मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य|
अध्याय २७ वा

श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय २७ वा

श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य


श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥
गुरु ह्मणे दीपकासी । कुलवयाश्व भेटला पितयासी ।
दु:ख सांगावया तयासी । खेद रायासी वाटला ॥१॥
अंतरीं दु:खित जाणून । नृपा पुसे पुन: नंदन ।
ह्मणे ताता तुझें मन । वाटे खिन्न जाहलें ॥२॥
कोणी तुझा अपमान । केला तरी दे सांगून ।
मी तोडीन त्याची मान । अनुमान न करीन मी ॥३॥
किंवा दंडाई सोडावा । किंवा कोणा रक्षावा ।
दरिद्र्यासी धनिक करावा । अथवा लुटावा दुष्ट धनिक ॥४॥
काय तुझ्या मनांतून । तें सांग उघड करून ।
मनीं नको अनुमान । बोलतों आण वाहूनी ॥५॥
माझी जी कां प्राणप्रिया । मदालसा गंधर्वतनया ।
तिला जरि कां दवडूनियां । दे ह्मणसी तरी देईन ॥६॥
नाम ऐकतां मदालसेचें । मन भ्यालें रायाचें ।
मुख पाहूनी तनयाचें । ह्मणे तीचें नाम कासया ॥७॥
हा हा पुत्रा तुझी कांता । तुझी ऐकोनी वाईट वार्ता ।
गेली परलोकीं आतां । काय सुता सांगावें ॥८॥
हा ! हा ! मदालसे त्वां पतिला सोडिलें कसें ।
नृपें दु:ख करितां असें । पुत्र पुसे काय वार्ता ॥९॥
मग नेत्र पुसोनियां । ह्मणे नृप ऐक तनया ।
तूं वनीं गेलिया । आला या सदनीं तापसी ॥१०॥
जटाजूट महामुनी । शोकें आक्रंदोनी ।
कंठी पुढें ठेवूनी । वर्तमान विपरीत बोलिला ॥११॥
तें ऐकतां ते वेळीं । तत्काळ गंधर्वाची बाळी ।
पेटवूनी ज्वाळामाळी । जाळी आत्मा कंठीसह ॥१२॥
हा घडला अनर्थ । सून माझी जळाली व्यर्थ ।
मुनी कोण किमर्थ । आला यथार्थ न कळलें तें ॥१३॥
राजपुत्र ह्मणे ताता । मी एकला वनीं जातां ।
मुनीचा आश्रम देखिला होता । तेथें होता मुनी एक ॥१४॥
त्यानें दक्षिणेसाठीं । मागीतली माझी कंठी ।
म्यांतो न ओळखिला कपटी । दिधली कंठीं तयासी ॥१५॥
त्यानें हा अनर्थ केला । आतां म्यां ओळखिला ।
पूर्वींजो म्यां उपेक्षिला । तालकेतू दैत्य जो ॥१६॥
जो पराक्रमी पुरुष । तेणें शत्रू मारावे नि:शेष ।
अग्निशेष ऋणशेष । शत्रूशेष न राखावा ॥१७॥
हें वचन सत्य कळलें । माझें कुटुंब जळालें ।
आतां हें दु:ख झालें । मन पोळलें विरहाग्नीनें ॥१८॥
आतां तिच्या ऋणापासून । मुक्त व्हाया संकल्प करीन ।
या जन्मीं तिचे वांचून । न भोगिन इतर नारी ॥१९॥
जो पांघुरे शालजोडी । त्याला देतां घोंगडी ।
तिची ठेवील कीं आवडी । तेवी न गोडी इतर स्त्रियांची ॥२०॥
असा संकल्प करून । मग होई उदासीन ।
म्हणोनी नगर सोडून । वनीं जाऊन वसतसे ॥२१॥
अश्वतरनागाचे सुत । दैवें तेथे आले फिरत ।
दिसती जेवी वानप्रस्थ । राजसुत तयां वंदी ॥२२॥
ते म्हणती रायासी । आम्ही आलों क्रीडेसी ।
तूं सात्विक दिससी । तुजशीं सख्य करूं आम्ही ॥२३॥
ऐकूनी तयांचें वचन । बोलतसे राजनंदन ।
म्हणे होतां तुमचें दर्शन । मी पावन जाहलों ॥२४॥
जरी सख्य कराल । तरी आमुचें कुल ।
सर्वही उद्धरेल । हें नवल नोहेची ॥२५॥
दृष्टी पडतां साधूची । होळी होई पापाची ।
मग कैंची वार्ता तापाची । नलगे मोक्षाची गरज ॥२६॥
मग ते त्याचे मित्र होती । त्या स्थानसी नित्य येती ।
यथेच्छ क्रीडा करिती । पुन: जाती अस्तमानीं ॥२७॥
बुद्धीनें बृहस्पतिसमान । विक्रमें इंद्रासमान ।
स्वरूपें कामासमान । नृपनंदन त्यां मानला ॥२८॥
ते तापससुत मानून । राजा रमे अनुदिन ।
राजाला तयांवांचून । न पडे चैन घडीभरी ॥२९॥
एके दिवशीं नागसुत । राजाचे नेत्र आरक्त ।
पाहूनी विनोद करीत । प्रेमभरित बोलती ॥३०॥
आजी वहिनीनें जागर । करविला वाटतो फार ।
ह्मणोनी आरक्त नेत्र । दिसती आह्मां वाटतें ॥३१॥
ऐकोनी त्याचें वचन । शोक करी राजनंदन ।
ह्मणे ही वार्ता सोडून । करा क्रीडन यथेच्छ ॥३२॥
मग ते दु:खित होऊनी । म्हणती आम्हां लागुनी ।
ही वार्ता विस्तारूनी । यथार्थ सांगावी ॥३३॥
जें होई दु:ख । त्याचा भाग मित्र एक ।
घेतो सांगूनी विवेक । जेणें शोक नष्ट होतो ॥३४॥
मग रायें सर्व कथिलें । नागांच्या मना दु:ख झालें ।
ते उठोनी चालिले । दु:खें पातले निजसदना ॥३५॥
मित्रदु:ख्हा आठवूनी । तेही दु:खी होऊनी ।
एकांतीं जाऊनी । भोग सोडूनी बैसले ॥३६॥
त्यांचें म्लान मुख झालें । मग पिता तयां बोले ।
तुम्हां काय दु:ख झालें । कोणी दुखविलें मन तुमचें ॥३७॥
तयाप्रती सांगती सुत । सोमवंशीं शत्रुजित ।
कुवलयाश्व त्याचा सुत । तो सुहृत आमुचा ॥३८॥
त्याला झालें दु:ख । म्हणोनी वाळलें आमुचें मुख ।
मना केवी होईल सुख । मित्रदु:ख पहात ॥३९॥
नाग म्हणे सुतांसी । दु:ख काय झालें त्यासी ।
तें सांगा आम्हांसी । त्यासी उपाय करवेल ॥४०॥
मित्रानें मित्रावर । अवश्य करावा उपकार ।
अत एव कळता सविस्तर । करूं प्रतिकार तयाचा ॥४१॥
ऐकोनी नागाचें वचन । बोलती ते नंदन ।
मदालसा म्हणोन । त्याची पत्नी होती एक ॥४२॥
ती होती योगिमान्या । ती गंधर्वाची कन्या ।
येथें तत्समान अन्या । नसे कन्या ब्रह्मांडीं ॥४३॥
वनीं जातां राजनंदन । मागें कपटी दैत्य येऊन ।
तुझा भर्ता मेला म्हणून । सांगून गेला वनांतरीं ॥४४॥
ऐकतां तें वचन । अग्निप्रवेश करून ।
ती गेली जळून । म्हणोन राजा खिन्न झाला ॥४५॥
मी दुसरी न भोगिन अबला । हा संकल्प तेणें केला ।
तो विरहदु:खें पीडला । तें आम्हांला न सोसवे ॥४६॥
आत्मा सर्वेंद्रियनिधान । तो पूर्वीं भोग भोगून ।
मग पावे समाधान । नातरी हो निदान दु:खाचें ॥४७॥
कार्य हें मित्राचें । अशक्य बोलतां वाचें ।
समाधान तयाचें । आमुचे हातीं नोहे ॥४८॥
मग नाग बोले वचन । मी प्रयत्न करीन ।
तुमच्या मित्राचें मन । प्रसन्न करीन सर्वथा ॥४९॥
असी प्रतिज्ञा करून । कंबलनागा घेऊन ।
हिमाचळीं येऊन । करी अनुष्ठान अश्वतर ॥५०॥
जें तीर्थ प्लक्षावरण । तेथें आसन देऊन ।
प्राणायाम करून । करी अनुष्ठान श्वेताश्वतर ॥५१॥
आहारही जिंकून । घालूनियां दृढासन ।
मन एकाग्र करून । करी ध्यान सरस्वतीचें ॥५२॥
म्हणे बालवाक्यापरी । हे स्तुती अवधारी ।
समुद्रा देती जेवी वारी । तयापरी हे स्तुती ॥५३॥
समुद्राचें जीवन । समुद्रा देतां दान ।
किंवा सूर्या दिवा दावून । करिती निराजन तद्वत हें ॥५४॥
तूं जसी देसी स्फूर्ती । तसी घडेल तुझी स्तुती ।
तूं अससी भारती । सरस्वती प्रख्यात ॥५५॥
जें हें दिसतें जग । तें सर्व तुझें अंग ।
मी भिन्न कसा मग । हें सांग तूं माते ॥५६॥
जद जग तो क्षर । भोक्ता जीव तो अक्षर ।
तूं सोडूनी क्षराक्षर । अससी परसाक्षित्वें ॥५७॥
जलावर बुद्बुद जसे । त्वद्रुपीं जीव तसे ।
जीवेश्वर हा भेद भासे । उपाधिवशें त्वद्रूपीं ॥५८॥
तूं ओंकाररूपिणी । तीनी गुणांची स्वामिनी ।
तूं अर्ध मात्रा होऊनी । विकार सोडूनी राहसी ॥५९॥
यज्ञसंस्था सात । सोमसंस्था सात ।
पाकसंस्था सात । हीं होत तुझीं अंगें ॥६०॥
तुझ्या वांचूनी नोहे याग । तूंच देसी सर्व भोग ।
करूनी स्वरवर्णसंग । व्यवहार सांग चालविसी ॥६१॥
तूं सर्वां प्रकाश करिसी । तूं सर्व विद्या देशी ।
तूं कारण सर्वांसी । तूं आम्हांसी आधार ॥६२॥
जें सर्वव्यापक । तें तुझें रूप एक ।
जो तुझा परम सेवक । तो एक जाणें तें ॥६३॥
जे भोग इहलोकीं । अथवा असती परलोकीं ।
ते सोदूनी पुरुष विवेकी । अंतरीं विलोकी त्वद्रूपा ॥६४॥
पद ॥ ( चाल सद्गुरुची कोठवरी ॥ )
देवो मती जी सद्गती ती सरस्वती ।
श्रुति गाती जीचि कीर्ति तीच भारती ॥ध्रु०॥६५॥
चिन्मय तूं वाड्मय तूं अससी भारती । करविसि तूं वदविसि तूं तूं जगद्गती ॥६६॥
ये धावुनी स्तुति परिसुनी भो सरस्वती । मति देवुनि जाड्य हरुनि तारि भारती ॥( ओवी )॥६७॥
अशी स्तुती ऐकून । सरस्वती झाली प्रसन्न ।
येई स्वरूप प्रगटून । म्हणे वरदान घे नागा ॥६८॥
नाग पाहे नेत्र उघडून । तंव हंसावरी बसोन ।
वीणा वरदंड माळा धरून । चतुर्भुज होऊन पुढें दिसे ॥६९॥
श्वेतवस्त्र नेसली । श्वेतकमळीं बैसली ।
श्वेतांगी पाहिली । सरस्वती माउली नागानें ॥७०॥
नाग तीस वंदून । म्हणे झालीस प्रसन्न ।
जरी देसी वरदान । तरी गानशक्ति दे ॥७१॥
माते देई मजला । आणि ह्या कंबला ।
उत्तमोत्तम गायनकला । कोमलालापांसहित ॥७२॥
गावूं यावें सुस्वर । कोमल मंजुल मधुर ।
जेणें प्रसन्न होय हर । देईल वर अभीष्ट ॥७३॥
सरस्वती म्हणे नागा । उठविसील सांग रागा ।
गाणें ऐकतांच भुजगा । भुजगाभरण वर देईल ॥७४॥
तुह्मा दिलें नादरहस्य । ऐकतां शंभु सोडून लास्य ।
हर्षें करील हास्य । वरतें आस्य करूनी ॥७५॥
असा वर देऊन । ती गेली गुप्त होऊन ।
दोघे नाग मग येऊन । कैलासोपवनप्रांतीं गाती ॥७६॥
गाणें ज्यांचें सुस्वर । रागरागिणी मधुर ।
ताल काल साधती सुंदर । लय बरोबर करूनी ॥७७॥
आलाप करिती मंजुळ । ध्वनी वाटे कोमळ ।
असे गाती विमळ । वाद्यांचा मेळ जमवूनी ॥७८॥
तंत्रीं लया योजुनी । तीनी काळ साधूनी ।
असें गातां नागांनीं । शंभूच्या कानीं तें भरे ॥७९॥
हृदयीं गाणें खोंचलें । शिवाचें चित्त प्रसन्न झालें ।
तेथें येऊन डोले । मग बोले भोळानाथ ॥८०॥
अहो हो शाबास शाबास । गोड लागलें हें कानास ।
खोंचलें माझ्या मनास । गाणें तुमचें सुरस ॥८१॥
सर्वा हरी म्हणोनी हर । तो गाण्यानें वेधिला हर ।
हो हो करूनी सादर । परिसतां शंकर तोषला ॥८२॥
म्हणे आतां अश्वतरा । तुला देतों अभीष्टवरा ।
तूं माझ्या अंतरा । केला बरा आनंद ॥८३॥
नाग पाहती नेत्र उघडूनी । तंव नंदीवरी बसूनी ।
वामांगी पार्वती घेऊनी । हास्यवदनी राहिला ॥८४॥
सोमसूर्याग्निलोचन । गौरवर्ण पंचवदन ।
सर्वायुधें घेऊन । कृत्तिवसन शोभतसे ॥८५॥
भाळीं अर्धचंद्र भासे । शीरीं गंगा वाहतसे ।
नीलकंठ शोभतसे । शिव दिसे सर्पभूषित ॥८६॥
असें रूप पाहून । नाग करिती वंदन ।
जरी होसी प्रसन्न । तरी वरदान दे आतां ॥८७॥
कुवलयाश्वाची सती । मदालसा नामें होती ।
दैत्यांनीं फसवितां ती । अग्नीमध्यें देह सोडी ॥८८॥
ती व्हावी माझी दुहिता । रूपाकारबुद्धी न सोडितां ।
धरूनी पूर्वशीलवृता । पतिव्रता ब्रह्मवादिनी ॥८९॥
व्हावी योगिनी योगमाता । क्षमाशांतिगुणीं भूषिता ।
ब्रह्मनिष्ठा पतिव्रता । माझी सुता व्हावी ती ॥९०॥
जरी हें इतरा दुष्कर । तरी तें प्रभो तुम्हा सुकर ।
मी याहून इतर । न वरी वर स्मरहरा ॥९१॥
ऐकोनी नागवचन । म्हणे शिव सुप्रसन्न ।
तसेंच दिधलें वरदान । अनुमान न होई ॥९२॥
तूं घरीं जाऊन । करी श्राद्धविधान ।
मध्यम पिंड घेऊन । दे पत्नीला भक्षावया ॥९३॥
तिच्या स्वरूपा चिंतून । करितां पिंड प्राशन ।
तत्काळ ती प्रगटून । दिसेल श्वसनमार्गानें ॥९४॥
असें म्हणूनी हर । गुप्त होई सत्वर ।
नाग करूनी नमस्कार । जाती रसातलासी ॥९५॥
निजपुरीं जाऊन । विधिनें श्राद्ध करून ।
श्रीशंकरा वंदून । पिंडाचें भक्षण करविलें ॥९६॥
ऐकिलें रूप जसें । ध्यानीं आणून तसें ।
श्रद्धेनें पिंड भक्षीतसे । नागपत्नी ते वेळा ॥९७॥
पिंड भक्षिल्यावर । श्वास चालती अपार ।
मग श्वासाबरोबर । बाहेर एक गोळा पडला ॥९८॥
तो तेज:पुंज दिसे । पाहतां तें शरीर भासे ।
मदालसेचें रूप जसें । तसेंच तें वाटलें ॥९९॥
पूर्वीं दिसे अंगुष्ठाकार । जातां जातां क्षणांतर ।
तें होई थोर थोर । क्रमानें शीघ्र पूर्ववत ॥१००॥
तीच बुद्धि तोच आकार । तेंच रूप तोचि वर्णश्वर ।
घेवूनी प्रगटे सत्वर । घे बरोबर तीच स्मृति ॥१०१॥
देह केला दहन । हेंनसे तिला स्मरण ।
आठवूनी पतीचें स्मरण । आपटी चरण दु:खानें ॥१०२॥
म्हणे हा हा प्राणनाथा । मज कां सोडतां वृथा ।
चरणीं ठेवितें माथा । अपराध आतां क्षमा करा ॥१०३॥
शीघ्र तुम्ही येऊन । मला द्या आपुलें दर्शन ।
नातरी कंठीं घेऊन । अग्निप्रवेश करीन मी ॥१०४॥
असा आलाप करूनी । अग्निप्रवेश करीन म्हणूनी ।
उठली मदालसा योगिनी । नाग मनीं थक्क झाला ॥१०५॥
म्हणे दहनाचें स्मरण । इला नसे म्हणून ।
करावया सहगमन । सिद्ध झाली निश्चित ॥१०६॥
असें म्हणूनी समाधान । करूनी तिला घेऊन ।
अंत:पुरांत ठेवून । करी रक्षण नानापरी ॥१०७॥
इति श्रीदत्तमाहात्म्ये सप्तविंशोsध्याय: ॥२७॥
॥ श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP