मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य|
अध्याय ३९ वा

श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ३९ वा

श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य


श्रीदत्तात्रेयाय नम: ॥
जो तूं ओतप्रोत जगद्रूपीं । अससी विश्वव्यापी ।
त्वत्कथामृत जो पी । हो कां पापी तरी तो तरे ॥१॥
नाला मिळतां नदीसी । कोण अशुद्ध म्हणे त्यासी ।
तसा त्वदधीन हो त्यासी । अशुची कोण म्हणेल ॥२॥
हें कित्येक न मानितील । तरी ते स्वार्था मुकतील ।
आमुचें काय जाईल । त्यांच्या दोषें ते बुडतां ॥३॥
खरें सत्व सांगतां । तें न ये ज्याच्या चित्ता ।
त्याचा दोष न ये आप्ता । त्याची दयाळुता न भंगे ॥४॥
जो तूं दयासागर । उद्धरावया चराचर ।
झालासी ऋषिकुमार । हे उपकार केवढे ॥५॥
प्रत्यक्ष ह्या भूमिवरी । रूपें दाविसी नानापरी ।
हा उपकार आम्हांवरी । तूं करिसी दयाळा ॥६॥
आकार जयासी नाहीं । तो तूं होसी देही ।
यापरतें अधिक कांहीं । दयाळुत्व तेंही दिसेना ॥७॥
सर्व मिळे ह्या संसारीं । परी मुक्ती होती दूरी ।
ती द्यावया लवकरी । तूं शरीरी झालासी ॥८॥
दुष्टां दंडावयासी । इष्टां पाळावयासी ।
तूं जी जी लीला करिसी । ती आह्मां तारक ॥९॥
मानस शुद्ध व्हावया । तुझ्या लीला सोडूनियां ।
आम्ही इतर उपाया । सुगम न मानूं ॥१०॥
जे सर्वं खल्विदं ह्मणोन । असे श्रुतिवचन ।
तेंही ये अनुभवून । त्वल्लीलासेवन होतांची ॥११॥
जें स्वांत चंचळ । त्वल्लीला ऐकतां तत्काळ ।
मोहित होऊनी निश्चळ । राहे केवळ निर्विकल्प ॥१२॥
उपास्योपासक भाव । कल्पुनी करी भाव ।
होतो द्वैताचा अभाव । हें वैभव त्वल्लीलेचें ॥१३॥
जें रूप तुझे निर्गुण । त्याचे बुद्धीला नोहे ग्रहण ।
म्हणूनी हें सगुण । सुखानें मिळो आह्मांला ॥१४॥
सर्वव्यापक जें निर्गुंण । त्याचें चित्तीं ग्रहण ।
उत्तमाधिकारावीण । नोहे प्रमाण वेद येथें ॥१५॥
जो व्याख्या करी शास्त्राची । वार्ता करी शास्त्राची ।
निर्गुणरूपीं साची । मती तयाची न रिघे ॥१६॥
जो आनंद निरतिशय । तो तया केवीं होय ।
जो सगुण रूप हें ध्येय । सेवी तया तोही मिळे ॥१७॥
सर्वभूतनियामक । तोचि तूं सगुण एक ।
खास आमुचा तारक । येथें वितर्क नसेची ॥१८॥
वस्त्रीं तंतू जसे । त्वद्रूपीं जग हें तसें ।
ओतप्रोत भरलें असे । मग तें कसें भिन्न होय ॥१९॥
तेव्हां भगवंता मी तुझा । तूं न होसी माझा ।
तरी हा भाव माझा । प्रेमा तुझा वाढवूं ॥२०॥
सद्भाव देऊनी वदविसी । तूंची तुझ्या चरित्रासी ।
त्याणें ह्या चित्तासी । प्रेमपाशीं बांधिसी ॥२१॥
जे त्वद्भक्त भाविक । त्यांचें जें कथानक ।
तें श्रोत्याचे मोह शोक । वारी नि:शंक श्रवणेंची ॥२२॥
तेव्हां विशेषेंकरून । त्वद्भक्तांचे गातां गुण ।
तुझेंच घडे भजन । ज्यानें जन उद्धरती ॥२३॥
जो शिष्य तुमचा अर्जुन । जो भक्त मदालसानंदन ।
त्यांचें करविलें वर्णन । तसें करवा इतरांचें ॥२४॥
ही मदिच्छा पुरवी आतां । म्हणूनि भावें विनवितां ।
कृपा आले गुरुनाथा । स्फूर्ती चित्ता देता झाला ॥२५॥
मग तिये स्फूर्तीनें । आठवलें जें दिपकानें ।
पुसितां कथिलें वेदधर्म यानें । आयुराज्याख्यान तें ॥२६॥
गुरुस पुसे दीपक । जो भक्त आयुनामक ।
त्याचें गोड कथानक । सांगावें कृपा करूनी ॥२७॥
अपूर्व वाटे भक्तलीला । ती गातां देवांला ।
आनंद वाटे मग मानवाला । प्रेमाश्रुकला कां न यावी ॥२८॥
चित्तमोहक याहून । नाहीं दुसरें साधन ।
हा निश्चय करून । धरिले चरण तुमचे म्यां ॥२९॥
ज्या शंका उपजती । त्यांची होतसे शांती ।
म्हणूनी करितां प्रणती । गुरुमूर्ती प्रसन्न झाली ॥३०॥
म्हणे रमणीय तुझा प्रश्न हा । आनंद दे मला हा ।
जो निवारी मोहा । तो महायोगी आठवे आतां ॥३१॥
राजा एक आयुमानक । सोमवंशीय धार्मिक ।
पुरूरव्याचा लेंक । झाला सेवक श्रीदत्ताचा ॥३२॥
राजा वदान्य धर्मरत । चक्रवर्ती विख्यात ।
भूमंडल समस्त । जिंकिलें ज्याणें निजबळें ॥३३॥
अन्याय सर्वथा न करी । भक्ती ठेवी विप्रांवरी ।
अदंड्या दंड न करी । दंडन करी दंड्याचें ॥३४॥
जो सच्चा वचनाचा । त्राता शरणागताचा ।
मायबाप प्रजेचा । दुर्जनाचा घातक जो ॥३५॥
त्या अन्यत् सर्व असे । परी एक संतान मात्र नसे ।
म्हणूनी खिन्न होतसे । चैन नसे अनुदिन ॥३६॥
जें जें त्रिदशां दुर्लभ । तें तें तया होय सुलभ ।
परी एक दुर्लभ । अर्भक तया दैवयोगें ॥३७॥
पुत्रकामेष्टी करी । धर्म करी नानापरी ।
परी न वचे कवणेपरी । अनपत्यदोष तयाचा ॥३८॥
जें मुला वांचूनी घर । तें अरण्य घोर ।
असें मानूनी नृपवर । करी अपार दु:ख तो ॥३९॥
सांगती लोक जे जे उपाय । ते ते करी नृपवर्य ।
परी पुत्र न होय । शोक होय रायासी ॥४०॥
म्हणे तंतू तुटतां । पितर जाती अध:पाता ।
काय करावें आतां । आमुची पुढें काय गती ॥४१॥
वंशांत व्हावा पुत्र । तरीच सुख इहपरत्र ।
नातरी बुडे गोत्र । असें शास्त्र बोलतें ॥४२॥
हें वेदवचन । अपुत्रस्य लोको न ।
जरी होमहवन दान । केलें तरी वृथैव तें ॥४३॥
जो जाप्योपासनादिधर्म । तोही न देईल शर्म ।
पुत्र नसतां व्यर्थ वर्म । माझें दुष्कर्म काय हें ॥४४॥
ही शंका मनीं आणून । ज्योतिषिकां बोलावून ।
तया करी प्रश्न । म्हणे संतान वाढेल कसें ॥४५॥
तुह्मी रक्षा आमुचें कुळ । असें म्हणे नृपाळ ।
मग ते ज्योति:शास्त्रकुशल । सांगती वेळ पाहूनी ॥४६॥
भूपा एकही योग नसे । मग संतान होईल कसें ।
ज्योति:शास्त्रीं जे असें । तें परीसे तत्व तूं ॥४७॥
जो देव गुरु भाव धरी । त्याचा स्वामी जरी ।
षष्ठाष्टद्वादश स्थानावरी । राहे तरी अपुत्र तो ॥४८॥
जन्मसमयलग्न । आणि पंचम नवम स्थान ।
त्यांचे स्वामी त्रिकीं जाऊन । राहतां संतान न होयी ॥४९॥
जे गुर्वंघ्री सेविती । सत्पुरुषांतें भजती ।
त्यांना ग्रह इष्ट होती । त्यांची संतती वाढते ॥५०॥
जे बाह्येन्द्रियविषय । सोडून असती ब्रह्ममय ।
तयांचे धरितां पाय । दुर्लभ काय मानवा ॥५१॥
असें तयांचें वचन । ऐकोनी बोले उर्वशीनंदन ।
तुम्ही सांगा मजलागून । असा सज्जन कोठें वसे ॥५२॥
साक्षाद्ब्रह्म ब्राह्मण । म्हणोनी तुमचे धरिले चरण ।
करा माझें उद्धरण । आलों शरण तुम्हांसी ॥५३॥
जें तुम्हां अकाळे । तें देवाला न कळे ।
म्हणोनी म्या ये वेळे । चरणकमळें धरिलीं तुमचीं ॥५४॥
हृदय तयाचें ओळखून । मग म्हणती दैवज्ञ ।
त्वां सह्याद्रीवरी जाऊन । अत्रिनंदनपद धरी ॥५५॥
असे मातापुर । असे तयाचे समोर ।
सह्यपर्वतशिखर । अनसूयाकुमार तेथें वसे ॥५६॥
तो आत्मारामदैवत । तयाचा हो तूं भक्त ।
तो तुझे मनोरथ । अविलंबित पुरवील ॥५७॥
तोचि ब्रह्म केवळ । करी भक्तांचा प्रतिपाळ ।
त्याचें चरणकमळ । धरितां बाळ होईल ॥५८॥
जें ब्रह्मदेवें शिरीं । लिहिलें नसे तरी ।
श्रीदत्तें स्पर्शितां करी । अलभ्य जरी तरी तें मिळे ॥५९॥
जो असोनि निराकार । भक्तांकरितां साकार ।
झाला तयाचा किंकर । होतां दुष्कर काय लोकीं ॥६०॥
जो भय सोडून । मनीं धीर धरून ।
भावें करी भजन । तया वरदान देतसे ॥६१॥
ज्याचें मायात्म्य निर्जर । नेणती तेथें पामर ।
कायसे बापुडे हे नर ।  त्याचे धर चरण तूं ॥६२॥
महात्मा तो जाणून । तूं धरी त्याचे चरण ।
ऐसें त्यांचें वचन । राजा ऐकून हृष्ट झाला ॥६३॥
मग चरणीं चालत । राजा आला तेथ ।
जेथें होता अत्रिसुत । ध्याननिष्ठ सिद्धासनीं ॥६४॥
राजा तुष्ट होऊन । श्रीदत्ता पाहून ।
करी साष्टांग नमन । भाव धरून मानसीं ॥६५॥
तो बाष्पाकुल होऊन । प्रेमभरें दाटून ।
म्हणे मी झालों पावन । होतां दर्शन भगवंताचें ॥६६॥
जगज्जाळीं पडतां । नाना योनी हिंडतां ।
दैवयोगें हें आतां । भगवंताचें दर्शन झालें ॥६७॥
जो योग याग करितां । नये सहसा हातां ।
तो पूर्वपुण्योदयें आतां । दृष्टिपथा पातला ॥६८॥
यापरी अंतरीं चिंतून । राजा करी नमन ।
राजाचें पहावया मन । अत्रिनंदन काय करी ॥६९॥
जी अतर्क्य शक्ती । जिला माया म्हणती ।
तिला बनवूनी युवती । अंकीं घे तियेसी ॥७०॥
अंकीं स्थान देऊन । घे तिचें आलिंगन ।
दे तिला चुंबन । प्रेमें करून आदरें ॥७१॥
ते विनोद पाहून । राजाचें न विटे मन ।
म्हणे हा खेळ करून । मला भ्रमून ठेवितसे ॥७२॥
हा तो बहुरूपधर । कोण जाणे त्याचा पार ।
दत्त म्हणे येथून सत्वर । जा बाहेर भूपाळा ॥७३॥
मी बहिष्कृत न जाणसी । तूं कां येथें आलासी ।
जरी सत्वर न जासी । तरी प्राणासी मुकसी ॥७४॥
माझा प्रबळ कोप । मी व्रात्य तूं संभावित भूप ।
येथूनी न जातां घेसी शाप । मग वदे भूप वंदोनी ॥७५॥
नाभिज्ञ: शपति असें । मला ठाऊक असे ।
मी तरी शरणागत असें । आतां भय कसें ये मज ॥७६॥
तूंचि समर्थ जाणून । धरिले तुझे चरण ।
आतां मला कसें कोठून । ये मरण सांगावें ॥७७॥
जो शप्तां तारितो । सर्व पापा उद्धरितो ।
मग स्वयें शापा देतो । न घडे हें तो कालत्रयीं ॥७८॥
आतां गती खुंटली । मिळतां कृपेची साउली ।
जरी मारील माऊली । तरी लाड आपुले पुरवील ॥७९॥
असा एक निर्धार । करूनी राहे नृपवर ।
जरी दत्त दे मार । तरी दूर न सरे तो ॥८०॥
तूं नको राहूं म्हणून । वारंवार लोटे भगवान ।
तरी तो सर्व साहून । राहे मन दृढ करूनी ॥८१॥
तन्मन ओळखून । मग बोले अत्रिनंदन ।
जरी करिसी सेवन । तरी राखीन तुज येथें ॥८२॥
एरविं बाहेर घालवीन । ऐसें ऐकतां उर्वशीनंदन ।
म्हणे आज्ञा पाळीन । अनुमान न करीन मी ॥८३॥
योगीश तें ऐकून । म्हणे नृकपालांतून ।
ताजें मद्य मांस आणून । अनुदिन त्वां द्यावें ॥८४॥
नृपती तें ऐकून । तसें देतों म्हणून ।
साक्षात् पशु सोम मानून । दे आणून मद्य मांस ॥८५॥
यागमुखें हवी खातां । ज्या न ये तृप्तता ।
तो प्रेमें मद्य मांस देतां । मानी तृप्तता यज्ञेश्वर ॥८६॥
सुमुख होऊनी दत्त बोले । भूपा त्वां वचन पाळिलें ।
माझें मन तृप्त केलें । वर घे भले देतों मी ॥८७॥
नर स्थूलदृष्टीनें पाहती । ते माझें तत्व नेणती ।
म्हणूनी दोष ठेविती । मंदमती मजवरी ॥८८॥
विशालदृष्टी माझें तत्व । नेणूनी ते अज्ञत्व ।
धरूनी माझें अभोक्तृत्व । अलिप्तत्व नेणती ॥८९॥
यज्ञभुग् मी सर्वसाक्षी । परी किमपि न भक्षी ।
जो जीव कर्मफळें भक्षी । तया निरीक्षी साक्षित्वें ॥९०॥
अहं वैश्वानर म्हणून । असे माझें वचन ।
तें यथार्थ जाण । माझाविण कोण चालक ॥९१॥
मी वैश्वानरांतर्गत । सर्व भोगी निश्चित ।
परी अभुक्त असें सतत । म्हणूनी अलिप्त कर्मासी ॥९२॥
मी वैश्वानरांतर्गत । राजा हृष्ट होऊन ।
म्हणे मी झालों पावन । आपण प्रसन्न होतांची ॥९३॥
जो पुर:सर देवांचा । तो तूं विष्णू साचा ।
तरी मनोरथ आमुचा । पुरवी वर देउनी ॥९४॥
मी अप्रज असें देवा । तरी मला वर द्यावा ।
मला सुपुत्र व्हावा । पितृदेवां भजे असा ॥९५॥
सत्पथवर्ती सुरासुराजेय । देवविप्रपर सर्वज्ञ पूज्य ।
शूर रणक्रूर महावीर्य । अनाथपति पूज्य दक्ष कवी ॥९६॥
ज्या नमस्कारारितील मांडलिक । रणक्रूर शूर धार्मिक ।
दाता भोक्ता याजक । शरणागता वत्सल ॥९७॥
प्रजापालक मान्य होय । पितृगुर्वतिथिश्लाघ्य ।
असा व्हावा तनय । वीरगेय यशस्वी ॥९८॥
जो सदस्या मान्य होय । असा उर्वशीतनय ।
वर मागे मग दत्तात्रेय । म्हणे अलभ्य जरी हें ॥९९॥
तरी स्वभक्ताचें मन । न करावें उद्विग्न ।
म्हणोनी देतों वरदान । देतों म्हणून बोलिलों जें ॥१००॥
हा स्वप्नसमान संसार । पुत्रादिसुख हें नश्वर ।
तरी तूं पुत्रार्थी होऊनि वर । मागसी मायामोहित ॥१०१॥
मुक्तिस्थानापन्न होऊन । मागशी केवळ संतान ।
ज्ञानप्रतिबंध आहे म्हणून । तुझें मन हेंचि इच्छी ॥१०२॥
हें हि नोहे सुकृतावांचून । करितां सकाम भजन ।
क्रमें निष्काम होऊन । घे निर्वाण मद्भक्ता ॥१०३॥
यत्प्रात: संस्कृतं चान्नं सायं तच्च विनश्यति ।
तदन्नरसवृद्धेस्मिन्काये का नाम नित्यता ॥१०४॥
असें प्रत्यक्ष अनुभवून । लोक जाती मोहून ।
हें मायेचे आवरण । मत्प्रसादाविना दूर नोहे ॥१०५॥
न राज्ञ: खलु दोषोत्र । असें म्हणूनि अत्रिपुत्र ।
म्हणे तसाच तुला पुत्र । होईल सर्वत्र विख्यात ॥१०६॥
भूपास असा वर देऊन । हातीं एक फल देऊन ।
हें जायेस दे म्हणून । तया पाठवोन दे दत्त ॥१०७॥
तो सप्तांगांसह मनें करून । देवा नमस्कार करून ।
आज्ञा श्रीदत्ताची घेऊन । करी प्रयाण निजपुरा ॥१०८॥
इति श्रीदत्तमाहात्म्ये नवत्रिंशतितमोsध्याय: ॥३९॥
॥ श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP