मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य|
अध्याय १४ वा

श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय १४ वा

श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य


श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ।
अर्जुन नमन करूनी । म्हणे वाक्यर्थ ऐकूनी ।
आनंद झाला मनीं । आतां योग सांगावा ॥१॥
श्रीदत्त म्हणे रे अर्जुना । सावधान करी मना ।
अष्टांगयोगविचारणा । सांगतों मना स्थिरवी जी ॥२॥
यम नियम आसन । प्राणायम प्रत्याहार जाण ।
धारणा आणि ध्यान । समाधी जाण अष्टांगें हीं ॥३॥
यम नियम स्वाभाविक असती । म्हणोनी षडंग योग कोणी म्हणती ।
कोणी समाधी फळ मानिती । ते म्हणती सप्तांग योग ॥४॥
सविकल्प निर्विकल्प समाधी मानून । एक योगांग कल्पून ।
दुसरें फल मानून । अष्टांग योग म्हणती ते ॥५॥
प्राणिमात्राचें न करावें पीडन । हें अहिंसेचें लक्षण ।
बोलावें यथार्थ मृदु भाषण । हें सत्य जाण अर्जुना ॥६॥
तृणसुद्धां न चोरावें दुसर्‍याचें । हें लक्षण अस्तेयाचें ।
दु:ख जाणावें प्राण्यांचें । हें दयेचें लक्षण ॥७॥
न करावें मैथुन । हें ब्रह्मचर्यलक्षण ।
रहावें सरळपणा धरून । हें लक्षण आर्जवाचें ॥८॥
करावें दु:खादि सहन । क्षमेचें हें लक्षण ।
हानी होतांही निर्विकार होऊन । राहणें जाण धृती ती ॥९॥
दोन भाग भरून । जेवावें पथ्य अन्न ।
जलानें तिसरा भाग भरून । राहणें हा मिताहार ॥१०॥
करितां मलमूत्र विसर्जन । मृत्तिकाजळानें करावें शोधन ।
हें बाह्य शौच जाण । म्हणती ध्यान अंतर्शौच ॥११॥
हे होत दहा यम । आतां ऐका नियम ।
तेही दहा उत्तम । ऋषिस्तोम सांगतसे ॥१२॥
चांद्रायणादिकें देहशोषण । करणें तें तप जाण ।
दैवलाभास तोषोन । असणें तो संतोष ॥१३॥
वेदवाक्याचा विश्वास । आस्तिक्य म्हणती तयास ।
वेदांताचा जो अभ्यास । श्रवण खास म्हणती तें ॥१४॥
योग्यायोग्यसमर्पण । तया म्हणती दान ।
सर्व करावें विष्ण्वर्पंण । तेंचि पूजन निश्चित ॥१५॥
वेदोक्तकर्मीं जी प्रीती । तिला श्रद्धा म्हणती ।
कुकर्मीं लाजणें ती । र्‍ही म्हणती योग्यज्ञ ॥१६॥
जो एकादश्यादि उपवास । व्रत म्हणती तयास ।
गुरूपदिष्टमंत्राभ्यास । जप तयास म्हणिजे ॥१७॥
वाचिक जप अधम । उपांशु मध्यम ।
मानसिक उत्तम । वदे आगम त्रिविध जप ॥१८॥
हे दहा नियम । पतंजलीनें पांच यम ।
सांगितले पांच नियम । हे उत्तम असावे ॥१९॥
गोमनुष्यां मारितां हिंसा । इतरां मारितां न हिंसा ।
हे जात्यवच्छिन्ना हिंसा । ही महाव्रत न होय ॥२०॥
तीर्थावरी वर्जावी हिंसा । ही देशावच्छिन्न हिंसा ।
श्राद्धसमयीं न करणें हिंसा । ती हिंसा कालावच्छिन्न ॥२१॥
प्राणिमात्रासी न मारणें । सर्व देशीं हिंसा न करणें ।
सर्व काळीं हिंसा न करणें । तें जाणणें महाव्रत ॥२२॥
असे सर्व यमनियम । संपादावे ते उत्तम ।
यांही घडे परम धर्म । कर्मसाफल्य होईल ॥२३॥
अहिंसा सिद्ध झाली जयासी । तत्सन्निध राहतां जीवांसी ।
वैरभाव न उमटे मानसीं । जातीवैर्‍यासी मित्रत्व ये ॥२४॥
म्हणूनीं ऋषींच्या आश्रमांत । उंदीर मांजरासी खेळत ।
गाई व्याघ्र एकत्र होत । अहिंसा फळ असें असे ॥२५॥
सत्यानें मिळे मंत्रफळ । ब्रह्मचर्यें मिळे वळ ।
अस्तेयें मिळे धन विपुळ । कळे पूर्वफळ अपरिग्रहें ॥२६॥
बाह्यशौचें ये स्वदेहाचा वीट । अंतर्शौचें ये इंद्रियजय स्पष्ट ।
मनस्थैर्ये सौमनस्य नीट । आत्मदर्शनयोग्यता ये ॥२७॥
उत्तम सौख्य मिळे संतोषानें । देहेंद्रियशुद्धि हो तपानें ।
देवसान्निध्य हो जपानें । मिळे भक्तीनें समाधी ॥२८॥
आतां ऐक आसन । मांड्यांमध्यें पाय ठेवून ।
बसावें सरळ होऊन । स्वस्तिकासन होय हें ॥२९॥
डाव्या उजव्या कमरेखालून । उजवी डावी खोंट टेंकून ।
दोंहांतीं पाय धरून । बसतां गोपुखासन जाणावें ॥३०॥
डाव्या उजव्या मांड्यांवरी । उजवे डावे पाय करी ।
पृष्ठत: डाव्या उजव्या करीं । दृढ धरी हें पद्मासन ॥३१॥
उलट गुढगे गुदा लावून । ढोंपरावरी बोटें पसरून ।
मुख पसरूनी नासाग्र पाहून । बसतां सिंहासन होतसे ॥३२॥
अंडाखालीं डावा पाय । लिंगावरी उजवा पाय ।
ठेवी सरळ करी काय । ठेवी हृदयप्रदेशी हनु ॥३३॥
नासाग्र दृष्टी ठेवून । बैसता होय सिद्धासन ।
बंधत्रय साधून । समाधी लावून देईल हें ॥३४॥
हात टेकूनी भूमीवरी । नाभी ठेवावी कोंपरावरी ।
अंतराळीं दंडापरी । राहतां मयूरासन होय ॥३५॥
दोनी पाय हातीं जोडूनी । शिवणीला खोटा लावूनी ।
बसावें नासाग्रनयनीं । म्हणती मुनी भद्रासन हें ॥३६॥
शववत् पडणें होतां श्रम । शवासन त्याचें नाम ।
चिरकाळ बसतां न व्हावा श्रम । ही उत्तम आसनसिद्धि ॥३७॥
जेथें उपद्रव नसे । शब्दही ऐकूं न येतसे ।
एकांतीं पवित्रस्थळ असे । सुख होतसे ज्या ठायीं ॥३८॥
तेथें मठ कीजे सुंदर । असावें लहान द्वार ।
आंत नसावें छिद्र । सारवूनी पवित्र करावें ॥३९॥
चार हातपर्यंत । पाषाण अग्नी जळवर्जित ।
करूनी बसावें निश्चिंत । गुरुआदिकां वंदूनी ॥४०॥
खालीं दर्भ वरी कृष्णाजिन । त्यावरी मृदुवस्त्र घालून ।
त्यावरी करावें उपवेशन । आसनविधी करूनी ॥४१॥
शरीर गळा मान । यांना सरळ करून ।
इकडे तिकडे न पाहून । नासाग्रदर्शन बसावें ॥४२॥
सर्व चिंता सोडूनी । मनीं धैर्य धरूनी ।
दृढानिश्चय करूनी । प्राणायामा करावें ॥४३॥
जंव चाले प्राण । तंव चपळ होय मन ।
चपळ होतां मन । चाले प्राण निश्चयें ॥४४॥
म्हणोनियां दोहोंतून । घ्यावें एकाला जिंकून ।
दोहोंचाही जय होऊन । समाधिसाधन होतसे ॥४५॥
प्राणायामीं दृढाभ्यास । करावा ठेवूनी विश्वास ।
असें जिंकावें प्राणास । मग श्वासोच्छ्वास बंद होती ॥४६॥
होतां प्राणांचा जय । मनाचाही होई जय ।
दोहोंचाही एकत्र विलय । असें निश्चयें जाणावें ॥४७॥
नवद्वारें रोधितां । प्राणजय ये हातां ।
परी न जिंकवें चित्ता । दृढ विरक्तता नसतां ॥४८॥
मन असे चपळ । इंद्रियां क्षोभवी तत्काळ ।
तें दृढ असूनी सबळ । श्रम केवळ तज्जयीं ॥४९॥
म्हणूनी प्राणायामादि करून । जिंकावें चपळही मन ।
कित्येक देवाचें ध्यान करून । सुखें मन वश करिती ॥५०॥
डाव्या नासापुटांत । इडा येऊन संपत ।
तिचें चंद्र दैवत । शुभकार्य साधून दे ती ॥५१॥
उजव्या नासापुटांत । पिंगला येऊन संपत ।
तियेचें सूर्य दैवत । उग्रकार्य साधून दे ती ॥५२॥
दोंमध्यें सुषुम्ना असे । ती ब्रह्मरंध्रीं संपतसे ।
तिचे मुळीं कुंडली वसे । साडेतीन वेंटाळ्या देऊनी ॥५३॥
मुखानें सुषुम्ना मुख धरी । म्हणूनी तिच्या अंतरीं ।
प्राण प्रवेश न करी । यास्तव तिला चाळवावी ॥५४॥
ती चळे करितां अभ्यास । तो न करावा दिवसास ।
रात्रींही अभ्यास । शास्त्रें वर्ज्य असे ॥५५॥
हें तों असे कूट । याचा अर्थ ऐक स्पष्ट ।
चंद्र चालतां रात्र स्फुट । सूर्य चालतां दिवस हो ॥५६॥
डावा अपान उजवा प्राण । यांसीं करावें समान ।
तीच सुषुम्ना जाण । रात्रदिन भोक्त्री ॥५७॥
सोळा मात्रांनीं पूरक । चौसष्टांनीं कुंभक ।
बत्तीसांनीं रेचक । हा प्राणायाम उत्तम ॥५८॥
इडेनें पूरक करावा । कंठीं जालंधर बांधावा ।
जोरानें कुंभक रोधावा । रेचक करावा पिंगलेनें ॥५९॥
बांधोनियां उड्डियान । करावें हळु हळु रेचन ।
पुन: पिंगलेनें घेऊन । पूर्ववत् करोन सोडावा ॥६०॥
जिणें प्राण प्यावा । तिणें तो न सोडावा ।
असा अभ्यास करावा । पुन: पुन: त्रिकाळ ॥६१॥
किंवा श्वास बाहेर सोडावा । हा पूरक जाणावा ।
तसाचि तो थांबवावा । तो जाणावा कुंभक ॥६२॥
मग आंत हळू घ्यावा । हा रेचक जाणावा ।
असा अभ्यास करावा । केवळ कुंभकपर्यंत ॥६३॥
जसी मात्रावृद्धी होय । हो तसा प्राणजय ।
चिताचें होय स्थैर्य । नाडीद्वार शुद्ध होतां ॥६४॥
कफ वात आणि पित्त । हे दोष होतां शांत ।
हो योगी रोगरहित । अग्नी प्रदीप्त होय त्याचा ॥६५॥
कनिष्ठ प्राणायाम होतां । घर्म सुटे विशेषता ।
मध्यम प्राणायाम होतां । सुटे कंप सर्वांगीं ॥६६॥
उत्तम प्राणायामें जाण । ब्रह्मरंध्रीं जाई प्राण ।
श्वासोच्छ्वास बंद होऊन । निश्चळत्व ये सर्वथा ॥६७॥
जंव इंद्रियशुद्धे न झाली । कुंडली ती न हालली ।
सुषुम्णेमध्ये न झाली । प्राणाची गती जंववरी ॥६८॥
तंववरी वृथा प्रयास । केवळ पाविजे त्रास ।
मध्यमार्ग मिळतां प्राणास । आयास सफळ जाणावें ॥६९॥
मेदश्लेष्मा अधिक असतां । षट्क्रिया अभ्यसाव्या तत्वतां ।
किंवा विशेष प्राणायाम करितां । नाडीशुद्धता होतसे ॥७०॥
जे जपध्यानरहित । ते निर्बीज प्राणायाम होत ।
जे जपध्यान सहित । ते होत सबीज प्राणायाम ॥७१॥
हा सबीज प्राणायाम । योगी मानिती उत्तम  ।
शीघ्र मिळे ब्रम्हरंध्रधाम । सबीज प्राणायाम करितां ॥७२॥
पांच पांच रोज चढवीत । चढवावे ऐशींपर्यंत ।
एवं त्रिकाळीं सतत । तीन मास अभ्यास करावा ॥७३॥
मग सुषुम्णापंथा । शुद्ध होय सर्वथा ।
मग कुंडली चाळवितां । प्राण वरती जातसे ॥७४॥
होतां कुंडलीचें चालन । षट्चक्रें जाती भेदून ।
ब्रम्हविष्णुशिवग्रंथी तुटून । सरळ मार्ग होतसे ॥७५॥
नाभिदेशीं अग्नी जाण । तेथें तर्जनी टेंकून ।
अग्नीचेम करावें आकुंचन । दररोज तीन वेळां ॥७६॥
हातीं पाय धरून । करावें कंदाचें ताडण ।
आठ वेळ भस्त्रिका करून । निर्विकल्प मन करावें ॥७७॥
लय विक्षेप सोडून । रूपीं मन जोडून ।
राहतां वर चढे प्राण । मनाचें उन्मन होय मग ॥७८॥
दोन पळें पांच विपळें जाण । ब्रह्मांडी ठरतां प्राण ।
प्राणायाम तो मुख्य जाण । पापशमन करी तो ॥७९॥
बारापट प्राणायामकाळ । प्रत्याहार तितुका वेळ ।
बारापट उत्तरोत्तर काळ । धारणादिकांचा वेळ होय ॥८०॥
ब्रह्मरंध्रीं बारा दिन । राह्तां निश्चळ प्राण ।
निर्विकल्प समाधी जाण । यत्नें साधोन घ्यावा हा ॥८१॥
अथवा प्राण जिंकून । इंद्रियें विषयांपासून ।
मनानें घ्यावीं फिरवून । हा जाण प्रत्याहार ॥८२॥
सोडूनियां आळस । पुन: पुन: हा अभ्यास ।
करितां प्रत्याहार होई खास । मग त्रास न होय ॥८३॥
कूर्म जसा आपुलीं अंगें । आयास न होतां वेगें ।
आंत बाहेर आपुलीं अंगें । वागवी वश करूनी ॥८४॥
योगियानें तयापरी । इंद्रियें धरावीं अंतरीं ।
जरी कां जाती बाहेरी । पुन: अंतरीं ठेवावीं ॥८५॥
जया इंद्रियें वश झालीं । त्याची प्रज्ञा स्थिरावली ।
विषयेच्छा दूरावली । सिद्धी आली त्याचे करीं ॥८६॥
असा हा प्रत्याहार । जो करी तो योगीश्वर ।
विषय असतांही समोर । होती दूर तयातें ॥८७॥
जरी जिंकिलें मन । एकही इंद्रिय सुटोन ।
जाई बाहेर पळोन । तेंची मन:क्षोभ करी ॥८८॥
म्हणूनियां सादर । करावा हा प्रत्याहार ।
मग मनाचा जय सुखकर । न लागे उशीर थोडाही ॥८९॥
मग करावी धारणा । स्थिर करी अंत:करणा ।
सगुनागुणलक्षणा । द्विविध धारणा म्हणती ती ॥९०॥
आत्मरूपी अभ्यसानें । मन ठेवावें धारणेनें ।
जरी न ठरे विक्षेपानें । यत्नानें तें फिरवावें ॥९१॥
जरी न ठरे निर्गुणीं । तरी ठरवावें सगुणीं ।
पुन: पुन: यत्न करूनी । लक्ष्यावरी स्थिरवावें ॥९२॥
अर्जुना मी निर्गुण । असूनी हें सगुण ।
रूप धरिलें सुलक्षण । भक्तत्राण करावया ॥९३॥
तें हें माझें गोचर । रूप असे सुंदर ।
एक एक अवयव मनोहर । पाहतां नेत्र तृप्त होती ॥९४॥
या रूपींच पुन: पुन: । करावी स्थिर धारणा ।
येथें निश्चळ करितां मना । निर्गुणीं धारणा सहज होय ॥९५॥
मन पळतां वरचेवरी । अंतरीं खेद न करी ।
अभ्यसानें पुन: धरी । जोंवरी स्थिर होय ॥९६॥
धारणा न साधे ज्यास । ते श्रम केवळ त्यास ।
मग सोडूनी आळस । धारणाभ्यास करावा ॥९७॥
पूर्वीं ध्यान मग धारणा । ही होय दुर्विचारणा ।
म्हणती उपसमाधी ध्याना । ध्यानविस्मृती समाधी ॥९८॥
अशी धारणा साधून । मग करावें ध्यान ।
तेंही एक सगुण । एक निर्गुण पूर्ववत् ॥९९॥
तैलधारा अखंड जशी । ध्यानीं चित्तवृत्ती धरावी तसी ।
विच्छेद न यावा तियेसी । महाप्रयासीं सर्वथा ॥१००॥
ध्याता ध्यान आणि ध्येय । ही त्रिपुटी जोंवरी होय ।
ध्यानाचें हें लक्षण होय । योगीवर्य बोलताती ॥१०१॥
जेव्हां अभ्यासें ठरे । मी ध्याता हें विसरे ।
ध्यानालाही न स्मरे । ध्येयाकारें राही मन ॥१०२॥
जेथें वायू मुळीं नसे । तेथें दिवा जसा असे ।
तसें मन जेव्हां वसे । समाधी होतसे तेधवां ॥१०३॥
उडे सर्वथा देहभान । नसे बाह्याभ्यंतरज्ञान ।
तीनी अवस्था जाऊन । उन्मनी होय तेधवां ॥१०४॥
तुटे सर्वाभिमान । कैचें द्वैतानुसंधान ।
सर्वथा लपे अज्ञान । तुर्यावस्थान होतांची ॥१०५॥
आपण आपणा पाहून । जेथें जाई विरोन ।
आत्यंतिक सुख पूर्ण । बुद्धीयोगें योगी घेई ॥१०६॥
समाधी दैवा मारी । धर्मामृतवृष्टी करी ।
धर्ममेघ हें नाम चतुरीं । योजिलें असे यथार्थ ॥१०७॥
अर्जुना असा हा योग । वारी सर्व उद्वेग ।
करी दु:खाचा वियोग । जीवब्रह्मयोग करी ॥१०८॥
इति श्रीमत्परमहंसवासुदेवानंदसरस्वतीविरचिते श्रीदत्तमाहात्म्ये चतुर्दशोsध्याय: ॥१४॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 26, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP