।
तेथें ग्रामस्थ लोक येती । तेही भुलती तयां पाहतां ॥६७॥
दोनी दिसती समान । खरा खोटा निवडी कोण ।
त्यांचें भांडण दारुण । निवारील कोण कसें ॥६८॥
विप्र म्हणे सर्वांसी । घरांतूनी दवडा यासी ।
तो म्हणे दारांतून यासी । घालावा तुम्ही ग्रामलोक ॥६९॥
माझी नारी सुंदर । भोगीन म्हणतो हा पामर ।
करुनी आला रूपांतर । परी मी घर न सोडीन ॥७०॥
जरी करील हा बलात्कार । तरी मारीन मी ठार ।
हें ऐकूनी ते नर । कांहींच उत्तर न देती ॥७१॥
सासूसासरे विप्राचे । येऊनी पाहती रूप त्याचें ।
ते म्हणती विष्णुदत्ताचे । घरीं न्यावें या दोघां ॥७२॥
जेणें आराधिला दत्त । सर्वज्ञ तो विष्णुदत्त ।
सर्वांचें ओळखी चित्त । तो निश्चय करील ॥७३॥
मानलें हें वचन सर्वांस । सर्व म्हणती त्या दोघांस ।
घेऊनियां स्त्रियेस । विष्णुदत्ता भेटूं चला ॥७४॥
तेंही बरें म्हणून । स्त्रियेसी पुढें करून ।
तेही दोघे निघोन । विष्णुदत्ता येऊनी भेटले ॥७५॥
सर्व वर्तमान ऐकून । सत्कारें सर्वां बैसवून ।
झोटिंगालाही ओळखून । बोले वचन विष्णुदत्त ॥७६॥
अवस्था वय रूप शील । स्वर वर्ण आकार सकळ ।
नाम गोत्र आणि कुल । सांगा आपुलें दोघेही ॥७७॥
दोघेही एकच बोलत । तयां म्हणे विष्णुदत्त ।
यांत काय करावें निश्चित । आतां उपाय करितों मी ॥७८॥
जें करीन प्रमाणेंसी । तें मान्य होईल लोकांसी ।
क्षमा मागतों तुम्हासी । सभ्य म्हणती बहु बरें ॥७९॥
असें बोलूनी विप्रमस्तकीं । श्वेतमुद्रा तो रेखी ।
लाल मुद्रा भूत मस्तकीं । मंत्रें रेखी सुव्यक्त ॥८०॥
लोकां म्हणे मुद्रेवरून । चित्तीं धरा तुम्ही खूण ।
मंत्रित मुद्रा बदलून । न टाकवेल भूताला ॥८१॥
असें बोलूनी विष्णुदत्त । विप्रा बोलावूनी पुसे व्यक्त ।
भांडीं वस्त्रें धन घरांत । काय आहेत सर्व सांग ॥८२॥
स्त्रियेच्या गुप्त खुणा । सर्व सांग तूं ब्राह्मणा ।
ब्राह्मण  ह्मणे यथार्थ जाणा । न सांगवेल पात्रादिक ॥८३॥
स्त्रियेच्या बाह्य खुणा । ठाऊक असती आपणा ।
याहूनि गुप्त खुणा । नेणे म्हणे सभेंत ॥८४॥
भूत सांगे पात्र वस्त्र धन । पात्रांचेंही वजन ।
म्हणे घराच्या इटाही जाण । सांगेन जरी पुसाल ॥८५॥
बाह्यांतर खुणा स्त्रियेच्या । सांगतां मनीं सभ्यांच्या ।
शंका आली बोलती वाचा । हा न साचा यथार्थ ॥८६॥
विष्णुदत्त म्हणे तयांसी । ह्या पंचक्रोशी क्षेत्रासी ।
प्रदक्षिना करूनी आम्हापाशीं । पूर्वीं येईल त्यासी सत्य मानूं ॥८७॥
बरें म्हणोनी दोघे जाती । घटिकेनें पिशाच ये मागुती ।
म्हणे प्रदक्षिणा करूनी क्षेत्राप्रती । तुम्हांप्रती प्रथम आलों ॥८८॥
सभ्य पुसती खुणा तया । तो यथार्थ सांगे तयां ।
ते म्हणती हें तों मनुष्या । घटिकेमध्यें न घडेल ॥८९॥
तेव्हां वाटतो हा भूत । दोन प्रहरांनीं विप्र येत ।
कांहीं कांहीं खुणा सांगत । तें यथार्थ सभ्य म्हणती ॥९०॥
विष्णुदत्त म्हणे ह्या पर्वतीं । सिद्ध किती वसती ।
पुसोनी त्यांच्या नामगोत्राप्रती । पर्वता प्रदक्षिणा करावी ॥९१॥
प्रदक्षिना करून । जो भेटेल पूर्वीं येऊन ।
सत्यपणा त्यावरून । आम्हां कळोन येईल ॥९२॥
असें ऐकूनी वचन । दोघे जाती निघोन ।
लोटितां घटिका दोन । प्रदक्षिणा करूनी भूत आला ॥९३॥
यथास्थित सर्व सांगे । विप्र पांच प्रहरांनीं ये मागें ।
विष्णुदत्ताप्रती सांगे । न भेटले सिद्ध कोणी ॥९४॥
हें ऐकतां विप्राचा विश्वास । झाला सर्व सभासदांस ।
विष्णुदत्त म्हणे तयास । परीक्षा एक शेष राहिली ॥९५॥
असें म्हणूनी लोखंडाची झारी । विष्णुदत्त तयापुढें करी ।
म्हणे इच्या मुखानें जाऊनी अंतरीं । तोटीनें बाहेर निघावें ॥९६॥
असें म्हणूनी स्वांगरक्षा करी । भूत मुखानें प्रवेश करी ।
विष्णुदत्त मंत्र उच्चारी । आच्छादित करी दोनी तोंडें ॥९७॥
तोटी मुख बंद होतां । मार्ग न मिळे भूता ।
हें कृत्य पाहतां । सर्वांला आनंद झाला ॥९८॥
उचलतां जड झाली झारी । तो गाडिली पर्वतावरी ।
तो आनंद सर्वांतरी । न माये त्यावरी भक्त बोले ॥९९॥
येतांच ओळखिला भूत । एकाएकीं करितां निगृहीत ।
माझ्यावरी समस्त । दोष निश्चित ठेवितील ॥१००॥
म्हणोनी हा यत्न केला । सर्वांचा संशय फिटला ।
झोटिंगही बद्ध झाला । सोडविली अबला ब्राह्मणी ॥१०१॥
शास्त्रकर्में करून । अज्ञानाचें करिती निरसन ।
तेणें संशय जाऊन । आत्मज्ञान जेंवी होतें ॥१०२॥
तसा करितां हा उपाय । प्रथम झाला संशय ।
दुसरे वेळीं गेला संशय । झाला निश्चय तिसरे वेळीं ॥१०३॥
आतां कोणी शब्द न ठेविल । आतां भूतही न सुटेल ।
साध्वीलाही दोष न लागेल । माझा बोल निश्चित ॥१०४॥
ऐकूनी असें वचन । साधु साधू ह्मणोन ।
लोक जाती निघोन । सस्त्रीक ब्राह्मण वंदन करी ॥१०५॥
म्हणे माझें अरिष्ट घालविलें । झोटिंगाचें बंधन केलें ।
माझें गह्र मला दिधलें । यश गाजविलें हें जगीं ॥१०६॥
तुम्ही भगवद्भक्त समर्थ । तुम्हां मुळींच नाहीं स्वार्थ ।
तुमचें जिणें परार्थ । सार्थकता हीच तयाची ॥१०७॥
असें म्हणूनी दंपती वंदिती । निरोप घेऊनी घरीं जाती ।
गुरू म्हणे इंद्राप्रती । शास्त्रें जाती संशय ॥१०८॥
तंत्रशास्त्रें करून । होतां भ्रमनिरसन ।
सत्य कळलें हें तसेंचि जाण । ब्रम्हज्ञान होतसे ॥१०९॥
इति श्रीमत्परमहंसवासुदेवानंदसरस्वतीकृते श्रीदत्तमाहात्म्ये दशमोsध्याय: ॥१०॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 26, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP